Wednesday, June 17, 2026

सोलो ट्रॅव्हल; एकदा तरी करुन पाहाच…!

Share

सोलो ट्रॅव्हल; स्वत:ला वेळ देण्याचा एक उत्तम पर्याय

फिरायला जायचं म्हटलं की भरगच्च प्लॅनिंग, सोबत येणाऱ्यांच्या आवडीनिवडी, सगळ्यांची सोय असे सगळे स्वाभाविकच आले. पण हे सगळे न करता आपण एकट्यानेच कुठेतरी फिरायला जायचे छरवले तर? ही संकल्पना थोडी वेगळी नक्कीच आहे पण अशक्य नाही. माणूस हा मुळात समाजप्रिय प्राणी असल्याने आपल्यापैकी बहुतांश जणांना सगळ्या गोष्टी करायला सतत सोबत हवी असते. मग तो आपला पार्टनर असो, पालक असो, मित्रमंडळी असो किंवा कोणी नातेवाईक नाहीतर आणखी कोणी. सोबत असू तर आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल आणि जास्त मज्जा येईल असा आपला त्यामागचा हेतू असतो. हे जरी खरे असले तरी एकट्याने प्रवास करणे आणि स्वत:च्या सोबतीचा आनंद घेणे यातही एक वेगळी मजा नक्कीच असू शकते. गेल्या काही वर्षात सोलो ट्रॅव्हलिंग हा शब्द आपल्या कानावर पडायला लागला आहे. काय असते हे सोलो ट्रॅव्हलिंग, त्यातले चॅलेंजेस काय आणि त्याचे फायदे कोणते हे समजून घेऊया… 


सोलो ट्रॅव्हल म्हणजे…
रोजच्या धावपळीत आपण इतके अडकून जातो की ऑफीस, घर, घरातील व्यक्ती, सणवार, वेगवेगळे समारंभ अशा सगळ्यांत आपण सतत माणसांमध्ये असतो. पण अशा सतत माणसांमध्ये असण्याचाही काही वेळा आपल्याला कंटाळा येऊ शकतो. अशावेळी डोक्याला, मनाला, शरीराला शांतता मिळण्यासाठी आपण कुठेतरी पळून जाऊया असं आपल्याला वाटतं. कधीतरी आपण एकटेच कॉफीचा मग आणि एखादे पुस्तक घेऊन काही तास बसतो, कधी एकटेच एखादी चक्कर मारायला जातो. पण आपले रोजचे रुटीन जास्त धावपळीचे असेल तर कंटाळा घालवायला किंवा ब्रेक म्हणून हा छोटा ब्रेक पुरेसा नसतो. अशावेळी मग थोडे लांब कुठेतरी तेही एकट्याने जाण्याचा हा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. कारण फिरायला गेल्यावरही सतत आपल्यासोबत कोणी असेल तर आपल्याला आपली स्पेस मिळतेच असे नाही. अशावेळी आपल्याला फक्त स्वत:साठी असा खास वेळ मिळतोच असे नाही. याच कल्पनेतून सध्या सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजेच एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड जोर धरु लागला आहे. 


आपली ट्रीप आपण प्लॅन करा
एरवी आपण ट्रीपला जाताना सगळ्यांना विचारुन, एकमेकांच्या सवडीने गोष्टी ठरवतो. पण सोलो ट्रॅव्हल म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा, आपल्या आवडीनुसार, सोयीनुसार ठरवायच्या असतात. त्यामुळे यामध्ये काहीवेळा आपला कस लागण्याची शक्यता असते. कारण एकटे असल्याने आपल्याला सुरक्षा, वातावरण, आजुबाजूला असलेल्या गोष्टी या सगळ्याच गोष्टींचा अंदाज घ्यायचा असतो.

आपल्या आवडीच्या गोष्टी नक्की करा
रोजच्या धावपळीत आपल्या अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. यामध्ये अगदी व्यायामापासून ते आपले छंद जोपासण्यापर्यंत असंख्य गोष्टींचा समावेश असतो. कित्येकदा तर आपण इतके अडकून जातो की आपल्याला सेल्फ केअरलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला वेळ देण्यासाठी सोलो ट्रीप करत असाल तर ती रिलॅक्स असेल असे पाहा. यामध्ये तुम्ही आवडीनुसार बॉडी मसाज, पार्लर ट्रीटमेंटस घेऊ शकता. इतकेच नाही तर व्यायाम करणे, आपल्या आवडीचे पदार्थ खाणे हेही सोलो ट्रीपचाच एक भाग आहे. काहीच नाही तर हातात कॉफीचा मग आणि आपल्या आवडीचे एखादे पुस्तक. किंवा डोंगर दऱ्या, समुद्र किनारा आणि आपल्या आवडीची गाणी हेही सोलो ट्रीपसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन असू शकते.

आव्हाने आणि संधी लक्षात घेऊन गोष्टी ठरवा

सोलो ट्रीप म्हणजे आपण एकटेच असणार त्यामुळे आपल्याला आपल्या सुरक्षेची आणि इतर गोष्टींची काळजी स्वत:लाच घ्यायची आहे. त्यादृष्टीने हॉटेल बुकींग, प्रवासाचे नियोजन या गोष्टी ठरवा. आपल्यासारखेच सोलो ट्रीपला आलेले अनेक जण असू शकतात. त्यांच्याशी ओळख करणे, ते काय करतात ते लक्षात घेणे, स्थानिक गोष्टी समजून घेणे या गोष्टी करायला हव्यात. तसेच आपण ट्रीपसाठी जे ठिकाण ठरवले आहे ते एकट्याने फिरण्यासाठी योग्य आणि सुरक्षित आहे ना हे लक्षात घ्यायला हवे.

एकटे असाल तरी सगळा आनंद लुटा

आपल्याला एकट्याने जेवण्याची, साहसी गोष्टी एकट्याने करण्याची किंवा स्वत:चे भरपूर फोटो काढण्याची सवय असतेच असे नाही. मात्र सोलो ट्रीपला गेल्यावरही तुम्ही न लाजता, न घाबरता सगळ्या गोष्टींचा आनंद लुटा. आपल्याला एरवी आपल्या मनाप्रमाणे एकट्याने गोष्टी करता येत नाहीत. हीच ती संधी आहे असे मानून बिनधास्त एकट्याने गोष्टी करण्याचा आनंद घ्या.

– सायली जोशी- पटवर्धन

अन्य लेख

संबंधित लेख