स्थळ : दिवे मंदावलेला मॅडमश्री बंगला
वेळ : साहेबांच्या झोपण्याची
साहेबांच्या शयनकक्षा बाहेर गडबड उडाल्याचा आवाज येतो… पण त्यातला एक आवाज ओळखीचा वाटतो… नेहमीच्या विश्वासू घरगड्याचा…
साहेब दार उघडून लगबगीने बाहेर डोकावतात… त्यांना पाहिल्याबरोबर विश्वासू घरगडी नेहमीप्रमाणे गर्दीतून पटकन् पुढे येतो… आणि साहेबांना लडिवाळपणे बिलगतो…
काय रे गड्या… कसली गडबड चालली आहे…
साहेब… आपल्याला आत्ताच्या आत्ता दिल्लीला जायचं आहे…
आत्ता?… इतक्या मध्यरात्री?… माझं सरकार येतंय की काय?…
साहेब… पुढचं सरकार तुमचंच येणार आहे… फक्त त्याच्या तयारीसाठी आपल्याला जंतरमंतरवर पोचावं लागणार आहे…
अरे पण एवढ्या मध्यरात्री जंतरमंतरवर जाऊन भेटणार कोण?
साहेब… जंतरमंतरवर तो विद्यार्थी कुलदीपक नेता लाखो
विद्यार्थ्यांबरोबर तुमची आणि बाळराजांची वाट बघतो आहे…
आपल्या घरात भारतीय विद्यार्थी सेनेचा कुलदीपक असताना
हा कोण नविन कुलदीपक ?…
साहेब, त्याचा आणि त्या लाखो विद्यार्थ्यांचा आपल्या भारतीय विद्यार्थी सेनेशी काहीच संबंध नाही…
मग मला कशाला ते बोलवताहेत?…
साहेब, तुमच्या भाषणावर आणि बाळराजांच्या भारदस्त आवाजावर ती पोरं जाम खूश आहेत…
अरेच्चा, माझ्या खंजीर, वाघनखं, कोथळा, अफझल खान, गद्दार, खोकेची चर्चा अख्ख्या ब्रहमांडात होत असेल याची मला कल्पनाच नव्हती…
साहेब, हे सगळं जुनं झालं… अलीकडेच तुम्ही हनुमंताने मशालीने लंका जाळली म्हणून भाषणांत सांगितलंत ना… पोरांना ते नवीन रामायण जाम आवडलंय… म्हणून ते तुमची वाट बघतायंत…
गड्या चल तर… पण तिथे जंतरमंतरवर तर हिंदीतच भाषण
करावं लागेल… माझ्या हिंदीचे वांदे आहेत… मराठीत भाषण केलं तर त्या पोरांना समजेल का?…
साहेब, तुमच्या हिंदीत आणि मराठीत तसा फारसा फरक नाहीच आहे… वाक्याच्या शेवटी है लावायला विसरू नका… की झालं हिंदी…
बरं बरं है…
साहेब, दिल्लीला पोचेपर्यंत आपण विमानात तुमच्या भाषणाचा सराव करूया…
नको रे… आयुष्यात एवढ्या मध्यरात्रीपर्यंत पहिल्यांदाच जागरण करतो आहे… मुख्यमंत्री असताना सुद्धा कधी एवढा जागलो नाही… हे सगळं मी पंतप्रधान होईन म्हणूनच करतो आहे… त्यामुळे विमानात मी पंतप्रधानपदाची शपथ पाठ करतो… पण बाळराजे कुठे आहेत?…
साहेब तुम्ही चला… ते नाईट क्लबमधून परस्पर येतो म्हणाले आहेत…
बरं बरं… चला चला…