Wednesday, September 23, 2026

गणपती तुझे नाव चांगले – विनायक

Share

प्रस्तावना

यंदाच्या वर्षी येणाऱ्या या अनोख्या १२ दिवसीय गणेशोत्सवानिमित्तर १२ दिवस रोज एकेक नाव आणि त्यामागील रोचक कथा आपण  ‘गणपती तुझे नाव चांगले’ या नाम मालेत पाहणार आहोत. आज गणरायाच्या प्रसिद्ध ‘विनायक’ या रूपाचे आणि नामाचे चिंतन करूया.

संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने पाहिले तर ‘विनायक’ हा शब्द दोन घटकांपासून बनतो—‘वि’ आणि ‘नायक’. येथे ‘वि’ या उपसर्गाचे दोन अत्यंत देखणे पदर आहेत. पहिला अर्थ ‘विशिष्ट’ अथवा सर्वश्रेष्ठ; म्हणजेच जो अद्वितीय मार्गदर्शक आहे तो विनायक. दुसरा अर्थ ‘विगतः नायकः यस्मात् सः’ असा होतो; ज्याच्यावर अंकुश ठेवणारा, ज्याच्यावर आज्ञा गाजवणारा दुसरा कोणताही नायक नाही, असा स्वतंत्र, स्वयंभू आणि अंतिम सत्ताधीश म्हणजे विनायक.

गणेश पुराणातील कथा

या शब्दाची महती केवळ व्युत्पत्तीत उरत नाही, तर पुराणातील एका विलक्षण कथेत तिचे दर्शन घडते.

विशिष्टो नायकः प्रोक्तो विनायक इति स्मृतः ।

अनायकोऽपि सर्वेषां नायको विघ्ननाशनः ॥

गणेश पुराणातील हा श्लोक केवळ एका देवतेची स्तुती करत नाही, तर अस्तित्वाच्या एका सर्वोच्च तत्त्वाचे दालन खुले करतो. ज्याचा स्वतःचा अन्य कोणताही स्वामी किंवा नेता नसतो, पण जो संपूर्ण विश्वाचा एकमेव अधिपती आणि विघ्ननाशक असतो, त्याला ‘विनायक’ म्हटले गेले आहे.

सृष्टीच्या आरंभी संपूर्ण ब्रह्मांड जलमय होते. शेषशायी भगवान विष्णूंच्या कानातील मळापासून ‘मधू’ आणि ‘कैटभ’ नावाचे दोन महाबलाढ्य दैत्य निर्माण झाले. ते वेदांचे हरण करू पाहत होते आणि विश्वाच्या संतुलनाला आव्हान देत होते. जगाचे पालनकर्ते असलेल्या भगवान विष्णूंना त्यांच्याशी युद्धात उतरावे लागले. हे युद्ध साधेसुधे नव्हते; तब्बल पाच हजार वर्षे अहोरात्र चालले. तरीही असुरांचा पराभव होत नव्हता. साक्षात नारायणांचे सामर्थ्य पणाला लागले होते, पण विजय गवसत नव्हता.

थकलेल्या विष्णूंच्या अंतर्मनात संभ्रम निर्माण झाला. तेव्हा भगवान महादेवांनी त्यांना युद्धातील एका मूलभूत त्रुटीचे स्मरण करून दिले—”हे नारायणा, इतके मोठे कार्य हाती घेताना तुम्ही विश्वाच्या मूळ आरंभदेवतेचे, विघ्नहर्त्याचे स्तवन करायला विसरलात.”

महादेवांचा हा संकेत मिळताच विष्णूंनी रणांगणातील अहंकाराचा त्याग केला. ते भीमा नदीच्या तीरावरील ‘सिद्धटेक’ या पावन भूमीवर आले. तिथे त्यांनी संपूर्ण एकाग्रतेने षडाक्षर मंत्राचा आश्रय घेत विनायकाची कठोर तपश्चर्या सुरू केली. विष्णूंच्या निस्सीम साधनेने प्रसन्न होऊन विनायक तिथे प्रगट झाले. त्यांनी विष्णूंना अलौकिक सिद्धी आणि विजयाचे वरदान दिले. या सिद्धीच्या बळावर विष्णूंनी मधू आणि कैटभाचा वध केला आणि विश्वाला अभय दिले. ज्या सिद्धीमुळे हे शक्य झाले, त्यावरूनच त्या स्थानाला ‘सिद्धटेक’ आणि त्या रूपाला ‘सिद्धिविनायक’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

मुद्गल पुराणातील कथा

मुद्गल पुराणातही विनायकाच्या अवताराची अशीच एक सूचक कथा आढळते. तिथे विनायक ‘दुर्मती’ नावाच्या असुराचा संहार करण्यासाठी अवतरतात. हा ‘दुर्मती’ केवळ पुराणातील एक दैत्य नाही; तो आपल्या प्रत्येकाच्या मनात दडलेली विकृत मती, दुष्ट विचार आणि भ्रामक अहंकाराचे जिवंत रूप आहे.

ज्याप्रमाणे विष्णूंना आपल्या अलौकिक शक्तीचा विसर पडून आत्मशक्तीच्या आराधनेसाठी विनायकाकडे जावे लागले, तसेच मानवी जीवनाचे आहे. बाहेरच्या जगातील संघर्षात माणूस कितीही बलवान असला, तरी जोपर्यंत तो स्वतःच्या आंतरिक विकारांवर मात करत नाही, तोपर्यंत खरा विजय अशक्य असतो. विनायकाने ‘दुर्मती’चा केलेला वध हा बाह्य रणांगणापेक्षा अंतर्मनातील अज्ञानाचा आणि दुर्बुद्धीचा संहार दर्शवतो.

विनायकाय नमः|

खरा ‘विनायक’ तोच, ज्याच्यावर वासनांचे, विकारांचे अथवा अहंकाराचे कोणतेही नियंत्रण नसते. जो स्वतःच्या इंद्रियांचा गुलाम न होता त्यांचा स्वामी बनतो, जो अंतर्बाह्य स्वायत्त आहे, तोच आत्मप्रभू होतो. विनायक हे बाह्य सत्तेचे नसून नैतिक नेतृत्वाचे आणि आंतरिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. जेव्हा मनुष्य स्वतःच्या मनावर विजय मिळवून स्वयंप्रकाशी बनतो, तेव्हा त्याच्या जीवनातील सर्व विघ्ने गळून पडतात आणि तो खऱ्या अर्थाने ‘विनायक’ तत्त्वाशी एकरूप होतो.

अन्य लेख

संबंधित लेख