गणेशमूर्ती मोठी असण्यापेक्षा त्यामागील भक्ती, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक महत्त्वाची आहे. गणेशोत्सवासारखा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश केवळ सांगण्यापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून घराघरात पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘पर्यावरणपूरक महा गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मूर्ती निर्मितीचा अनुभव देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यशाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींचे कौतुक केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांनी स्वतः शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारली. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आपल्यासोबत बाप्पाची मूर्ती घडवत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. मंत्री पंकजा मुंडे यांनीही मूर्ती निर्मितीत सहभागी होत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सवातील भक्ती आणि पर्यावरण यांचा संबंध अधोरेखित केला. मूर्ती मोठी असो वा लहान, भक्तीची भावना तितकीच असते. ईश्वराचा आशीर्वाद मूर्तीच्या आकारावर अवलंबून नसून आपण समाजाची आणि पर्यावरणाची किती सेवा करतो, याला अधिक महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची सवय आणि पर्यावरणपूरक उत्सवाची संस्कृती पुढील पिढीपासूनच रुजविण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर मूर्तींची प्रतिष्ठापना आणि विसर्जन केले जाते. त्यामुळे मूर्ती तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, रंग तसेच विसर्जनानंतर निर्माण होणारा कचरा आणि जलप्रदूषण याबाबत पर्यावरणीय चिंता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर शाडू मातीच्या मूर्तींचा वापर हा पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पुढे आणला जात आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीची मूर्ती तयार केल्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यशाळेत करण्यात आला.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची जागतिक विक्रमाची नोंद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे हजारो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या. एकाच वेळी सर्वाधिक मुलांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा केवळ शासनाचा उपक्रम न राहता तो लोकचळवळ बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः मूर्ती घडवल्यामुळे पर्यावरण संवर्धनाची भावना त्यांच्या अनुभवातून निर्माण झाली. हीच भावना त्यांनी आपल्या कुटुंबात आणि परिसरात पोहोचविल्यास पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना अधिक व्यापक होऊ शकते.
श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. बाप्पाच्या भक्तीत पर्यावरणाची काळजी जोडली, तर उत्सवाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक समृद्ध होईल, असा विश्वास या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला. हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेल्या गणेशमूर्ती आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद यामुळे ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६’ हा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.