राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला गेल्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. शताब्दीच्या निमित्ताने आयोजित केलेले असंख्य उपक्रम पार पडले आहेत. काही उपक्रम अजूनही सुरू आहेत. ते कदाचित उद्दिष्ट पुरे होईपर्यंत चालूच राहतील. नागपूर येथील विजयादशमीच्या उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी सविस्तर भाषण करताना महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. हे भाषण म्हणजे केवळ संघाच्या कार्याचा आढावा नव्हता. तो भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून समाजासमोर, देशासमोर ठेवलेला एक उचित असा विचारव्यूह आणि कृतिसंदेश होता. देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा हा मार्ग सोपा नसतो. भारत जेव्हा वेगाने पुढे जात असतो, तेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय शक्तींच्या डोळ्यात ते खुपते. भारताची हीच प्रगती रोखण्यासाठी अनेक देश आणि जागतिक शक्ती वेगवेगळे उपद्व्याप करीत असतात. भारतात नुकतीच अनेक आंदोलने झालेली असताना डॉ. भागवत यांनी हा परकीय शक्तींच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडण्याला अतिशय महत्त्व होते. हा मुद्दा अधोरेखित करताना त्यांनी नेपाळ, फ्रान्स, अल्बेनिया यांसारख्या देशांमध्ये घडणाऱ्या घडामोडींमधून आपण धडा घेतला पाहिजे; असे आवर्जून सांगितले. जगात सध्या घडणाऱ्या या कारस्थानी कारवायांचे दाखले देत सरसंघचालकांनी भारताच्या ऐक्याला बाधा आणणाऱ्या शक्तींवर रोखठोक टीका केली. ती आवश्यक होती. सरकारकडे एखाद्या प्रश्नावर दाद मागणे आणि ‘रिजिम बदलना है..’ असे म्हणून सत्ता उखडून टाकण्याची भाषा करायची, यातला फरक डॉ. भागवत यांनी दाखवून दिला. भारतात रिजिम म्हणजे सत्ताधारी बदलण्याचा केवळ एकच मार्ग आहे. तो मतपेटीतून जातो. ज्यांना हा मार्ग मान्य नाही, ते काय करतात, हे नेपाळ, फ्रान्समध्ये दिसले आहे. ‘अशी सत्तांतरे झाल्यानंतर परिस्थिती सुधारल्याचे जगात कुठेही दिसलेले नाही…’ असे डॉ. भागवत यांनी खास नजरेस आणून दिले. रस्त्यावर येणाऱ्या आंदोलकांनी भलत्या भ्रमात राहू नये, असा इशाराच जणू ते देत होते.
जगात सध्या एक अस्थैर्याचे वादळ उठले आहे. हे वादळ पश्चिमेकडून आले आहे. मानवी मूल्ये, कुटुंब व्यवस्था आणि प्रत्येक ठिकाणची स्थानिक संस्कृती नष्ट करायची, हाच अशा वादळांचा हेतू दिसतो. अनेक विकसित देश या संकटापुढे हतबल झाले आहेत. भारत मात्र स्वतःच्या सामर्थ्यावर आणि संस्कृतीच्या पायावर भक्कम उभा आहे. जगातील या संकटांवर भारताकडे उत्तर आहे. म्हणूनच भारत या शक्तींचे मुख्य लक्ष्य ठरत आहे. आपल्या देशात अस्वस्थता निर्माण करणे, समाजा समाजात फूट पाडणे आणि देशाला कमजोर करणे हा या परकीय ताकदींचा डाव आहे. आपल्या देशातील काही राजकीय नेते आणि घटक स्वतःच्या स्वार्थासाठी या आंतरराष्ट्रीय ताकदींचे हत्यार बनत आहेत. ही बाब गंभीर आहे. या सर्व देशविरोधी शक्तींपासून सावध राहिले पाहिजे. हाच सरसंघचालकांच्या विजयादशमीच्या भाषणाचा मुख्य संदेश आहे. तो शासन, प्रशासन, संघ परिवारातील सारे सदस्य आणि समाज या साऱ्यांनीच लक्षात ठेवण्याजोगा आहे.
‘स्व’चा विसर आणि विघटनाचे धोके
भारताला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. आपल्या संविधानाने आपल्याला ‘आम्ही भारताचे लोक’ म्हणून एकसंध बांधले आहे. आपल्या देशात भाषा, जाती, प्रांत आणि लोकसंस्कृतीची विविधता आहे. या विविधतेतच आपले सौंदर्य आणि ताकद आहे. परंतु, मूळ आत्म्याचा म्हणजे ‘स्व’चा विसर पडतो, तेव्हा आपला पराभव होतो. इतिहासात आपण हे अनेकदा अनुभवले आहे. आपण जेव्हा जेव्हा संकुचित झालो, आपापसात लढलो आणि घाबरलो, तेव्हा आपण पारतंत्र्यात गेलो. इंग्रजांनी याच कमजोरीचा फायदा घेतला. बंगालची फाळणी असो की १९४७ ची फाळणी, फुटीरतावादी मानसिकतेमुळे देशाचे मोठे नुकसान झाले, याकडे डॉ. भागवत यांनी लक्ष वेधले. या मानसिकतेचा धागा त्यांनी वर्तमानाशीही आणून भिडवला.
आजही काही शक्ती समाजातील मतभेद वाढवण्याचे काम करत आहेत. लोकांच्या मनात असंतोष निर्माण करायचा, यंत्रणांबद्दल अविश्वास पेरायचा आणि देशात अराजक माजवायचे, हा त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे; हे सरसंघचालकांनी स्पष्टच सांगितले. या शक्तींपासून सतर्क राहणे गरजेचे आहे, असा सरसंघचालकांनी देशाला एकप्रकारे इशारा दिला.
तंत्रज्ञान, तरुण आणि मूल्यांचा संकर
आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. नवीन शोध आणि तंत्रज्ञान माणसाचे जीवन सोपे करतात. त्यामुळे त्यांचे स्वागतच केले पाहिजे. परंतु, तंत्रज्ञान हे केवळ एक साधन आहे. त्याचा वापर कसा करायचा, हे माणसाच्या विवेकावर अवलंबून असते. आज सोशल मीडिया आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सचा वापर वाढला आहे. अनेक देशांमध्ये तरुणाई या माध्यमांच्या आहारी गेल्याचे दिसते. योग्य काय आणि अयोग्य काय, याचा विवेक गमावल्यामुळे नव्या पिढीचे नुकसान होत आहे. सोशल मीडियावरील अनियंत्रित मजकुरावर नियमन आणण्याची गरज आता निर्माण झाली आहे, हा डॉ. भागवत यांनी मांडलेला मुद्दा भरकटत जाणाऱ्या तरुणाईशी जोडलेला होता. सध्याच्या आंदोलनांमध्येही असे काही भरकटलेले तरुण-तरुणी आहेतच.
विजयादशमीचे सारे भाषणच तरुणाईशी आणि त्या निमित्ताने या तरुणांच्या हातात असणाऱ्या भारताच्या भवितव्याची चिंता करणारे होते. त्यामुळेच सरसंघचालक सांगत होते, ‘अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) वाढते व्यसन हा देशापुढील सर्वांत मोठा धोका बनत आहे. तरुणाईला या दलदलीतून बाहेर काढणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पालकांनी पाल्यांना योग्य संस्कार दिले पाहिजेत. शाळांच्या अभ्यासक्रमात आणि कुटुंबांमध्ये मूल्यांची पेरणी झाली पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर अणुऊर्जेसारखा चांगल्या कामासाठी व्हावा, विनाशकारी शस्त्रांसाठी किंवा समाजात भ्रम पसरवण्यासाठी होऊ नये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर खोटेपणा पसरवण्यासाठी केला जात असेल, तर ते घातक आहे. यावर समाजाने आणि प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.’ सगळ्या जगातल सुबुद्ध लोक सध्या एआयच्या लाभांकडे तसेच तोट्यांकडे काहीशा चिंतेने पाहात आहेत. त्यांच्या या विचारांचे प्रतिध्वनी डॉ. भागवत यांच्या भाषणात उमटत होते.
शासनाची भूमिका आणि समाजाचे उत्तरदायित्व
कोणत्याही देशातील सर्व प्रश्न केवळ सरकार किंवा प्रशासन एकट्याने सोडवू शकत नाही. तसेच, प्रत्येक समस्येवर आंदोलने करणे हासुद्धा पर्याय असू शकत नाही. आंदोलने उपायांसाठी असावीत, विनाशासाठी नाहीत. देशातील प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग आणि संवाद आवश्यक आहे. सरसंघचालकांनी या भाषणात शासन, प्रशासन आणि नागरिक या तिन्हींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. सरकारी यंत्रणांनी नागरिकांशी वागताना नम्रता, आपुलकी आणि सन्मानाची भावना ठेवली पाहिजे. प्रशासनाचा व्यवहार हा नागरिकांचा आत्मसन्मान जपणारा हवा.
दुसऱ्या बाजूला समाजाने केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. संघाच्या स्वयंसेवकांनी दोनशेपेक्षा जास्त जिल्ह्यांमधील ग्रामीण शाळांमध्ये आणि गावांच्या विकासात लोकसहभागातून मोठे काम केले आहे, याचा दाखला डॉ. भागवत यांनी दिला. अलीकडेच, आंदोलक शाळांन भेटी देत आहेत. तेथील कमतरता दाखवत आहेत. मात्र, जिथे ग्रामस्थ एकत्र आले, तिथे शिक्षणाचा दर्जा सुधारला आणि खेळांना प्रोत्साहन मिळाले. हीच लोकशक्ती भारताचा खरा आधार आहे. समाज जेव्हा स्वतःच्या समस्या ओळखतो आणि एकत्र येऊन त्यावर मात करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने राष्ट्राचा विकास होतो. त्यामुळे, समस्या जाणण्याइतकेच त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याला महत्त्व आहे. संघ नेमके हेच करत आला आहे, याकडे डॉ. भागवतांनी देशाचे लक्ष वेधले. ते महत्त्वाचे होते. याचे कारण, आंदोलन करून प्रसिद्धी मिळवायला वेळ लागत नाही. एखाद्या कामात गाडून घेऊन ते उभे करण्यासाठी अनेक दशके लागतात. असे आयुष्य देणारे हजारो कार्यकर्ते संघाने घडविले आहेत. त्यांचा त्याग हीच परिवर्तनाची खरी हमी आहे.
पंच परिवर्तनातून बदल
शताब्दी वर्षाच्या आधीच संघाने ‘पंच परिवर्तन’ हा नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्व-बोध आणि स्वदेशी, तसेच नागरिक अनुशासन यांचा समावेश आहे. हे उपक्रम केवळ एका वर्षासाठी नाहीत. ती जीवनशैलीची नवी दिशा आहे. आपल्या कृतीचे रुपांतर सवयीत आणि सवयीचे रुपांतर स्वभावात झाले पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले तेव्हा ते खरा कार्यकर्ता कसा घडतो, याचे जणू सूत्रच सांगत होते. हे सूत्र केवळ संघासाठी नाही तर साऱ्या समाजासाठीच मार्गदर्शक आहे.
विश्वगुरू भारताचा मार्ग
डॉ. मोहन भागवत यांचे हे भाषण भारताच्या उज्ज्वल भवितव्याची वाट दाखविणारे आहे. जगात आज सर्वत्र संघर्ष, युद्ध आणि पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. पश्चिमेची वैयक्तिक स्वार्थाची आणि उपभोगवादी संस्कृती या सर्व प्रश्नांवर उत्तरे देऊ शकत नाही. अशा वेळी संपूर्ण जग आशेने भारताकडे पाहत आहे. भारताची ‘सनातन’ दृष्टी ही सर्वसमावेशक आहे. आपण विश्वातील सर्व विविधतेचा आदर करतो आणि सर्वांमध्ये एकच चैतन्य पाहतो. हीच ‘वसुधैव कुटुंबकम्’ची संकल्पना आहे.
भारत जेव्हा एकाच वेळी आर्थिक, लष्करी आणि सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत होईल, तेव्हाच तो जगाला शांततेचा आणि समन्वयाचा मार्ग दाखवू शकेल. भारताला ‘विश्वगुरू’ बनवायचे असेल, तर कोणतेही शॉर्टकट चालणार नाहीत. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या दैनंदिन जीवनात, कुटुंबात आणि व्यवसायात छोटे छोटे सकारात्मक बदल करावे लागतील. सरसंघचालकांनी व्यक्त केलेली ही दूरदृष्टी भारताच्या भवितव्याचा वैचारिक पाया घालणारी आहे. देशविरोधी शक्तींचे षड्यंत्र उधळून लावत, परस्पर बंधुभाव आणि शिस्तीच्या जोरावर भारत नक्कीच जगज्जेता बनेल, असा आत्मविश्वास या भाषणातून मिळत होता. भारताच्या या वाटचालीत संघ अग्रेसर असेलच पण साऱ्या समाजालाही सोबत घेऊन जाईल, हेच डॉ. मोहन भागवत यांनी अधोरेखित केले. सारे जग एका वावटळीत सापडत असताना जगातल्या सर्वांत मोठ्या संघटनेच्या कुटुंबप्रमुखाने असा दिलासा देण्याला ऐतिहासिक मोल आहे!