Friday, November 6, 2026

तुमच्या धनाची व्याख्या काय आहे?

Share

प्रस्तावना

आजच्या काळात आपण जेव्हा ‘धन’, ‘लक्ष्मी’, ‘संपत्ती’ किंवा ‘ऐश्वर्य’ हे शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर चटकन नोटा-नाणी, बँकेतील शिल्लक, सोन्याचे दागिने किंवा शेअर बाजारातील आकडे उभे राहतात. काळाच्या ओघात आपण या चारही समृद्ध शब्दांना ‘पैसा’ या एकाच पातळीवर आणून ठेवले. परंतु भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृत भाषाशास्त्र इतके उथळ कधीच नव्हते.

भारतीयांसाठी धन, लक्ष्मी, संपत्ती आणि ऐश्वर्य हे कधीच केवळ ‘चलन’ नव्हते, तर ते मानवी जीवनाच्या उत्कर्षाचे चार वेगवेगळे टप्पे होते. आजच्या ‘शब्दांच्या दुनियेत’ या लेखमालेत आपण धन या शब्दाची संकल्पना पाहणार आहोत.

‘धन’

आपण रोजच्या व्यवहारात वापरतो तो ‘धन’ हा शब्द नेमका कुठून आला? यास्काचार्य या व्याकरणकारांनी याची अत्यंत सुंदर व्याख्या केली आहे—‘धिनोति इति सतः’। म्हणजे ‘तृप्त करणे, आनंदित करणे, समाधान देणे’. तर दुसरा अर्थ होतो-‘धन्’ (धन् धान्ये), म्हणजे ‘धान्य पिकवणे, फळ देणे’. याचा सरळ अर्थ असा की, ज्याच्या प्राप्तीने माणसाचे मन, आत्मा आणि इंद्रिये तृप्त होतात, ज्याने जीवनाचे भरण-पोषण होते, त्याला ‘धन’ म्हणतात!

ऋग्वेदाच्या काळात ‘पणि’ नावाच्या लोभी असुरांनी देवांच्या गाई आणि जलप्रवाह गुहेत अडवून ठेवले होते. तेव्हा इंद्राची स्वामीभक्त सेविका ‘देवशूनी’ने त्यांची मुक्तता केली. वेदांनी त्या वाहत्या पाण्याला आणि समाजाचे पोषण करणाऱ्या गाईंना ‘धन’ म्हटले आहे.

‘धना’ची हीच व्याख्या समजून घेतली, तर हातावरच्या धनरेषेचे सुद्धा गूढ उलगडते. बऱ्याचदा हातावरील रेषा पाहताना अनेकजण उत्सुकतेने विचारतात,“माझ्या हातावर ‘धनरेषा’ कशी आहे? मला अमाप पैसा कधी मिळेल?” मात्र आपल्या तळहातावर कोरलेली धनरेषा केवळ ‘पैसा’ सांगणारी रेषा नसते. कारण धन म्हणजे जे तुम्हाला आतून तृप्त करते ते! त्यामुळे प्रत्येकाला मिळणारे धन हे प्रत्येक व्यक्तीच्या मनातील ‘धना’च्या व्याख्येप्रमाणे फळ देत असते. कारण एखाद्यासाठी तिचे हसते-खेळते कुटुंब धन आहे, एखाद्यासाठी ज्ञान, एखाद्यासाठी गाडी-घर, एखाद्यासाठी त्याचे काम-व्यापार.थोडक्यात, तुमच्या हातावरील धनरेषा ही तुमच्या अंतरंगाचा आरसा असते.

‘लक्ष्मी’: सद्गुणांचे शुभ लक्षण!

आज आपण पैशालाच ‘लक्ष्मी’ मानतो. पण संस्कृतमध्ये ‘लक्ष्मी’ हा शब्द मूळ ‘लक्ष्’ (लक्ष दर्शनाङ्कनयोः – पाहणे, निरीक्षण करणे, चिन्हांकित करणे) या धातूपासून बनला आहे. ऋग्वेदातील प्रसिद्ध ज्ञानसूक्तात (१०.७१.२) म्हटले आहे— “भद्रैषां लक्ष्मीर्निहिताधि वाचि।” म्हणजेच, जे ज्ञानी पुरुष आपली वाणी चाळणीने चाळल्याप्रमाणे शुद्ध आणि सत्य ठेवतात, त्यांच्या वाणीमध्ये ‘कल्याणकारी लक्ष्मी’ वास करते. इथे लक्ष्मी म्हणजे चारित्र्य.

यास्काचार्यांनी निरुक्तात लक्ष्मी शब्दाच्या तब्बल सात व्युत्पत्ती सांगितल्या आहेत-“लक्ष्मीः लाभनाद्वा, लक्षणाद्वा, लप्स्यनाद्वा, लाञ्छनाद्वा, लषतेर्वा स्यात्प्रेप्सतिकर्मणः, लग्यतेर्वा स्यादश्लेषकर्मणः, लज्जतेर्वा स्यादश्लाघाकर्मणः।”

यातील दोन अर्थ विशेष आहेत— ‘लग्’ (जोडले जाणे) आणि ‘लज्ज्’ (लाजणे/संकोच वाटणे). यासाठी महाभारताच्या शांतीपर्वात एक कथा येते.

जेव्हा दैत्यांचे राज्य सोडून श्रीलक्ष्मी देवराज इंद्राकडे आली, तेव्हा इंद्राने तिला विचारले, “देवी, तू असुरांचे राज्य का सोडलेस?” तेव्हा लक्ष्मीने दिलेले उत्तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखे आहे. ती म्हणाली, “हे इंद्रा, मला कोणीही केवळ बळाने किंवा तिजोरीत कोंडून ठेवू शकत नाही. जिथे सत्य, दान, कठोर परिश्रम, स्वच्छता आणि धर्म असतो, तिथे मी स्वतःहून जाऊन जोडली जाते. पूर्वी असुर सत्यवचनी आणि कर्तव्यदक्ष होते, म्हणून मी त्यांच्याकडे राहिले. पण जेव्हा त्यांच्यात अहंकार, आळस आणि अधर्म शिरला, तेव्हा त्यांच्याकडे राहण्यास मला लाज वाटू लागली आणि मी त्यांना सोडून निघून आले.”

समुद्रमंथनातून प्रकट झाल्यावरही सर्व देव-दानव लक्ष्मीची अभिलाषा धरत होते (लषते), पण तिने स्वतः सर्वांचे सूक्ष्म निरीक्षण केले (लक्षणात्) आणि ज्याला कशाचीही हाव नाही, जो स्वतःच्या कर्तव्यात शांत व निस्पृह आहे, अशा भगवान विष्णूंच्या गळ्यात वरमाला घातली. म्हणजेच, लक्ष्मी माणसाच्या कर्तृत्वातून, सदाचारातून आणि सौंदर्यातून प्रकट होणाऱ्या ‘मंगलमय तेजाची’ देवता आहे

‘संपत्ती’ आणि ‘ऐश्वर्य’

‘संपत्ती’ हा शब्द सम् (योग्य प्रकारे) आणि पद् (पूर्णत्वास जाणे) बनला आहे. एखादी गोष्ट तिच्या सर्वोत्तम, परिपूर्ण अवस्थेला पोहोचणे म्हणजे ‘संपत्ती’. म्हणूनच भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अभय, अंतःकरणाची शुद्धी, ज्ञान, दान, इंद्रियनिग्रह, अहिंसा आणि तेज या सद्गुणांच्या समुच्चयाला ‘दैवी संपत्ती’ म्हटले आहे.

तर ‘ऐश्वर्य’ अर्थात ईश्वरस्य भावः कर्म वा ऐश्वर्यम्  याचा अर्थ होतो— स्वामित्व, प्रभुत्व आणि उपभोग घेण्याचे सामर्थ्य!

‘धन्वंतरी’: आरोग्याची देवता!

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे ‘धनत्रयोदशी’. याची व्याख्या केली जाते-“धनुः शल्यशास्त्रं, तस्य अन्तं पारम् इयर्ति गच्छति इति धन्वन्तरिः”— अर्थात, वैद्यकशास्त्राच्या जो अंतापर्यंत (शिखरापर्यंत) पोहोचलेला आहे, तो ‘धन्वंतरी’!

हरिवंश पुराण आणि विष्णू पुराणातील कथेनुसार, समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या आदि-धन्वंतरींनी पुढे द्वापारयुगात काशीचा राजा ‘धन्व’ याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन त्याच्या पोटी जन्म घेतला आणि ते ‘काशीराज दिवोदास धन्वंतरी’ म्हणून ओळखले गेले. त्यांनीच महर्षी सुश्रुत आणि इतर ऋषींना अष्टांग आयुर्वेदाचा उपदेश केला.

आरोग्य हे देखील धनच आहे. कारण आरोग्य नसेल तर जगातील कोणतेही धन, संपत्ती किंवा ऐश्वर्य उपभोगता येत नाही!

आपल्या मुलांना द्यायचा खरा आशीर्वाद!

आजच्या काळात पालक आपल्या मुलांना आशीर्वाद देताना अनेकदा “All the best” किंवा “मोठा हो, खूप पैसे कमव” असे म्हणतो; किंवा काहींना हे आशीर्वाद खूपच उपभोगवादी वाटू शकतात. परंतु या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला डोळसपणे आणि मनापासून आशीर्वाद द्या— “बाळा, तू आरोग्यवान हो! धनवान हो! लक्ष्मीवान हो! संपन्न हो! ऐश्वर्यवान हो!”

अन्य लेख

संबंधित लेख