Wednesday, September 16, 2026

महाराष्ट्रीयन स्वादाची मेजवानी.. 

Share

गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्राचाच नाहीतर संपूर्ण भारताचा एक समरस,सांस्कृतिक लोकोत्सव आहे. या मंगलमयी उत्सवाचे पडसाद आता केवळ घराघरांमध्ये किंवा गल्लीबोळांतील मंडपांपुरते मर्यादित राहिलेले नसून  ते थेट आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आदरातिथ्यापर्यंत पोहोचले आहेत. भारताची अग्रगण्य विमान कंपनी एअर इंडियाने मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील लाउंजमध्ये प्रवाशांसाठी विशेष महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची रेलचेल ठेवली आहे. मोदक, मसाले भात यांसह विविध पारंपरिक पदार्थांचा आस्वाद प्रवाशांना घेता येत आहे. या खास उपक्रमामुळे विमानतळावरच गणेशोत्सवाचा माहोल अनुभवण्यासोबतच महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची ओळखही प्रवाशांना होत आहे.

मुंबई-दिल्लीदरम्यान सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. या मार्गावर एअर इंडिया दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक आनंददायी व्हावा यासाठी एअर इंडियाने ही विशेष मेजवानी आयोजित केली आहे. मुंबई व दिल्ली येथील इंटरनॅशनल महाराजा लाउंजमध्ये १४ सप्टेंबरपासून ११ दिवसांचा खास उत्सव आयोजित केला आहे. पारंपरिक चवीसह गुलकंद, केशर, ऑरेंज चॉकलेट बटरस्कॉच, शुगर-फ्री खजूर व ड्रायफ्रूट, नाचणी व बेरी चीजकेक फ्लेव्हर्सचे आधुनिक मोदकही ठेवण्यात आले आहेत. मुंबई लाउंजमध्ये कोल्हापुरी चिकन बिर्याणी, मालवणी फिश करी व मिसळ पाव यांसारख्या पदार्थांसह महाराष्ट्रीयन बफे उपलब्ध आहे.

विमानतळ हे कोणत्याही देशाचे किंवा राज्याचे पहिले प्रवेशद्वार असते. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या या लाउंजमध्ये पाऊल ठेवणाऱ्या देश-विदेशातील प्रवाशांना जेव्हा ‘उकडीच्या मोदका’चा सुवास आणि ‘मसाले भाता’चा अस्सल स्वाद मिळतो, तेव्हा ती केवळ एक मेजवानी ठरत नाही, तर तो आपल्या समृद्ध वारशाचा परिचय ठरतो.

हवाई प्रवाशांना महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची व परंपरेची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गणपतीचा आवडता मोदक व इतर गोड पदार्थ, मुंबईसह दिल्लीच्या ‘महाराजा लाउंज’मध्येही उपल्बध आहे. एअर इंडियाने भारतीय संस्कृती व पाहुणचाराची परंपरा जागतिक प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

गणेशोत्सवानिमित्त ‘तेजस एक्स्प्रेस’मधील प्रवाशांना उकडीचा मोदक.. 

मुंबई-कोकण रेल्वेमार्गे प्रवास गोड करण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळतर्फे (आयआरसीटीसी) गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस व गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसमध्ये मोदक वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला वाव देण्यासाठी व प्रवाशांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उकडीच्या मोदकांचे वाटप करण्यात येईल, असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या विविध भागांत नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणात परततात. गणपतीच्या आगमनापूर्वीच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या सणासुदीच्या वातावरणात प्रवाशांच्या प्रवासाला खास अनुभव देण्यासाठी मोदक वाटपाचे नियोजन केले आहे.

सुग्रास खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाणे हा मानवी इतिहासातील सर्वात प्रभावी मार्ग राहिला आहे. जेव्हा एखादा परदेशी व्यावसायिक किंवा पर्यटक मुंबई अथवा दिल्लीच्या लाउंजमध्ये बसून मिसळ पावचा आनंद घेतो, तेव्हा तो भारताची एक गोड आठवण घेऊन आपल्या देशात परततो. हे प्रयत्न भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’ला जागतिक स्तरावर अधिक मजबूत करणार आहेत. 

– हिमांशु शुक्ला

अन्य लेख

संबंधित लेख