रविवारी दुबईत पार पडलेल्या आशियाई अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर, भारतीय महिला संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून आशिया चषकाचे विजेतेपद स्वीकारण्यास ठाम नकार दिला. गेल्या वर्षी भारतीय पुरुष संघाने घेतलेल्या भूमिकेचीच पुनरावृत्ती महिला संघाने केली आहे.
मैदानावरील निकालापेक्षा ‘तत्त्व’ महत्त्वाचे मानत भारताने आपली जुनी भूमिका कायम ठेवली आणि नक्वी यांच्याकडून चषक (ट्रॉफी) स्वीकारण्यास पुन्हा एकदा नकार दिला .
श्रीलंकेची शेवटची विकेट पडल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ तब्बल ४० मिनिटे लांबला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री असलेले मोहसीन नक्वी सामन्याच्या बहुतेक काळात उपस्थित नव्हते; मात्र सामना संपण्याच्या १५ मिनिटे आधी ते स्टेडियममध्ये दिसले. त्यांच्या आगमनामुळे बक्षीस वितरणावरून वातावरण लगेचच तापले.
समारंभाची सुरुवात सामनाधिकारी आणि श्रीलंकेच्या संघाला पारितोषिके देऊन झाली. श्रीलंकेची कर्णधार चमारी अथापत्तू हिने नक्वी यांच्याकडून उपविजेतेपदाचा धनादेश आणि पदके स्वीकारली. मात्र, विजेतेपदाचा चषक स्वीकारण्यासाठी भारतीय खेळाडू मंचावर गेलेच नाहीत.
पर्यायी व्यक्तीकडून चषक देण्यावर एकमत न झाल्यामुळे भारतीय संघाला ‘ट्रॉफी’ न मिळताच समारंभ आटोपता घ्यावा लागला. या दरम्यान बीसीसीआय अधिकारी देवाजित सैकिया आणि राजीव शुक्ला भारतीय खेळाडूंशी चर्चा करताना दिसले. अखेर चषक उंचावण्याच्या पारंपरिक क्षणाशिवायच थेट प्रक्षेपण थांबवण्यात आले.
हा प्रकार म्हणजे २८ सप्टेंबर २०२५ रोजी याच दुबई स्टेडियमवर पार पडलेल्या पुरुष आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातील वादाची पुनरावृत्ती होती. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता, पण नक्वी यांच्याकडून चषक घेण्यास नकार दिला होता. भारतीय संघ ‘ट्रॉफी’ आणि विजेतेपदाची पदके न घेताच परतला होता.
त्या घटनेनंतर बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी स्पष्ट केले होते की, नक्वी हे केवळ एसीसी अध्यक्ष नसून पाकिस्तानचे वरिष्ठ राजकीय नेतेही आहेत, म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला. नक्वी यांनी ट्रॉफी आणि पदके स्वतःसोबत घेऊन जाणे “अत्यंत दुर्दैवी आणि खेळाडूवृत्तीस धरून नाही,” असे सांगत बीसीसीआय आयसीसीकडे याबद्दल “तीव्र निषेध” नोंदवेल, असा इशारा सैकिया यांनी दिला होता.

हा वाद अनेक आठवडे सुरू होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये सैकिया यांनी माहिती दिली होती की बीसीसीआय आणि नक्वी यांच्यात या विषयावर चर्चा झाली असून, हा मुद्दा लवकरात लवकर सोडवण्याची गरज दोघांनाही पटली आहे.
मुजुमदार यांच्याकडून बीसीसीआयच्या निर्णयाचे समर्थन
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी संघ बीसीसीआयच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत असल्याचे स्पष्ट केले.
“हा बीसीसीआयचा निर्णय आहे आणि आम्ही त्याच्या पाठीशी ठाम आहोत. आमच्यासाठी ही स्पर्धा इथेच संपली आहे. आम्ही विजेते आहोत आणि तेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.”
स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर दाखवलेल्या निकालाचा उल्लेख करत मुजुमदार म्हणाले की, स्क्रीनवर भारताला ‘आशिया चषक २०२६ चे विजेते’ घोषित करण्यात आले आहे. संघाला या कामगिरीचा अभिमान असून आता सर्वांचे लक्ष आशियाई खेळांकडे आहे.
खेळाडू आणि सहाय्यक यांच्यासह संपूर्ण संघाचा अभिमान असल्याचे सांगत ते म्हणाले, “आम्ही चॅम्पियन बनलो याचा आनंद आहे.” मात्र, संघाला हा चषक कधी आणि कसा मिळेल याबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी मान्य केले.
या ताज्या घटनेमुळे या वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. आशिया चषक जिंकूनही भारतीय महिला संघाला पुन्हा त्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले, कारण एसीसी अध्यक्ष स्वतः बक्षीस वितरणासाठी उपस्थित होते.
मैदानावर मात्र भारतीय संघाने ७२ धावांनी विजय मिळवत पूर्ण वर्चस्व गाजवले. शेफाली वर्माच्या ६८ आणि स्मृती मानधनाच्या ५९ धावांच्या जोरावर भारताने ५ बाद १८३ धावा केल्या. त्यानंतर श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी मिळून ७ विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव १११ धावांवर गुंडाळला. या विजयासह भारताने विक्रमी आठव्यांदा महिला आशिया चषक विजेतेपदावर आपले नाव कोरले.
पण दुबईतील अंतिम चित्र चषक उंचावणाऱ्या विजेत्यांचे नव्हते, तर मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्विकारण्यास नकार दिल्यानंतर अपूर्ण राहिलेल्या बक्षीस वितरण समारंभाचे होते.
भारताचा संदेश अगदी स्पष्ट होता: बक्षीस वितरण योजनेनुसार झाले नसले, तरीही हे विजेतेपद संघाचेच आहे.
– राजेश कोरडे