इस्माईली समुदायाचे ५० वे इमाम, प्रख्यात समाजसेवक आणि ‘आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क’चे अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी काल मुंबईतील लोकभवन येथे यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान, प्रिन्स रहीम आगा खान यांनी सांगितले की, ‘आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क’ शहरांसाठी हवामान कृती आराखड्यांवर काम करत आहे आणि महाराष्ट्रात ‘कूलिंग’साठी (तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी) नाविन्यपूर्ण उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे. हवामान कृती आणि पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य करण्यासही त्यांनी उत्सुकता दर्शविली.
राज्यपाल वर्मा यांनी उपजीविका विकासाच्या, विशेषतः आदिवासी आणि ग्रामीण भागातील कामांसाठी या नेटवर्कसोबत सहकार्य करण्यात रस दाखवला. शिक्षण, पर्यावरण, हवामान कृती आणि उपजीविका निर्मिती या क्षेत्रांतील भागीदारीचा फायदा राज्यातील नागरिकांना होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
प्रिन्स रहीम आगा खान यांनी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही बाजूंनी सामाजिक विकास, आरोग्यसेवा, हवामान कृती, जलव्यवस्थापन, वारसा जतन आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) उपक्रमांबाबत चर्चा केली.
हिरवळीचे क्षेत्र वाढवून, शाश्वत शहरी नियोजन आणि हवामान कृतीद्वारे शहरातील उष्णता कमी करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या अभ्यासाची माहिती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिली. अशा उपक्रमांचा फायदा महाराष्ट्रातील शहरांना होऊ शकतो, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
तीव्र हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मीरा-भाईंदर, चंद्रपूर यांसह विविध शहरांमध्ये हवामान कृती, उत्सर्जन कमी करणे आणि शीतकरण उपाययोजनांवर नेटवर्ककडून काम सुरू असल्याची माहिती प्रिन्स रहीम आगा खान यांनी राज्यपाल वर्मा यांना दिली. तसेच वसई परिसरातील तलाव व जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील आदिवासी व ग्रामीण भागातील उपजीविका विकासाच्या क्षेत्रातही आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने काम करण्याचा विचार करावा, अशी अपेक्षा राज्यपाल वर्मा यांनी व्यक्त केली. शिक्षण, पर्यावरण, हवामान कृती आणि उपजीविका विकासातील भागीदारीमुळे जनतेला दीर्घकालीन व अर्थपूर्ण लाभ मिळू शकतील, असे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी प्रिन्स रहीम आगा खान यांना त्यांच्या दिवंगत वडिलांचे, करीम आगा खान चौथे आणि मातोश्रींचे तत्कालीन राज्यपालांसोबतचे गेल्या 50 वर्षांतील छायाचित्रांचा विशेष अल्बम भेट दिला. राजभवनातील आपल्या दिवंगत वडिलांच्या आठवणींना उजाळा देणारी छायाचित्रे पाहून प्रिन्स रहीम आगा खान भावूक झाले आणि “हे खरोखरच भावुक करणारे आहे. अप्रतिम!” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.