महाकवि कालिदासाच्या विहंगम प्रतिभेचा आधुनिक वेध
संस्कृत साहित्याचे महामेरू कविकुलगुरू कालिदास यांच्या स्मृती जागवणारा ‘महाकवि कालिदास दिन’ प्रतिवर्षी आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण देशात साजरा केला जातो. ‘मेघदूत’ या अजरामर खंडकाव्यातील “आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं” या ओळीने भारतीय साहित्याला एक अद्भुत वळण दिले. आपल्या प्रियेच्या विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाने आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशातील मेघांनाच दूत बनवून मध्य भारतातील रामगिरी पर्वतावरून हिमालयातील अलकापुरीपर्यंत संदेश पाठवला. हा केवळ एक विरह शृंगाराचा कल्पनाविलास नव्हता, तर त्यात तत्कालीन भारताचा अचूक भूगोल दडला होता. याच भौगोलिक सत्याचा शोध घेण्यासाठी पुणे येथील प्रसिद्ध शल्यविशारद आणि हौशी वैमानिक डॉ. सुरेश भावे यांनी आपल्या खाजगी विमानातून कालिदासाच्या मार्गाचे प्रत्यक्ष उड्डाण केले. या हवाई मोहिमेच्या नोंदी आणि छायाचित्रांचा प्रख्यात अभ्यासक डॉ. कानिटकर यांनी केलेला सखोल अभ्यास प्राचीन साहित्याला आधुनिक विज्ञानाची जोड देणारा ठरला आहे.
निरीक्षणांमधील ३५ ठिकाणांचा भौगोलिक मेळ
डॉ. भावे यांनी आपल्या चार आसनी ‘बीचक्राफ्ट बोनान्झा’ विमानातून लंका ते अयोध्या आणि रामगिरी ते हिमालय अशा प्राचीन हवाई मार्गांचे प्रत्यक्ष उड्डाण करून सूक्ष्म निरीक्षण व छायाचित्रण केले. या हवाई प्रवासातील छायाचित्रांचे वैज्ञानिक विश्लेषण करताना डॉ. कानिटकर यांनी एक थक्क करणारा निष्कर्ष काढला. सुमारे दीड-दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा आधुनिक हवाई सर्वेक्षण, नेव्हिगेशन प्रणाली किंवा उपग्रह तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हते अशी मान्यता आहे, तेव्हा कालिदासाने वर्णिलेली भौगोलिक दृश्ये ही आकाशातून साधारणतः १००० फूट ते ३००० फूट उंचीवरून दिसणाऱ्या विहंगम दृश्याशी तंतोतंत जुळतात.
या संशोधनात कालिदासाच्या काव्यात आलेल्या ३५ प्रमुख ऐतिहासिक आणि भौगोलिक ठिकाणांचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील स्थळांचा समावेश होता: १. रामगिरी (रामटेक), २. अमरकूट (अमरकंटक), ३. रेवा (नर्मदा नदी), ४. विंध्यपर्वत, ५. विदिशा, ६. निचैर्गिरी, ७. वेत्रवती नदी (बेतवा), ८. निर्विंध्या नदी, ९. उज्जयिनी (उज्जैन), १०. शिप्रा नदी, ११. गंधवती नदी, १२. गंभीर नदी, १३. देवगिरी, १४. चर्मण्वती नदी (चंबळ), १५. दशपूर (मंदसौर), १६. ब्रह्मावर्त, १७. कुरुक्षेत्र, १८. सरस्वती नदी, १९. कनखल (हरिद्वार), २०. गंगा नदी, २१. हिमालय, २२. क्रौंचरंध्र, २३. मानस सरोवर, २४. कैलास पर्वत, २५. अलकापुरी, २६. लंका, २७. दंडकारण्य, २८. पंचवटी, २९. गोदावरी नदी, ३०. जटायुतीर्थ, ३१. किष्किंधा, ३२. ऋष्यमूक पर्वत, ३३. वालुकेश्वर (मुंबई), ३४. सरयू नदी आणि ३५. अयोध्या.
आधुनिक वैमानिकांचे नेव्हिगेशन चार्ट्स आणि विमानाचा प्रत्यक्ष मार्गक्रम कालिदासाच्या मेघदूतातील श्लोकांशी ९९% तंतोतंत जुळत होता. उदाहरणार्थ, उज्जयिनीमधील जलाशय जमिनीवरून सपाट दिसतात, पण कालिदासाने त्यांना आकाशातून ‘वर्तुळाकार’ दिसणारे म्हटले आहे, जे केवळ विमानातूनच टिपता येणे शक्य आहे. वेत्रवती नदीची नागमोडी वळणे, अमरकूट पर्वताचा आकाशातून दिसणारा मध्यभागी काळा आणि कडेला पिवळसर रंग, आणि गंगेचे मैदानी भागात होणारे फेसाळणारे अवतरण विमानातील छायाचित्रांशी शब्दशः जुळले आहे. जमिनीवरून पदभ्रमण करणाऱ्या व्यक्तीला न दिसणारा हा विस्तीर्ण भूप्रदेश आकाशातून कसा दिसतो, याविषयीच्या कालिदासांच्या भौगोलिक अचूकतेला मांडताना डॉ. कानिटकरांनी ‘काव्यमय आणि अद्भुत वास्तव’ असे संबोधले.
रघुवंशातील त्रयोदश सर्ग आणि अयोध्येचे विहंगम वर्णन
महाकवी कालिदासाच्या ‘रघुवंश’ महाकाव्यातील १३ वा सर्ग हा हवाई प्रवासाच्या वर्णनाचा एक सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक नमुना मानला जातो. लंकेवर विजय मिळविल्यानंतर प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे रावणाच्या ‘पुष्पक’ विमानातून अयोध्येकडे परतत आहेत. या प्रवासाचे जे गतीमान वर्णन कालिदासाने केले आहे, त्याचा डॉ. कानिटकर यांनी डॉ. भावे यांच्या अयोध्या उड्डाणाच्या वेळच्या छायाचित्रांच्या आधारे सूक्ष्म अभ्यास केला.
विमानातून अतिवेगाने प्रवास करताना दूरच्या वस्तू कशा बदलतात आणि डोळ्यांना कोणता ऑप्टिकल आभास होतो, याचे अचूक ज्ञान कालिदासाला होते. जेव्हा विमान उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशातून अयोध्येच्या हद्दीत प्रवेश करते, तेव्हा उंचावरून सरयू नदीचे भव्य पात्र एखाद्या बारीक मोत्यांच्या हारासारखे किंवा पांढऱ्या धाग्यासारखे दिसते, असे कालिदास लिहितो. डॉ. भावे यांनी अयोध्येवर उड्डाण करताना घेतलेल्या छायाचित्रांमध्ये सरयू नदीचे हे रूप तंतोतंत पाहायला मिळाले. जसजसे विमान धावपट्टीवर उतरण्यासाठी खाली येऊ लागते, तसतसे नदीचे पात्र मोठे होत जाते, नदीकाठची दाट झाडी स्पष्ट दिसू लागते आणि अयोध्येच्या तटबंदीवरील उंच ध्वज जणू स्वागतासाठी हवेत फडफडताना दिसतात. हा वेगवान बदल आणि गतीचा आभास केवळ विमानात बसलेल्या प्रवाशालाच अनुभवता येतो. महर्षी वाल्मिकींचे रामायणातील वर्णन हे जमिनीवरून प्रवास करणाऱ्याचे आहे, तर कालिदासाचे रघुवंशातील वर्णन थेट विमानातील प्रवाशाच्या नजरेतून आहे, हा महत्त्वाचा फरक डॉ. कानिटकर यांनी अधोरेखित केला.
डॉ. कानिटकर यांच्या मते, हा अभ्यास केवळ एका कवीच्या काव्याचे रसग्रहण नसून, प्राचीन भारतीय ज्ञान-विज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेला एक ऐतिहासिक वेध आहे. तसेच, प्राचीन विज्ञानाविषयीच्या अभ्यासातील अजून कितीतरी पदर उलगडायचे आहेत हे लक्षात येते. त्यामुळे, आषाढाच्या पहिल्या दिवशी जेव्हा आकाशात ढग दाटून येतात, तेव्हा तेव्हा ते केवळ पावसाचे दूत नसतात; महाकवि कालिदासाच्या अद्वितीय प्रतिभेची, भारतीय भूगोलाच्या त्यांच्या ज्ञानाची आणि प्राचीन विज्ञान परंपरेच्या वैभवाची आठवण करून देतात. त्यांच्या काव्यातील या शब्दांना आणि पुण्याच्या वैमानिक-संशोधकांनी आकाशात घेतलेल्या भरारीला पुन्हा एकदा स्मरूया आणि नतमस्तक होऊया.
– मैत्रेयी गोडसे