प्रस्तावना
१६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस भारताच्या वसाहतकालीन इतिहासातील केवळ एक राजकीय घटना नव्हती, तर तो या राष्ट्राच्या सुप्त चैतन्याला जागृत करणारा एक ऐतिहासिक क्षण होता. प्रशासकीय सोयीचा बुरखा पांघरून व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. मुत्सद्दीखोर इंग्रजांना वाटले होते की, बंगालच्या रूपाने उभ्या राहणाऱ्या राष्ट्रवादाच्या केंद्रावरच घाला घातला जाईल आणि स्वातंत्र्याची ही चळवळ आपोआपच थंडावेल. परंतु, भारत राजकीय तडजोडीतून उभा राहिलेला देश नसून, तो एक सजीव आणि अखंड सांस्कृतिक राष्ट्रपुरुष आहे, याचे आकलन परकीय राज्यकर्त्यांना कधीच झाले नाही. माणसाच्या पायात जरी काटा रुतला, तरी त्याची कळ थेट मेंदूपर्यंत जाते आणि डोळ्यांतून पाणी येतं. का? कारण शरीर एक आहे, त्यातलं चैतन्य एक आहे!
१६ ऑक्टोबर: शोकदिवस
फाळणी केवळ एका प्रांताची झाली होती; पण त्याचे चटके हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंतच्या प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला बसले. १६ ऑक्टोबरचा तो दिवस बंगालमध्ये शोकदिन म्हणून उजाडला खरा, पण त्या शोकातूनच एका प्रचंड वणव्याची ठिणगी पडली. घराघरांत चुली पेटल्या नाहीत, पण मनामनांत स्वातंत्र्याचा अग्नी धगधगू लागला होता. गंगास्नान करून हजारो लोक रस्त्यावर उतरले. रवींद्रनाथ टागोरांच्या पुढाकाराने एकमेकांच्या हातावर राख्या बांधल्या गेल्या. ही केवळ निषेधाची कृती नव्हती; तर परकीय सत्तेच्या छाताडावर उभं राहून आमच्या सांस्कृतिक एकतेने दिलेलं ते थेट आव्हान होतं. आंदोलन अधिक गडद होत गेलं आणि याच ऐतिहासिक घुसळणीतून देशाला गवसला तो स्वातंत्र्याचा अमोघ मूलमंत्र—’वंदे मातरम्|
जरा विचार करा, केवळ दोन शब्द… पण त्यात केवढी प्रचंड ऊर्जा होती! बंकिमचंद्रांच्या लेखणीतून उतरलेला हा मंत्र जेव्हा कोट्यवधी कंठांतून एकाच वेळी घुमला, तेव्हा ब्रिटिश सत्तेच्या पायाखालची वाळू सरकली. कारण ‘वंदे मातरम्’ ही कोणतीही राजकीय घोषणा नव्हती. ती या भूमीला केवळ माती न मानता साक्षात ‘माता’ मानणाऱ्या सनातन संस्कृतीची सिंहगर्जना होती! जिथे आपल्या देशाला शक्तीच्या रूपात दुर्गा, संपन्नतेच्या रूपात लक्ष्मी आणि ज्ञानाच्या रूपात सरस्वती मानलं गेलं, तिथे त्या आईच्या अंगाचे तुकडे होताना लेकरं शांत कशी बसतील? राष्ट्रभक्ती हीच सर्वोच्च ईश्वरभक्ती आहे, हा विचार या मंत्राने घराघरांत आणि मनामनांत रुजवला.
मवाळ ममतावादी ते जहाल मतवादी
याच ऐतिहासिक वळणावर देशाच्या राजकीय आणि सामाजिक विचारधारेत एक मूलभूत स्थित्यंतर घडले. तोपर्यंत ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून अर्ज, विनंत्या आणि शिष्टमंडळांच्या माध्यमातून सवलती मागण्याचे ‘मवाळ’ राजकारण सुरू होते. मात्र, कर्झनच्या उद्दामपणाने या भ्रमाचा भोपळा फोडला. या धोरणाची स्पष्ट आणि निर्विवाद कबुली भारताचे तत्कालीन गृह सचिव हर्बर्ट होप रिझले यांच्या एका अधिकृत टिपणीमध्ये पाहायला मिळते. १९०४ मध्ये रिझले यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत लिहिले होते: “एकसंघ बंगाल ही एक मोठी शक्ती आहे. बंगालची फाळणी केल्यास ती शक्ती वेगवेगळ्या दिशांना ओढली जाईल.” (Bengal united is a power; Bengal divided will pull in several different ways).
मात्र, याचना करून हक्क मिळत नसतात, तर त्यासाठी सामर्थ्याची आणि स्वाभिमानाचीच भाषा बोलावी लागते, याची जाणीव त्यानंतर समाजाला झाली. अशा निर्णायक क्षणी संपूर्ण देशाचे लक्ष कणखर नेतृत्वाकडे वेधले गेले—जहालवादी गटाकडे. वंगभंग आंदोलनापूर्वी काँग्रेसवर मवाळ नेत्यांचे वर्चस्व होते, ज्यांचा अर्ज आणि विनंत्यांच्या राजकारणावर विश्वास होता. मात्र, टिळकांनी लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल (लाल-बाल-पाल) यांच्या साथीने या मवाळ धोरणांना कडाडून विरोध केला. टिळकांनी ठामपणे मांडले की, केवळ बंगालची फाळणी रद्द करणे हे या चळवळीचे अंतिम साध्य असू शकत नाही. त्यांनी या चळवळीला ‘स्वराज्य’ मिळवण्याचे एक व्यापक साधन बनवले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे त्यांचे ऐतिहासिक घोषवाक्य याच काळात संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान बनले.
महाराष्ट्रातील आंदोलनाची व्याप्ती
मवाळ नेत्यांची अशी इच्छा होती की स्वदेशी आणि बहिष्काराची चळवळ केवळ बंगालपुरतीच मर्यादित राहावी, कारण त्यांच्या मते हा एक स्थानिक प्रश्न होता. परंतु, टिळकांनी याला विरोध करत ही चळवळ संपूर्ण भारतात पसरवण्याचा आग्रह धरला. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांत स्वदेशी चळवळीचा अत्यंत प्रभावीपणे प्रसार केला.
टिळकांनी राजकीय चळवळीला केवळ सुशिक्षित वर्गापुरते मर्यादित न ठेवता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. यासाठी त्यांनी सांस्कृतिक प्रतीकांचा आणि उत्सवांचा अत्यंत कल्पकतेने वापर केला. त्यांनी महाराष्ट्रात ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ‘शिवजयंती उत्सवांची’ व्याप्ती वाढवली. या सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांविरुद्ध जनमत जागृत केले आणि तरुणांना स्वातंत्र्यलढ्यासाठी संघटित केले.
टिळकांनी स्वदेशीच्या वापरासोबतच ‘बहिष्काराला’ एक अत्यंत प्रबळ राजकीय हत्यार बनवले. त्यांनी या आंदोलनाला केवळ फाळणी रद्द करण्यापुरते मर्यादित ठेवले नाही, तर त्याला स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीची जोड देऊन भारतीय ‘स्व’त्वाच्या जागराचे रूप दिले. पुण्यात परदेशी कपड्यांची झालेली प्रचंड होळी ही केवळ आर्थिक बहिष्काराची कृती नव्हती, तर मानसिक गुलामगिरी जाळून टाकण्याचे ते एक प्रतीक होते. स्वदेशीचा स्वीकार म्हणजे आपल्या उद्योगांचा, मूल्यांचा आणि आत्मनिर्भरतेचा सन्मान होता; तर राष्ट्रीय शिक्षण म्हणजे मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीने निर्माण केलेला न्यूनगंड झटकून, स्वतःच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगणारी पिढी घडवण्याचा संकल्प होता.
मातृभू सबल बने!
१९०५ च्या या महान जनआंदोलनापुढे अखेरीस बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला झुकावे लागले आणि १९११ मध्ये फाळणी रद्द करावी लागली. बंगालच्या फाळणी विरोधातील हा लढा आपल्याला हेच दाखवतो, जेव्हा जेव्हा या देशाच्या अखंडतेवर आणि सांस्कृतिक एकतेवर घाला घातला जातो, तेव्हा तेव्हा या भूमीतील राष्ट्रीय अस्मिता ढालही होते आणि तलवार देखील. इतिहासाने बदललेले नकाशे पाहिले आहेत, राजकीय समीकरणं बदलेली पाहिली आहेत; परंतु ‘वंदे मातरम्’च्या मंत्राने भारलेली आणि मातृभूमीच्या चरणी समर्पित झालेली लोकांची अदम्य इच्छाशक्ती चिरंजीव आहे.