Wednesday, October 28, 2026

भावा-भावाचे नाते : प्रेमाचा, विश्वासाचा आणि संस्कारांचा भक्कम पाया..!

Share

दिवाळी व भाऊबीज या सणांच्या निमित्ताने नात्यातील काही महत्त्वाचे पैलू नजरेत आणणारा हा खास लेख…


आपण आयुष्यात अनेक नाते सांभाळतो. त्यांची काळजी घेतो, पण फार कमी लोकं आहेत, जे भावा भावाचे नाते सांभाळतात. आजच्या या धावपळीच्या आणि भौतिकवादाने वेढलेल्या जगात माणसाला नात्यांपेक्षा संपत्ती, प्रतिष्ठा आणि अहंकार जास्त महत्त्वाचा वाटू लागला आहे. आपण मित्रांसाठी वेळ काढतो, सहकाऱ्यांशी गोड बोलतो, दूरच्या ओळखीच्या लोकांशी सौजन्याने वागतो; परंतु ज्या भावाच्या हाताला धरून आपण चालायला शिकलो, ज्याच्यासोबत बालपणातील निष्पाप आणि सुंदर दिवस घालवले, त्याच भावाशी हळूहळू अंतरे पडू लागतात. हे चित्र वेदनादायी आहे.
भावा-भावाचे नाते हे केवळ रक्ताचे नाते नसते, तर ती एकाच मुळापासून उमललेली दोन फुले असतात. ते एकाच संस्काराच्या साच्यात घडलेले दोन जीवनप्रवाह असतात. या नात्यात जशी लहानपणीची भांडणे असतात, तसाच अथांग जिव्हाळाही असतो. परंतु, जसजसे वयाचे टप्पे वाढत जातात, तसतसा कौटुंबिक आणि सामाजिक व्यापांमुळे या नात्यात अंतर येऊ लागते. कधी जमिनीचा तुकडा, कधी पैशांची देवाणघेवाण, तर कधी क्षुल्लक अहंकार या नात्यामध्ये भिंत बनून उभा राहतो. पण आपण कधी विचार केला आहे का, की सर्वकाही गमावूनही जर भाऊ पाठीशी असेल, तर माणूस पुन्हा जग जिंकू शकतो?

बालपणातील सोनेरी आठवणी आणि भावाचा आधार
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात बालपण हा एक असा काळ असतो, जिथे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. दोन भावांमधील लहानपण हे तर स्वर्गाहूनही सुंदर असते. एकाच ताटात जेवणे, एकाच अंथरुणावर झोपणे, एकमेकांची खेळणी हिसकावून घेणे आणि पुन्हा दुसऱ्याच क्षणाला एकत्र हसणे हा काळ आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेवा असतो.
लहानपणी मोठा भाऊ हा धाकट्यासाठी एका ढालसारखा असतो. शाळेत कुणी चिडवले किंवा काही अडचण आली, तर “माझा मोठा भाऊ आहे!” हा शब्द मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करायचा. धाकटा भाऊ चुकीचा वागला तरी त्याला सांभाळून घेणे आणि प्रसंगी वडिलांसारखा धाक दाखवून योग्य वाट दाखवणे, हे मोठ्या भावाचे कर्तव्य असायचे. दुसरीकडे, धाकट्या भावाच्या नजरेत मोठ्या भावाबद्दल असणारा आदर आणि प्रेम हे शब्दातीत असायचे.
परंतु, हीच मुले जेव्हा मोठी होतात, लग्नाच्या बंधनात अडकतात, आपापल्या संसारात गुंततात, तेव्हा तो बालपणाचा गोडवा कुठेतरी हरवून जातो. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक विषमता आणि तिसऱ्याच व्यक्तींच्या बोलण्यावर ठेवलेला विश्वास यामुळे दोन भावांमधील नात्याला तडे जाऊ लागतात.

नात्यात विष कालवणारे घटक : संपत्ती आणि अहंकार
असे म्हटले जाते की, जमीन आणि धन हे माणसाच्या बुद्धीचा भ्रंश करतात. आज समाजात आपण पाहतो की, भावा-भावांमध्ये होणाऱ्या ९०% वादांचे मूळ हे संपत्ती, घर किंवा जमिनीची वाटणी हेच असते. बाप-दादांनी कष्टाने कमावलेल्या एका तुकड्यासाठी भाऊ भावाचा वैरी बनतो. न्यायालयात वर्षानुवर्षे चालणारे खटले, पोलिसांत होणाऱ्या तक्रारी आणि ऐन तारुण्यात एकमेकांविरुद्ध उगारलेले हात- हे दृश्य पाहिले की मन सुन्न होते.
संपत्ती आज आहे, उद्या नाहीशी होईल. पैसा आज एकाकडे आहे, उद्या दुसऱ्याकडे जाईल, पण एकदा तुटलेले रक्ताचे नाते पुन्हा पूर्ववत जोडणे जवळजवळ अशक्य असते. कोर्टाच्या पायऱ्या चढताना माणूस जिंकतो किंवा हारतो, पण या प्रक्रियेत भाऊ म्हणून तो कायमचा हरलेला असतो.
संपत्तीपेक्षाही घातक गोष्ट म्हणजे ‘अहंकार’. “मी का नमते घ्यावे?”, “त्याने आधी माझ्याशी बोलायला हवे”, “माझ्याकडे त्याच्यापेक्षा जास्त पैसा आहे” असे विचार जेव्हा मनात घर करतात, तेव्हा नात्याचा अंत होतो. लहान-सहान गैरसमज संवादाभावी मोठे होतात. भाऊ एकमेकांच्या घरात जाणे-येणे बंद करतात, सण-उत्सवाच्या आनंदाला दुरावतात आणि एकमेकांच्या दुःखातही सहभागी होत नाहीत. हा अहंकार माणसाला एकटा पाडतो.

रामायण आणि महाभारतातील आदर्श व धडा
आपल्या भारतीय संस्कृतीत भावाच्या नात्याचे महत्त्व पटवून देणारी अनेक उदाहरणे आहेत…

  • प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण-भरत : रामायणातील भावांचे नाते हे जगासाठी आदर्श आहे. श्रीरामांना १४ वर्षांचा वनवास मिळाला, तेव्हा लक्ष्मणाने क्षणभराचाही विचार न करता स्वतःच्या सुखाचा त्याग केला आणि भावासोबत वनवासात जाणे पसंत केले. दुसरीकडे, अयोध्येचे राज्य मिळूनही भरताने ते नाकारले आणि श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून १४ वर्षे तपस्वी म्हणून जीवन जगले. तिथे राज्य मिळवण्यासाठी नव्हे, तर राज्य सोडण्यासाठी भावांमध्ये चढाओढ होती.
  • रावण आणि बिभीषण : याउलट, लंकेचा राजा रावण अतिशय ज्ञानी, महापराक्रमी आणि सोन्याच्या लंकेचा स्वामी होता. परंतु, त्याच्या अधर्मामुळे आणि भावाला (बिभीषणाला) दिलेला अनादर यामुळे त्याचा विनाश झाला.
    यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, जगात कितीही धनसंपत्ती असली, बुद्धिमत्ता असली, तरी जर भाऊ तुमच्या पाठीशी नसेल, तर तुमचा पराभव अटळ असतो.

भावाचे नाते जपण्यासाठी काय करावे?

  • संवाद जिवंत ठेवा : कितीही व्यस्तता असली किंवा काही मतभेद झाले, तरी बोलणे कधीही बंद करू नका. समोरासमोर बसून गैरसमज दूर करा.
  • तिसऱ्या व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका : दोन भावांच्या वादात जेव्हा तिसरी व्यक्ती (मग ती नातेवाईक असो वा मित्र) येते, तेव्हा वाद सुटण्याऐवजी अधिक बिघडतो. आपल्या घरातील गोष्टी घरातच मिटवा.
  • पारदर्शकता आणि स्पष्टपणा : आर्थिक व्यवहारात नेहमी स्पष्टता ठेवा. नात्यात पैशांचा व्यवहार करताना प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे.
  • त्यागाची भावना ठेवा : नात्यात कायम ‘माझेच खरे’ किंवा ‘मलाच जास्त मिळाले पाहिजे’ ही वृत्ती ठेवू नका. कधीकधी नात्यासाठी थोडे नमते घेणे किंवा त्याग करणे हे मोठेपणाचे लक्षण असते.
  • एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहा : जेव्हा भावावर एखादे संकट येते, तेव्हा जगाचा विचार न करता त्याच्या पाठीशी ढाल बनून उभे राहा. हीच गोष्ट नात्याला अधिक मजबूत करते.

समारोप
आजच्या काळात गरज आहे ती स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवण्याची. जर तुमच्या आणि तुमच्या भावात काही कारणाने अंतर पडले असेल, तर आजच तो अहंकार बाजूला ठेवा. एक पाऊल पुढे टाका, त्याच्याशी बोला आणि जुन्या आठवणींना उजाळा द्या. कारण शेवटी, आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा जग पाठीशी नसते, तब फक्त आपले रक्तच धावून येते. मरताना रावणाने श्रीरामांना दिलेला हा उपदेश आजच्या प्रत्येक भावाने मनात कोरून ठेवण्यासारखा आहे.
रावण मरते वेळी म्हणाला, “रामा! आज माझ्या लक्षात आले.”
राम म्हणाले, “काय समजलास?”
रावण म्हणाला, “श्रीरामा ! मी प्रत्येक बाबतीत तुझ्यापेक्षा मोठा होतो. मी उंचीने मोठा होतो. माझ्याकडे दहा मस्तक आणि वीस हात होते. रामा! मला एक लाख पुत्र आणि सव्वा लाख नातू होते. रामा! मी ऐश्वर्यात तुझ्यापेक्षा मोठा होतो, माझ्याकडे सोन्याची लंका होती, तरीसुद्धा मी हरलो.”
रामाने विचारले, “मग तू का हरलास?”
रावण म्हणाला, “फक्त एकाच कमतरतेमुळे मी हरलो- माझा भाऊ माझ्यासोबत नव्हता, आणि तुझा भाऊ तुझ्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभा होता.”
बोध : आपल्याकडे कितीही संपत्ती, बल किंवा वैभव असले, तरी भावाची साथ नसेल तर माणूस आयुष्याच्या लढाईत एकाकी पडतो आणि हारतो. म्हणून, संपत्तीपेक्षा नाती जपा, अहंकार सोडा आणि आपल्या भावाचा हात घट्ट धरून ठेवा. कारण “भाऊ हा भावाचा पाठीराखा असतो!”

–सुभाष राठोड
(लेखक प्राथमिक शिक्षक आणि इतिहास व नागरिक शास्त्र समिती तसेच अभ्यास मंडळ, पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांचे सदस्य आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख