——————————————–
प्रथम प्रकाश, भारताच्या विविध प्रदेशांतून आलेली वाणी आणि गुरुगादीचा ऐतिहासिक प्रवास
——————————————–
आजचा प्रथम प्रकाश
आज २७ भादों, नानकशाही संवत ५५८. श्री गुरु ग्रंथ साहेब जी यांच्या प्रथम प्रकाशाचा दिवस. हा दिवस इतिहासातील भादों सुदी १, विक्रमी संवत १६६१ या महत्त्वपूर्ण प्रसंगाची आठवण करून देतो. श्री गुरु अर्जन देव जी यांनी आदि ग्रंथाची श्री हरिमंदिर साहिबमध्ये प्रतिष्ठापना केली आणि बाबा बुधा जी यांची पहिली ग्रंथी म्हणून नियुक्ती केली.
आदि ग्रंथाच्या संकलनात गुरु नानक देव जी, गुरु अंगद देव जी, गुरु अमर दास जी, गुरु राम दास जी आणि गुरु अर्जन देव जी यांची वाणी एकत्र आली. त्यासोबत भगतांची वाणी, भट्टांची रचना आणि सत्ता जी, बलवंड जी व बाबा सुंदर जी यांच्या रचनांनाही स्थान मिळाले. भाई गुरदास जी यांनी आदि ग्रंथाचे लेखन केले. पुढे गुरु तेगबहादूर जी यांची वाणी समाविष्ट झाल्यानंतर श्री गुरु ग्रंथ साहेब जी यांचे पूर्ण स्वरूप आकाराला आले.
भारताच्या विविध प्रदेशांतील संतवाणी
या वाणीविश्वात महाराष्ट्राचा स्वर विशेष ठळकपणे उमटतो. भगत नामदेव जी, भगत त्रिलोचन जी आणि भगत परमानंद जी यांच्या रचनांना श्री गुरु ग्रंथ साहेब जी मध्ये स्थान मिळाले. नरसी नामदेव हे भगत नामदेव जी यांच्या स्मृतीशी जोडलेले महत्त्वाचे स्थान आहे.
उत्तर भारतातील संतपरंपरेतून कबीर जी, रविदास जी, रामानंद जी, भिखन जी, बेणी जी आणि सूरदास जी यांची वाणी आली. पीपा जी आणि धन्ना जी यांच्या परंपरा राजस्थान व मध्य भारताशी जोडल्या जातात. साधना जी यांची परंपरा सिंधशी, तर जयदेव जी यांची परंपरा पूर्व भारताशी जोडली जाते. पंजाबच्या भूमीशी संबंधित शेख फरीद जी यांच्या वाणीलाही श्री गुरु ग्रंथ साहेब जी मध्ये स्थान मिळाले.
भगत सैन जी यांचे नाव मध्य भारतातील बांधवगड-रेवा प्रदेशाशी जोडलेले आहे. परंपरेनुसार ते बांधवगडच्या राजाच्या दरबारात नाई म्हणून सेवा बजावत होते. श्री गुरु ग्रंथ साहेब जी मध्ये त्यांचा एक शबद राग धनासरीमध्ये आहे.
श्री गुरु ग्रंथ साहेब जी मध्ये स्थान पावलेल्या पंधरा भगतांची नावे आहेत—कबीर जी, त्रिलोचन जी, बेणी जी, रविदास जी, नामदेव जी, धन्ना जी, जयदेव जी, भिखन जी, सैन जी, पीपा जी, साधना जी, रामानंद जी, परमानंद जी, सूरदास जी आणि शेख फरीद जी.
भट्टवाणी
श्री गुरु ग्रंथ साहेब जी मधील भट्टवाणी हा स्वतंत्र आणि महत्त्वाचा भाग आहे. भट्टांच्या रचना सवय्ये या काव्यरूपात ग्रंथाच्या उत्तरार्धात येतात. त्यांच्या वाणीत गुरूंच्या परंपरेचे गौरवगान आणि गुरूज्योतीच्या अखंडतेचे दर्शन घडते.
शबद आणि भारतीय संगीतपरंपरा
विविध गुरू, भगत आणि भट्टांची वाणी एकत्र आल्यानंतर तिची मांडणी भारतीय संगीतपरंपरेतील रागांच्या आधारे करण्यात आली. श्री गुरु ग्रंथ साहेब जी मध्ये ३१ प्रमुख राग आहेत. राग, रचनाप्रकार, रचनाकार आणि घर या निर्देशांमधून बाणीचे गायनरूपही ग्रंथाच्या रचनेत स्पष्ट होते. ग्रंथाच्या अखेरीस रागमाला हा स्वतंत्र भाग येतो. त्यामुळे शबद आणि संगीत यांचे नाते श्री गुरु ग्रंथ साहेब जी यांच्या रचनाव्यवस्थेतच जपलेले दिसते.
गुरु तेगबहादूर जी यांची वाणी
पुढे गुरु तेगबहादूर जी यांची वाणी श्री गुरु ग्रंथ साहेब जी मध्ये समाविष्ट झाली. त्यांच्या बाणीतील रचना १५ रागांमध्ये असून ५७ सलोकांनाही श्री गुरु ग्रंथ साहेब जी मध्ये स्थान मिळाले. गुरु गोबिंद सिंह जी यांनी ही वाणी ग्रंथाच्या पूर्ण स्वरूपात समाविष्ट केली.
नांदेड : शबदाला गुरुगादी
इतिहासाचा हा प्रवास अखेर नांदेडच्या गोदावरीकाठी येऊन पूर्णत्वाला पोहोचतो. विक्रमी संवत १७६५, कार्तिक शुक्ल पक्षातील चतुर्थी, बुधवार, नांदेड येथे गुरु गोबिंद सिंह जी यांनी श्री गुरु ग्रंथ साहेब जी समोर पाच पैसे आणि नारळ अर्पण करून मस्तक टेकवले आणि आपल्या स्थानावर श्री गुरु ग्रंथ साहेब जी यांना गुरु मानण्याची आज्ञा केली. या प्रसंगाची नोंद भट्ट-वहीत आहे.
यापुढे गुरुस्थान श्री गुरु ग्रंथ साहेब जी यांच्यात अखंडपणे प्रतिष्ठित झाले. आजच्या प्रथम प्रकाशाच्या दिवशी हा संपूर्ण प्रवास पुन्हा स्मरणात येतो—महाराष्ट्रातील नामदेव जींपासून मध्य भारतातील सैन जींपर्यंत, उत्तर भारतातील कबीर जी आणि रविदास जींपासून सिंधच्या साधना जींपर्यंत आणि पूर्व भारतातील जयदेव जींपासून पंजाबच्या शेख फरीद जींपर्यंत विविध संतपरंपरांची वाणी गुरूंच्या बाणीसोबत एका महान शबदविश्वात सामावली. रागांच्या मांडणीतून या वाणीचे गायनरूप जपले गेले आणि नांदेड येथे त्याच ‘ शबदा ‘ ला गुरुगादी प्राप्त झाली.
प्रथम प्रकाश म्हणजे त्या अखंड ‘ शबद ‘ प्रकाशाचे स्मरण—आणि श्री गुरु ग्रंथ साहेब जी हे त्या ‘ शबदा ‘ चे अखंड गुरुस्थान.
-राज भाटिया
स्रोत
१. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (SGPC) — Sri Guru Granth Sahib : ग्रंथाची रचना, १५ भगत, ३१ राग, घर आणि रागमाला.
२. SGPC — Sri Guru Arjan Dev Ji / Sri Harmandir Sahib : भादों सुदी १, विक्रमी संवत १६६१, प्रथम प्रकाश आणि बाबा बुधा जी.
३. SGPC — १२ सप्टेंबर २०२६ची अधिकृत नोंद : २७ भादों, नानकशाही संवत ५५८.
४. Pashaura Singh, Oxford University Press — The Bhagats of the Guru Granth Sahib.
५. Pashaura Singh, Oxford University Press — The Guru Granth Sahib: Canon, Meaning and Authority.
६. The Sikh Encyclopedia / Punjabi University — Bhagat Bani आणि Sain.
७. The Sikh Encyclopedia / Punjabi University — Bhatt Bani.
८. मराठी विश्वकोश — “नामदेव”.
९. SGPC — Guru Tegh Bahadur Sahib.
१०. Encyclopedia of Sikhism, Punjabi University — Sri Guru Granth Sahib आणि Bhatt-Vahis : नांदेड येथील गुरुगादी प्रसंग.