नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारणार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची माहिती
प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी. या उदयोन्मुख क्षेत्रात भारतीय उद्योगाने जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
भारतातील रत्न व आभूषण उद्योगातील उत्कृष्टता, नेतृत्व आणि उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारा ५२ वा ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’ सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
भारताकडे पायाभूत सुविधा, ऊर्जा, भांडवल आणि उद्यमशील व्यापारी वर्गाचे सामर्थ्य आहे. लॅबग्रोन डायमंडची जागतिक बाजारपेठ आगामी काळात मोठ्या प्रमाणात विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संधी ओळखून भारतीय उद्योगाने केवळ कामाची गतीच नव्हे, तर व्यवसायाची व्याप्तीही वाढवावी. भारतीय कंपन्यांनी जागतिक ब्रँड निर्माण करून प्रमुख शहरांमध्ये स्वतःची विक्री केंद्रे उभारावीत. यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.
रत्न व आभूषण उद्योगासाठी नवी मुंबईत मोठी जागा आणि आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्याची भूमिका मांडली आहे.
नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे एक लाख कोटींची गुंतवणूक, ५० हजार रोजगार अपेक्षित
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशाच्या निर्यातीत तसेच आर्थिक विकासात रत्न व आभूषण उद्योगाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या उद्योगाला पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुलभ दळणवळणाची जोड देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधून सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.