Wednesday, August 12, 2026

पारधी समाजाच्या उत्कर्ष पर्वाला नवी दिशा

Share

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-सज्जनपुरी येथील सर्वोदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेत ८ ऑगस्ट रोजी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्ष पर्वाचा भव्य सोहळा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर उपस्थित होते. डॉ. भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. तसेच क्रीडांगण आणि प्रेक्षकगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

शिक्षणापासून दीर्घकाळ वंचित राहिलेल्या पारधी समाजाच्या मुला-मुलींना शिक्षण, स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने ही आश्रमशाळा २००८ मध्ये सुरू करण्यात आली. श्री सद्गुरू दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्ट, इंदूर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या प्रकल्पाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनामुळे नवी दिशा मिळाली.

आज २७ एकरांच्या निसर्गरम्य परिसरात पहिली ते दहावीपर्यंतची निवासी आश्रमशाळा कार्यरत असून येथे सुमारे ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये, क्रीडा आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी शासकीय, निमशासकीय तसेच पोलिस आणि संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी विभागीय आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या प्रकल्पाच्या कार्यात अमनोरा येस फाउंडेशनचेही महत्त्वाचे योगदान आहे. संस्थेने २०१४ पासून आश्रमशाळेचे उत्तरदायित्व स्वीकारून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधार दिला आहे.

पारधी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध संस्था आणि सेवाभावी व्यक्तींनी एकत्रितपणे उभारलेला हा प्रकल्प समाजाच्या मुख्य प्रवाहातील सहभागाची नवी वाट दाखवणारा ठरत आहे. शिक्षणातून आत्मविश्वास, कौशल्यातून स्वावलंबन आणि संस्कारातून राष्ट्रभावना रुजविण्याच्या या प्रयत्नातून पारधी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख