Tuesday, August 18, 2026

सर्दी-खोकल्याने हैराण? ४ पौष्टीक-पारंपरिक सूप रेसिपी

Share

नुकताच श्रावण महिना सुरू झाला, त्यामुळे ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अशा वातावरणात आजारपणं काही प्रमाणात वाढायला लागतात. लहान मुलांसोबतच ज्येष्ठ नागरीक, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना पटकन व्हायरल इन्फेक्शन होते. घशाला खवखव, ताप, खोकला, सर्दी, डोकं जाम होणे यांसारख्या समस्या उद्भवल्या की अस्वस्थ व्हायला होते. घरात एकाला हा त्रास झाला की वासाने इतरांनाही तो होतो आणि मग सगळेच आजारी पडतात. लहान मुलं तर शाळा, पाळणाघर, क्लासेस अशा ठिकाणी जात असल्याने हे व्हायरल इन्फेक्शन पटकन पसरते. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलं असो किंवा मोठे अस्वस्थता, सर्दी-ताप असेल की अन्न नको वाटते.


पोटात अन्न नसेल तर ताकद राहत नाही आणि औषधेही घेता येत नाहीत. सर्दी आणि हवेत गारठा असल्याने आपल्याला गरम काहीतरी प्यावेसे वाटते. अशावेळी मोठ्यांना चहा किंवा कॉफीचा पर्याय असतो. पण तेही प्रमाणापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. मग शरीरात ताकदही टिकून राहील, पोषणही मिळेल आणि गरमागरमही असेल असा एक पदार्थ म्हणजे सूप. आपल्याला साधारणपणे भाज्यांचे किंवा टोमॅटोचे सूप माहित असते. पण घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता येतील असे काही पारंपरिक सूपचे प्रकार आज आपण पाहणार आहोत.

१. हुलग्याचे किंवा कुळथाचे सूप – कुळीथ, हुलगे हा साधारणपणे कोकणात पिकला आणि खाल्ला जाणारा पदार्थ. कडधान्य म्हणून किंवा पिठाच्या स्वरुपात कुळीथ खातात. कुळथामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर आणि लोह असते. त्यामुळे शक्ती भरुन येण्यासाठी आणि शरीराचे पोषण होण्यासाठी कुळीथ अतिशय उपयुक्त मानले जाते. पावसाळ्याच्या दिवसांत पालेभाज्या, फळं यांपेक्षा कडधान्य खाणे कधीही फायदेशीर ठरते. कुळथाच्या पीठात पाणी घालून ते सारखे करावे. यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालावे. जीऱ्याची फोडणी करुन त्यात भरपूर लसून ठेचून किंवा चिरुन घालावा. आवडीप्रमाणे फोडणीमध्ये लाल मिरची, आमसूल घालू शकता. आमसूल घातल्यास थोडी साखर घातल्यास चव चांगली लागते. कुळीथ पीठ भरपूर फुगते त्यामुळे जास्त पाणी घालून हे पातळसर गरमागरम सूप प्यायल्यास घशाला आराम मिळतो आणि तरतरी आल्यासारखे वाटते.


२. कडधान्याचे कढण – आपण कडधान्याची उसळ, मिसळ, डोसे असे खातो. पण याच कडधान्यांपासून अतिशय चविष्ट असे सूपही करता येते. यासाठी मोड आलेले वाटीभर कडधान्य मिक्सरमधून फिरवून घ्यावे. मिक्सरमध्येच आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर घालावे. हे मिश्रण खाली उतरवून त्यामध्ये ताक, मीठ, साखर, धणे-जीरे पावडर घालावी. त्यानंतर भरपूर पाणी घालून तूप आणि जीऱ्याची फोडणी द्यावी. फोडणीत हिंग घातल्यास याला अतिशय उत्तम चव येते. उकळायला ठेवलेले असताना यात आवडीप्रमाणे ओले खोबरे, कोथिंबीर घातल्यास सूपाची पौष्टीकता आणि चव आणखी वाढते. कडधान्यांमध्ये प्रथिने असल्याने अन्न जात नसेल तर हे सूप पूर्णान्न होऊ शकते.


३. भाज्यांचे सूप – घरात उपलब्ध असलेल्या कोबी, गाजर, टोमॅटो, फ्लॉवर, स्वीट कॉर्न, बीट, कोथिंबीर, श्रावण घेवडा अशा कोणत्याही भाज्या बारीक चिरुन घ्याव्यात. त्यामध्ये भरपूर पाणी घालून त्या शिजवाव्यात. शिजताना त्यात मीठ आणि मिरपूड घालावी. आवडीप्रमाणे लसूण, आलं, दालचिनी, लवंग घातल्यास चव तर वाढतेच पण सर्दी पडसे कमी होण्यासही या मसाल्यांचा चांगला उपयोग होतो.


४. मूगाचे सूप – मूगाची डाळ २ ते ३ तासांसाठी भिजत घालावी. ती कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्य़ा घेऊन चांगली शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ हाटून त्यात भरपूर पाणी घालावे. हळद, मीठ, मीरपूड घालून डाळ एकजीव करावी. तूपात जीरे आणि हिंगाची फोडणी देऊन हे पातळसर सूप प्यावे. आवडीप्रमाणे यातही लसूण, कोथिंबीर घालू शकतो. मूग पचायला हलके तर असतातच पण त्यात प्रथिने चांगली असल्याने घशाला आराम मिळण्यासोबतच थकवा दूर होतो.

अन्य लेख

संबंधित लेख