Friday, May 29, 2026

पर्यावरणपूरक गणेशोत्सव – भाग १

Share

ठाणे महानगरपालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य”या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयाकडे १५ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मात्र महापालिका केवळ मोफत जागा उपलब्ध करून देईल. शेड उभारणी, वीज आणि पाण्याची व्यवस्था मूर्तिकाराला स्वतः करावी लागणार आहे. जागेसाठी अर्ज करताना अर्जदार स्वतः मूर्तिकार असल्याचे हमीपत्र देणे बंधनकारक असते. जागा मिळाल्यानंतर मूर्तिकाराला आपल्या मंडपाबाहेर ‘येथे पर्यावरणपूरक साहित्याने घडविलेल्या मूर्ती उपलब्ध आहेत’ असा ३ x ५ आकाराचा फलक लावणे आवश्यक असते. काही निवडक केंद्रांवर (उदा. वर्तकनगर येथील हवा प्रदूषण प्रयोगशाळा) पालिकेकडून शाडू मातीदेखील उपलब्ध करून दिली जाते. ठाणे महापालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने घेतलेल्या या सकारात्मक उपक्रमाचे आपण स्वागतच केले पाहिजे.

२००७ मध्ये आयआयटी मुंबईने केलेल्या अभ्यासात पीओपीमधील सल्फेटचा परिणाम नैसर्गिक स्रोतांवर होत असल्याचं दिसलं. पीओपीच्या विघटनासाठी लागत असलेला वेळ लक्षात घेता त्यावर बंदीची मागणी पुढे येऊ लागली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घालत त्याचं विसर्जन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना काढण्याचे आदेश सरकारला दिले. मात्र, ही बंदी लगेच अंमलात आली नाही आणि नंतरच्या काळात ती पुढे ढकलली गेली किंवा हा मुद्दा वरचेवर कोर्टासमोर गेला. २०२५ मध्ये जून महिन्यात कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार ही बंदी उठवली गेली आहे. त्यानंतर सरकारने आता पीओपीच्या मूर्ती ओळखणं शक्य व्हावं यासाठी त्यावर लाल रंगाने खुण करणं बंधनकारक केलं आहे.

दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात PoP (पीओपी) च्या गणेश मूर्ती सार्वजनिक तलावांमध्ये किंवा नद्यांमध्ये विसर्जित करण्यावरून नवीन नवीन तर्कवितर्क, वाद-विवाद, नाराजी रुसवे फुगवे होतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. मूर्तिकारांनी पीओपीच्या गणेश मूर्ती आधीच बनवून ठेवलेल्या असल्यामुळे आता या मूर्तींचे काय करायचे असा तिढा निर्माण होतो. मुळात पीओपी मूर्ती विसर्जनाला जर न्यायालयीन मनाई असेल तर अशा मूर्ती बनवणे मूर्तिकारांनी टाळले पाहिजे व कटाक्षाने शाडू मातीच्या मूर्ती बनविणे अपेक्षित आहे. परंतु यामध्ये काही व्यावहारिक अडचणी आहेत.

सर्वप्रथम आपण शाडू मातीच्या मूर्तीचे फायदे व तोटे समजावून घेऊ. शाडू मातीच्या मूर्ती प्रामुख्याने पर्यावरणपूरक आणि पारंपरिक मानल्या जातात. शाडू माती म्हणजे पांढरट करड्या रंगाची, अत्यंत बारीक कणांची नैसर्गिक माती आहे. पाण्यात कालवल्यानंतर या मातीला आकार देता येतो. त्याचे कण बारीक असल्यामुळे ती पाणी सहज शोषून घेते आणि दिलेला आकार कायमही राहतो. शाडू मातीपासून घडवलेल्या आकाराला बेकिंगची गरज पडत नाही. भारतात शाडूची माती प्रामुख्याने गुजरात राज्यातील खाणी तसेच महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, रायगड (पेण, हमरापूर) सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील नदीपात्रांमधून मिळते.

शाडूची माती ही नैसर्गिक चिकणमाती असल्याने पाण्यात अगदी सहज विरघळते आणि जमिनीला सुपीक बनवते विसर्जनानंतर या मातीमुळे जलस्रोत प्रदूषित होत नाहीत आणि पाण्यातील जलचरांनाही धोका निर्माण होत नाही. हिंदू संस्कृतीनुसार मातीतून निर्माण झालेली मूर्ती पुन्हा मातीत विलीन होणे हे निसर्गचक्राचे प्रतीक मानले जाते. तसेच शाडू मातीची मूर्ती घडवताना लाकडी पाटाचा वापर केला जातो. गणरायाची मूर्ती लाकडी पाटावर असेल तर ती शाडू मातीची मूर्ती समजावी. मात्र शाडूच्या मातीच्या मूर्ती अतिशय नाजूक असतात. थोडासा धक्का लागल्यास किंवा पडल्यास मूर्तीला तडे जाणे किंवा तुटणे सहज शक्य असते. त्यामुळे त्या अतिशय काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) तुलनेत शाडूच्या मूर्ती वजनाने जड असतात. तसेच, या मूर्ती तुलनेने महाग असतात. मात्र अलिकडच्या काळात शुद्ध शाडूची माती मिळणे कठीण झाले आहे. तसेच, मूर्ती बनवताना त्यात रासायनिक किंवा अयोग्य रंगांचा वापर केल्यास हे फायदे कमी होऊ शकतात. पुढच्या भागात आपण पीओपी मूर्तींविषयी जाणून घेऊ…

– पराग नेरूरकर

अन्य लेख

संबंधित लेख