Thursday, August 13, 2026

शिळफाटा ते मुंबई अंतर होणार अवघ्या १०-१२ मिनिटांत पार होणार

Share

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग लवकरच सेवेत

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारलेला ऐरोली-कटाई नाका उन्नत मार्ग (एलिव्हेटेड फ्रीवे) लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असून, यामुळे शिळफाटा परिसरातील कायमची वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

मार्ग कसा असेल –

कल्याण-डोंबिवली-शिळफाटा-मुंब्रा आणि नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी MMRDA द्वारे १२.३ किमी लांबीचा हा महत्त्वपूर्ण मार्ग उभारण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये या स्वतंत्र उन्नत मार्गाला मंजुरी दिली होती. प्रत्यक्ष कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली. या दरम्यानच्या काळात काही लोकांनी कामात अडथळे आणले होते; मात्र, सर्व आव्हानांवर मात करून या महामार्गाचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.

ऐरोली – कटाई नाका उन्नत मार्ग (Elevated Road) नवी मुंबईतील ऐरोली पुलाच्या ठाणे-बेलापूर मार्गावरील पूर्व टोकापासून सुरू होतो; येथून हा मार्ग ठाणे-बेलापूर मार्गावरून उन्नत मार्गाद्वारे पलीकडे जातो आणि पारसिक टेकडीच्या दिशेने पुढे सरकतो.

त्यानंतर, हा मार्ग पारसिक टेकडीतून खोदलेल्या १.६९ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यातून (twin tunnel) पुढे मुंब्रा बायपास / राष्ट्रीय महामार्ग ४८ जवळ बाहेर पडतो; तिथून हा रस्ता दिवा-पनवेल रेल्वे मार्गाला समांतर अशा उन्नत पुलावरून पुढे जातो आणि थेट कल्याण-डोंबिवलीतील कटाई नाका येथे संपतो.

हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर शिलफाटा परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या टळेल आणि ऐरोली ते कटाई नाका ते डोंबिवली हा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांत पूर्ण करता येईल. कटवाई ते मुंब्रा या दुसऱ्या टप्प्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे; यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागेल. अशी अपेक्षा आहे.

प्रकल्पाची पार्श्वभूमी

कल्याण-डोंबिवली-शिळफाटा-मुंब्रा आणि नवी मुंबई/मुंबई दरम्यानच्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी हा १२.३ किलोमीटर लांबीचा स्वतंत्र उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली.

प्रवासाचा वेळ घटणार

हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडी टळणार असून, ऐरोली ते कटाई नाका ते डोंबिवली हा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या याच अंतरासाठी प्रवाशांना ६० ते ९० मिनिटे खर्ची घालावी लागतात, त्यामुळे हा मार्ग नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

या मार्गाचा पहिला व दुसरा टप्पा येत्या काही आठवड्यांत एकत्रितपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे ऐरोली पूल, ठाणे-बेलापूर रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग-४ यांना अखंडित जोडणी मिळणार असून, महापे, शिळफाटा आणि कल्याण फाटा यांसारख्या प्रमुख वाहतूक कोंडीच्या ठिकाणी मोठा फरक जाणवणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ, इंधन आणि वाहतूक खर्च वाचणार असून, नवी मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवली पट्ट्यातील मालवाहतूक व उद्योगधंद्यांनाही याचा फायदा होणार आहे.

नागरिकांना मोठा दिलासा

गेली अनेक वर्षे शिळफाटा आणि मुंब्रा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. एमएमआरडीएच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, या भागातील स्थावर मालमत्ता क्षेत्रालाही चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख