Tuesday, September 15, 2026

रामभक्तांचे स्फूर्तीस्थान अशोकजी सिंघल

Share

काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, ज्यांच्या एका हुंकाराने संपूर्ण देश जागा होतो आणि ज्यांच्या निष्ठावान नेतृत्वाखाली इतिहास आपली दिशा बदलतो. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे नायक, संन्यासी आणि योद्धा अशी ओळख असलेले अशोकजी सिंघल हे असेच एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व! परंतु, स्वतःला ते कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक साधे ‘प्रचारक’ मानत राहिले.

संस्कारांचे बाळकडू आणि संघप्रवेश

अशोकजींचा जन्म १५ सप्टेंबर १९२६ रोजी आग्रा येथे झाला. उच्च शासकीय पदावर असलेल्या महावीरजींचे ते सुपुत्र. घरात साधू-संत आणि विद्वानांची सतत ये-जा असायची; त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनात सनातन धर्म आणि संस्कृतीविषयीचे प्रेम रुजले. १९४२ मध्ये प्रयागराज येथे शिक्षण घेत असताना, प्रा. राजेंद्र सिंह (रज्जू भैया) यांच्या संपर्कात ते आले. रज्जू भैयांनी अशोकजींच्या मातोश्री विद्यावतीजींना संघाची प्रार्थना ऐकवली, जी ऐकून त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी अशोकजींना शाखेत जाण्यास सहर्ष परवानगी दिली.

शास्त्रीय संगीताची आवड आणि अभियांत्रिकीचे शिक्षण

अशोकजींचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. बालपणापासूनच त्यांना शास्त्रीय गायनाची विशेष आवड होती. संघाच्या शेकडो ध्येयगीतांना त्यांनी स्वतः स्वरबद्ध केले. त्यांनी काशी हिंदू विद्यापीठातून ‘मेटॅलर्जी’ (धातूशास्त्र) या विषयात इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

१९४७ च्या फाळणीनंतर देशातील राजकीय परिस्थिती आणि सत्तालोलुपता पाहून देशाच्या भवितव्याविषयी त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. १९४८ मध्ये संघावर बंदी आली तेव्हा त्यांनी सत्याग्रह करून तुरुंगवास भोगला. तुरुंगातून आल्यावर अंतिम परीक्षा पूर्ण केली आणि १९५० मध्ये पूर्णवेळ प्रचारक म्हणून देशसेवेचे व्रत घेतले.

संघटनकौशल्य आणि आणीबाणीतील लढा

प्रचारक म्हणून त्यांनी गोरखपूर, प्रयागराज, सहारनपुर आणि कानपूर येथे कार्य केले. कानपूरमध्ये त्यांना वेदांचे प्रकांड विद्वान श्री रामचंद्र तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. परमपूजनीय सरसंघचालक श्री गुरुजी आणि तिवारीजी यांचा त्यांच्या जीवनप्रवासावर गाढा प्रभाव होता.

१९७५ मध्ये देशावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीविरोधात जनमानस संघटित करण्यात अशोकजींचा मोठा वाटा होता. १९७७ मध्ये त्यांनी दिल्ली प्रांताचे ‘प्रांत प्रचारक’ म्हणून जबाबदारी सांभाळली.

विश्व हिंदू परिषद आणि श्रीराम जन्मभूमी आंदोलन

१९८१ मध्ये डॉ. कर्णसिंह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘विराट हिंदू संमेलना’च्या यशामागे अशोकजींची संघटनशक्ती होती. त्यानंतर त्यांच्याकडे ‘विश्व हिंदू परिषदे’ची (VHP) धुरा सोपवण्यात आली.

एकात्मता रथयात्रा, संस्कृती रक्षा निधी, रामजानकी रथयात्रा, रामशिला पूजन आणि रामज्योती यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी विहिंपास देशाच्या घराघरांत पोहोचवले. यासोबतच बजरंग दल, गो-सेवा, गंगा रक्षण, एकल विद्यालय, परावर्तन आणि संस्कृत संवर्धनाचे अनेक नवे आयाम जोडले.

संतांचे एकत्रीकरण आणि ऐतिहासिक नेतृत्व

भारतातील विविध पंथ आणि संप्रदायाच्या संतांना एका व्यासपीठावर आणणे हे अत्यंत कठीण काम होते. परंतु, अशोकजींची विनम्रता, धर्माविषयीची अपार निष्ठा आणि संयमी स्वभावामुळे देशभरातील लाखो संत या आंदोलनाशी जोडले गेले.

अयोध्या आंदोलनादरम्यान प्रशासनाने त्यांच्यावर अनेकदा अयोध्येत येण्यास बंदी घातली; परंतु दरवेळी प्रशासनाची नजर चुकवून ते अयोध्येत पोहोचायचे. त्यांच्या अचाट संघटन आणि नेतृत्वक्षमतेचाच हा परिणाम होता की ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील कलंकित ढाचा कोसळला आणि राम मंदिर उभारणीच्या नव्या युगाचा पाया रचला गेला. विहिंपात त्यांनी संयुक्त महामंत्री, महामंत्री, कार्याध्यक्ष, अध्यक्ष आणि संरक्षक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली.

शेवटच्या श्वासापर्यंत कार्यमग्न

अशोकजींनी आपल्या कार्याचा विस्तार जगातील प्रमुख देशांमध्ये केला. ऑगस्ट-सप्टेंबर २०१५ मध्येही वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी इंग्लंड, हॉलंड आणि अमेरिकेचा दौरा केला. वयाच्या अखेरच्या टप्प्यातही त्यांची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होती. दररोज परिषदेच्या कार्यालयात लागणाऱ्या शाखेत ते नियमित जात असत.

फुफ्फुसाच्या संसर्गामुळे १७ नोव्हेंबर २०१५ रोजी या महान कर्मयोग्याने जगाचा निरोप घेतला.

अन्य लेख

संबंधित लेख