मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा कार्यालये सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातही स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू करून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात किमान ५०० चौरस फुटांची जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले.
नंदुरबार येथे साहित्यसमवेत संवाद व आढावा बैठक बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाले. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.सामंत बोलत होते. या परिषदेस आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.अनबलगन पी, मराठी भाषा विभागाचे भाषा संचालक डॉ.अरुण गिते, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी आदी उपस्थित होते.
वाहरू सोनवणे यांच्या गावाला ‘पुस्तकांचे आणि कवितांचे गाव’ करणार
ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे यांच्या श्रीखेडा गावाला ‘पुस्तकांचे आणि कवितांचे गाव’ करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच आदिवासी साहित्य, बोलीभाषा आणि मौखिक साहित्य परंपरेला मुख्य प्रवाहातील मराठी साहित्याशी जोडण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नंदुरबारच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा
नंदुरबार जिल्हा गुंतवणूक परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील औद्योगिक संधी, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या विविध शक्यतांवर सविस्तर चर्चा झाली.
या परिषदेत ५,००४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव मांडणारे १२३ सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. या गुंतवणुकीतून ७,७७८ रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रात ४,७८७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव आहे.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. पी. अनबलगन, उद्योग सहसंचालक श्रीमती वृषाली सोने, नंदुरबारचे जिल्हाधिकारी श्री. अपार गोगटे, एमआयडीसीचे (MIDC) उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शंकर बर्गे, नंदुरबार इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. नरेंद्र अग्रवाल, ‘मैत्री’चे नोडल अधिकारी श्री. रवीराज इलवे, महाव्यवस्थापक (DIC) श्री. निलेश गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.