Sunday, September 6, 2026

अन्नभेसळ रोखणारी कडक पावले

Share

अन्न ही केवळ माणसाची गरज नाही, तर भारतीय समाजव्यवस्थेत ती सेवा, संस्कृती आणि श्रद्धेशी जोडलेली परंपरा आहे. मंदिरातील महाप्रसाद असो, भंडारा असो, गुरुद्वारातील लंगर असो किंवा रमजानमधील इफ्तार—हजारो लोकांना एकाच ठिकाणी अन्न देण्याची परंपरा भारताच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र या सामूहिक अन्नदानामागे एक गंभीर प्रश्नही उभा राहतो. मोठ्या प्रमाणावर तयार केलेले आणि हजारो लोकांना दिलेले अन्न सुरक्षित आहे का? गेल्या काही वर्षांत देशातील विविध भागांत सामूहिक जेवण, महाप्रसाद, लंगर आणि इफ्तारनंतर मोठ्या संख्येने लोक आजारी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही घटनांमध्ये अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले; तर काही ठिकाणी नेमके कारण तपासणीनंतरच स्पष्ट होईल. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सामूहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमांकडे अधिक काटेकोरपणे पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

विषबाधेच्या घटना नेमके काय सांगतात?

फेब्रुवारी २०२४ मध्ये परभणी जिल्ह्यात महाप्रसादानंतर सुमारे ८०० गावकऱ्यांना विषबाधा झाली. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने संबंधित भगर जप्त केली. एप्रिल २०२४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथील दुर्गा मंदिरातील नवरात्र महाप्रसादानंतर २५० भाविकांना विषबाधा झाली आणि एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. सन २०२५ मध्ये कोल्हापूर परिसरात शिवनाकवाडी येथे यात्रेतील महाप्रसादानंतर ७०० हून अधिक लोकांना अन्नातून विषबाधा झाली. मार्च २०२६ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेत लस्सी प्यायल्यानंतर ४३ भाविकांना त्रास झाला.

लंगरमध्ये विषबाधा

मार्च २०२५ मध्ये पंजाबमधील बिनेवाल येथे मंदिरात लंगरचे भोजन केल्यानंतर १७ जण आजारी पडले. त्यात १० मुलांचा समावेश होता. याहून मोठी घटना जुलै २०२६ मध्ये राजस्थानच्या भवानीमंडी येथे समोर आली. ईदगाह परिसरात लंगरचे भोजन केल्यानंतर ३०० पेक्षा जास्त लोक आजारी पडले. सुमारे ३,५०० लोकांसाठी भोजन तयार करण्यात आले होते.

इफ्तारच्या कार्यक्रमांतही अन्नसुरक्षेचा प्रश्न

मार्च २०२३ मध्ये पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलतली येथे इफ्तारनंतर मोठ्या संख्येने लोक आजारी पडले होते. एप्रिल २०२३ मध्ये मध्य प्रदेशातील मंदसौर येथे इफ्तार कार्यक्रमा नंतर सुमारे १०० लोक आजारी पडले. उलटी, जुलाब आणि अस्वस्थतेची लक्षणे दिसल्यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सरकारच्या निर्णयाचे महत्त्व

महाराष्ट्र FDAची सध्याची मोहीम केवळ “परवानगी घेण्याची प्रक्रिया” म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. त्यामागे तीन महत्त्वाचे उद्देश आहेत. घटना होण्यापूर्वी प्रतिबंध करण्यासाठी विषबाधा झाल्यानंतर रुग्णालये, आरोग्य विभाग आणि FDA धावपळ होते. ते करण्यापेक्षा कार्यक्रमाआधीच अन्न तयार करण्याच्या पद्धतीची माहिती मिळणे. आणि जबाबदारी निश्चित करुन अन्न कोण बनवत आहे? कुठे बनवत आहे? कच्चा माल कुठून आणला? स्वंयपाकी कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे. अन्नदानाची परंपरा अधिक सुरक्षित करणे.

आयोजकांनी काय काळजी घ्यावी?

मोठ्या सामूहिक भोजनाचे आयोजन करणाऱ्या मंडळांनी किंवा संस्थांनी काही मूलभूत गोष्टी काटेकोर पाळणे आवश्यक आहे. कच्चा माल विश्वसनीय आणि परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करावा. स्वयंपाक आणि पिण्यासाठी सुरक्षित पाणी वापरावे. स्वयंपाकघर जागा स्वच्छ, हवेशीर आणि कीटकांपासून सुरक्षित असावी.
कर्मचाऱ्यांनी हात स्वच्छ धुणे, स्वच्छ कपडे, डोक्यावर टोपी/हेअरनेट आणि आवश्यक संरक्षण साधने वापरणे महत्त्वाचे आहे. कच्चे व शिजलेले अन्न दोन्ही स्वतंत्र ठेवावे. अन्न साठवणूक शिजवलेले अन्न कित्येक तास उघडे ठेवणे टाळावे. दूध, दही, लस्सी, मावा, पनीर हे पदार्थ विशेष काळजीपूर्वक साठवावे. उरलेले अन्न दीर्घकाळ ठेवलेले अन्न पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाटणे टाळावे. कॅटरर मोठ्या कार्यक्रमासाठी अधिकृत आणि नियमांचे पालन करणारा कॅटरर वापरणे.

– अरुण कराड

अन्य लेख

संबंधित लेख