प्रस्तावना
यंदाच्या वर्षी येणाऱ्या या अनोख्या १२ दिवसीय गणेशोत्सवानिमित्तर १२ दिवस रोज एकेक नाव आणि त्यामागील रोचक कथा आपण ‘गणपती तुझे नाव चांगले’ या नाम मालेत पाहणार आहोत. आज गणरायाच्या अत्यंत लाडक्या अशा ‘वक्रतुंड’ या रूपाचे आणि नामाचे चिंतन करूया.
गणपतीच्या कोणत्याही पूजेची किंवा शुभकार्याची सुरुवात करताना आपल्या ओठांवर सर्वात आधी एक श्लोक सहज येतो—‘वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ…’ लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला हा श्लोक तोंडपाठ असतो. आपल्या गणेशाला ‘वक्रतुंड’ का म्हटले गेले असावे? ‘वक्रतुंड’मधील ‘वक्र’ म्हणजे वळणदार किंवा तिरपे आणि ‘तुंड’ म्हणजे मुख अथवा सोंड. ज्याचे मुख किंवा सोंड वळलेली आहे तो वक्रतुंड, असा याचा शाब्दिक अर्थ होतो. या शब्दामागे पुराणात आलेली चित्तवेधक कथा आज आपण पाहूया आहे.
मत्सरासुराचा जन्म आणि वक्रतुंड अवतार
मुद्गल पुराणात गणेशाच्या आठ अवतारांचे अत्यंत देखणे वर्णन येते. या अष्टअवतारामध्ये सर्वात पहिला आणि प्रमुख अवतार मानला गेला आहे तो ‘वक्रतुंड अवतार’. मुद्गल पुराणातील श्लोक सांगतो:
वक्रतुण्डावतारश्च देहानां ब्रह्मधारकः ।
मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः ॥
या अवताराची कथा सुरू होते देवराज इंद्राच्या एका क्षणाच्या प्रमादातून, म्हणजेच अविवेकातून. एकदा स्वर्गाधिपती इंद्राच्या मनात अकारण अहंकार आणि भोगाचा अतिरेक निर्माण झाला. त्या क्षुब्ध मानसिकतेतून आणि इंद्राच्या प्रमादातून एका महाभयंकर दैत्याचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवण्यात आले ‘मत्सरासुर’.
मत्सर म्हणजे काय? स्वतःजवळ काय आहे यात समाधान न मानता, दुसऱ्याच्या सुखाची, यशाची आणि वैभवाची अकारण ईर्ष्या करणे, म्हणजेच मत्सर. मत्सरासुराच्या रक्तातच ही वृत्ती भिनलेली होती. जसजसा तो मोठा झाला, तसतशी त्याची सत्तेची आणि वर्चस्वाची भूक वाढत गेली. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्यांचे शिष्यत्व पत्करले. शुक्राचार्यांनी त्याला भगवान शंकराच्या ‘ॐ नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली.
मंत्रदीक्षा मिळताच मत्सरासुराने अरण्यात जाऊन महादेवांची अशी उग्र तपश्चर्या केली की त्याच्या तपोबलाने स्वर्गलोकाची आसने थरथरू लागली. अखेर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर मागायला सांगितले. मत्सरासुराने तिन्ही लोकांवर संपूर्ण अधिपत्य मिळवण्याचे आणि कोणाकडूनही पराभूत न होण्याचे अद्भूत वरदान मागून घेतले.
वरदान मिळताच मत्सरासुराच्या मत्सराला अहंकाराचे पंख फुटले. त्याच्यामुळे संपूर्ण सृष्टीत अराजक माजले. भयभीत झालेले सर्व देव स्वर्गातून जाऊन भगवान दत्तात्रेयांचा आश्रम गाठला.
भगवान दत्तात्रेयांनी, “मत्सराचा जन्म हा इंद्राच्या प्रमादातून झाला आहे, आणि मत्सर हा केवळ शक्तीने नाही, तर परब्रह्माच्या ज्ञानानेच शांत होऊ शकतो. यासाठी तुम्ही सर्वांनी आदिदैवत गणेशाची एकाग्र चित्ताने आराधना करा.”
देवांनी दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार कठोर अनुष्ठान केले. देवांच्या आर्त सादेला प्रतिसाद देत साक्षात परब्रह्म प्रगट झाले. मात्र यावेळी गणेशाने अंगावर अथांग तेज लेवून, एका पराक्रमी, गर्जना करणाऱ्या सिंहावर स्वार होऊन अवतार घेतला. हे होते ‘सिंहारूढ वक्रतुंड’!
जेव्हा मत्सरासुराला या युद्धाची वार्ता समजली, तेव्हा तो आपल्या अफाट सेनेसह रणांगणात आला. परंतु सिंहावर आरूढ झालेल्या वक्रतुंडाच्या दर्शनानेच रणांगणातील वातावरण बदलले. गणेशाच्या वक्र सोंडेतून विश्वनाद ॐकार घुमत होता. गणपतीच्या त्या शांत, सर्वसमावेशक आणि तेजस्वी रूपापुढे मत्सरासुराचे शस्त्र गळून पडले आणि त्याच्या अंतर्मनातील ईर्ष्या आणि अहंकाराचा जळफळाट वितळून गेला. मत्सरासुराने युद्धाचा त्याग केला आणि तो वक्रतुंडाच्या चरणी साष्टांग लोटांगण घालून क्षमा मागू लागला. कारुण्याची मूर्ती असलेल्या वक्रतुंडाने मत्सरासुराचा संहार केला नाही, तर त्याच्या अहंकाराचा संहार केला आणि विश्वाला मत्सराच्या विषारी विळख्यातून कायमचे मुक्त केले.
वक्रतुण्डाय नमः|
आपल्या प्रत्येकाच्या मनात एक ‘मत्सरासुर’ दडून बसलेला असतो. दुसऱ्याचे यश, वैभव किंवा सौंदर्य पाहून अस्वस्थ होणे हा मानवी मनाचा एक वक्र स्वभाव आहे. वक्रतुंडाची भक्ती करणे म्हणजे आपल्या अंतर्मनातील या ईर्ष्यारूपी असुरावर ताबा मिळवणे. जो आपल्या कुटिल विचारांना सरळ करतो, तो वक्रतुंड.
भारतीय तत्त्वज्ञानात गणपतीला साक्षात ‘प्रणवस्वरूप’ म्हणजेच ॐकाराचे प्रत्यक्ष रूप मानले गेले आहे. गणेशाचे मुख, गंडस्थळ आणि वळलेली सोंड ही प्रत्यक्ष ॐकाराची प्रतिकृती आहे.
त्यामुळे, जेव्हा आपण हात जोडून ‘वक्रतुण्ड महाकाय’ म्हणतो, तेव्हा आपण केवळ एका विशालकाय देवतेला वंदन करत नसतो; तर आपल्या बुद्धीतील सर्व वक्र भावना, अहंकार आणि मत्सर नाहीसा करून आपल्याला सन्मार्गावर चालवणाऱ्या त्या वैश्विक ॐकारस्वरूपाला शरण जात असतो.