भारतीय संगीतसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ६० ते ७० च्या दशकात आपल्या मधाळ, टिपेच्या तरीही हळूवार आणि भावपूर्ण स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांनी काल, ३१ मे रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी, लोखंडवाला संकुल येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट संगीत आणि मराठी भावसंगीताचा एक अत्यंत आदरणीय स्तंभ कोसळला असून, संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
बालपण आणि गायकीकडे प्रवास
२८ जानेवारी १९३७ रोजी ढाका (सध्याचा बांग्लादेश) येथे जन्मलेल्या सुमनताईंचा (लग्नापूर्वी सुमन हेमाडी) संगीताचा प्रवास अत्यंत विलक्षण होता. वडील शंकरराव हेमाडी हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याने दीर्घकाळ ढाक्यात वास्तव्य होते. पाच बहिणी, एक भाऊ असलेल्या मोठ्या कुटुंबात, संगीताचा कोणताही व्यावसायिक वारसा नसताना, उपजत प्रतिभा आणि कठोर रियाजाच्या बळावर त्यांनी संगीतसृष्टीत हे अढळ स्थान मिळवले. १९४३ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या छायेत कुटुंब मुंबईत आल्यावर त्यांचे शिक्षण मुंबईच्या ‘सेंट-कोलंबिया हायस्कूल’ मध्ये आणि पुढे ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये चित्रकलेचे शिक्षण झाले. सुमनताईंमधील उपजत गायिका संगीत दिग्दर्शक पंडित केशवराव भोळे यांनी ओळखली. त्यानंतर गुरुजी मास्तर नवरंग, उस्ताद खान आणि अब्दुल रहमान खान यांच्यासारख्या दिग्गजांकडून मिळालेल्या शास्त्रीय तालीमीने त्यांच्या स्वरांना एक अलौकिक सौंदर्य आणि शास्त्रशुद्धता दिली.
रुपेरी पडद्यावर पदार्पण
निसर्गाला हाताच्या कुंचल्यापेक्षा त्यांच्या गळ्यातील सुरांकडून अधिक अपेक्षा असावी. कॉलेजच्या एका स्नेहसंमेलनात गात असताना गझलसम्राट तलत महमूद यांनी सुमनताईंचे गाणे ऐकले आणि स्वतः ‘HMV’ कंपनीकडे शिफारस केली. १९५२ मध्ये आकाशवाणीवर गाण्याची संधी मिळाल्यावर; १९५३ मध्ये ‘शुक्राची चांदणी’ या मराठी चित्रपटातून सुरू झालेला त्यांचा पार्श्वगायनाचा प्रवास पुढे तीन दशकांहून अधिक काळ अविरत सुरू राहिला. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण ३००० हून अधिक गाणी गायली. यात प्रामुख्याने ८५० हून अधिक हिंदी गाणी आणि तितकीच अजरामर मराठी भावगीते व चित्रपट गीते रसिकांच्या पदरात टाकली. याशिवाय बंगाली, गुजराती, ओडिया, पंजाबी, भोजपुरी आणि आसामी अशा विविध प्रांतीय भाषांमध्येही त्यांनी आपल्या सुरांचे गारुड निर्माण केले.
कारकिर्दीचा सुवर्णकाळ: रफी-सुमन पर्व
साठच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठे सांगीतिक वळण आले. मोहम्मद रफी यांच्या अथांग आवाजाला पेलू शकेल असा तोडीस तोड, फिरत्या गळ्याचा, नाजूक, भावुक आवाज शोधणे एक आव्हानच होते. मात्र ते सुमनताईंनी लीलया पेलले. रफी-सुमन या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक अजरामर गाणी दिली. “आजकाल तेरे मेरे प्यार के चर्चे”, “तुमने पुकारा और हम चले आये” किंवा “ना तुम हमें जानो” या गाण्यांमधील त्यांचा हळवा वावर आजही कानसेनांना मंत्रमुग्ध करतो. शंकर-जयकिशन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी-आनंदजी आशा दिग्गज संगीतकारांसमवेत त्यांची कला फुलत गेली.
भावगीतांचे अधिराज्य
हिंदी इतकेच मराठी रसिकांनी सुमनताईंवर जीवापाड प्रेम केले. “उठा उठा चिऊताई”, “कशी गौळण राधा बावरली”, “वाट इथे स्वप्नातील”, “या लाडक्या मुलांनो” अशी विविध धाटणीची भावस्पर्शी गाणी त्यांनी गायली. गदिमांचे शब्द, सुधीर फडके किंवा यशवंत देव यांचे संगीत सुमनताईंच्या गळ्यात उतरले तेव्हा तेव्हा भावगीतांचे नवे पर्व सुरू झाले. “जिथे सागरा धरणी मिळते”, “केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर”, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई” ही गाणी आणि “देव माझा विठू सावळा”, “केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा” अशी भक्तिगीते महाराष्ट्रातील घराघरांत आजही सुरेल पहाट करतात.
झगमगाटापलिकडचे खाजगी आयुष्य
चित्रपटसृष्टीच्या झगमगाटात आणि ग्लॅमरमध्ये राहूनही सुमनताई अत्यंत लाजाळू, मितभाषी आणि प्रसिद्धीविन्मुख राहिल्या. पति रामानंद कल्याणपूर यांच्या भक्कम साथीने त्यांनी आपले कौटुंबिक आणि सांगीतिक आयुष्य अतिशय समाधानाने आणि कोणत्याही वादाविना जगले. गाण्यातून निवृत्ती घेतल्यावर त्या पुन्हा आपल्या आवत्या चित्रकलेकडे वळल्या होत्या. त्यांच्या प्रदीर्घ आणि निःशब्द तपश्चर्येचा सन्मान करत भारत सरकारने २०२३ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले होते. याशिवाय महाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ आणि ‘गदिमा पुरस्कार’ यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले.
त्यांनी गायलेली गाणी केवळ मनोरंजन नव्हती तर मानवी भावनांचे निखळ प्रकटीकरण होती. हा दैवी सूर अनंतात विलीन झाला आहे. मात्र त्यांची सुरेल सफर पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनात जिवंत राहील. या थोर गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली!
– मैत्रेयी गोडसे