Wednesday, June 17, 2026

संस्कृत : भारतीय भाषांची जननी आणि धोरणात्मक बदल

Share

माणसाच्या उत्क्रांतीत आणि त्याच्या संस्कृतीच्या प्रवासात भाषेचा वाटा अतिशय मोलाचा राहिला आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते, तर ती आपल्या विचारांना, आपल्या संपूर्ण मेंदूला आकार देणारे एक विलक्षण साधन आहे. या प्रवासात संस्कृतचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

त्रिभाषा सूत्रात – संस्कृत
संस्कृतचे भाषिक महत्त्व सर्वश्रुत आहेच. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय स्तरावर बहुभाषिकतेला चालना देण्यासाठी त्रिभाषा सूत्राची नव्याने मांडणी करण्यात आली आहे.

  • तुकड्यांचे कायदेशीर बंधन
    पूर्वी अनेक शाळा “आमच्याकडे शिक्षक नाहीत” किंवा “संस्कृत शिकणारे विद्यार्थी कमी आहेत” असे सांगून हा पर्याय उपलब्ध करून देत नसत. आता प्रत्येक शाळेत इयत्ता ६ वी आणि ९ वी साठी किमान एक संस्कृतची तुकडी ठेवणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शाळांच्या वेळापत्रकात आणि रचनेत संस्कृतला अधिकृत स्थान मिळाले आहे.
  • विद्यार्थी संख्येनुसार नियोजन
    विद्यार्थ्यांची संख्या कशीही असली, तरी त्यांना आवडीचा पर्याय मिळावा यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. एकच तुकडी असलेल्या शाळांमध्ये किमान १५ विद्यार्थ्यांनी संस्कृतची निवड केल्यास एकाच वर्गात स्वतंत्र गट करून दोन्ही भाषा शिकवता येतील. दोन किंवा अधिक तुकड्या असलेल्या शाळांमध्ये संस्कृत आणि प्रादेशिक भाषांसाठी स्वतंत्र तुकड्या करता येतील.
  • स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय
    केंद्रीय विद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बदल्यांमुळे त्यांना वारंवार राज्य बदलावे लागते. अशा वेळी तिसरी भाषा बदलण्याची अडचण निर्माण होते. मात्र, सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये संस्कृतचा पर्याय उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य राहील.
  • पाठ्यपुस्तके आणि संसाधनांची हमी
    सीबीएसईने इयत्ता ६ वीसाठी ‘दीपकम् भाग-१’ हे नवीन संस्कृत पाठ्यपुस्तक अवघ्या ६५ रुपयांत उपलब्ध करून दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषा किंवा संस्कृत यांपैकी एक निवडण्याचा प्रत्यक्ष अधिकार मिळतो.

भारतीय ज्ञान प्रणाली
नव्या शैक्षणिक धोरणाचा मुख्य कणा ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ हा आहे. प्राचीन शिक्षणपद्धतीचा उद्देश केवळ माहिती देणे नसून व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधणे हा होता. पंचकोश सिद्धांत, अष्टांग योग आणि निसर्गाशी सुसंगत जीवनपद्धती यांद्वारे शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासावर भर दिला जात असे. या ज्ञानपरंपरेचे प्रमुख माध्यम संस्कृत भाषा असून, तिच्याद्वारे विद्यार्थ्यांना इतिहासाबरोबरच गणित, खगोलशास्त्र आणि शाश्वत जीवनमूल्यांची ओळख होते.

वास्तव आणि सरकारसमोरील करणीय मुद्दे
सैद्धांतिक दृष्ट्या हे धोरण आणि केंद्रीय विद्यालयांचा निर्णय जितका आदर्श आहे, तितकीच याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आव्हानात्मक आहे. अनेक शाळांमध्ये पात्र आणि आधुनिक अध्यापनशास्त्र जाणणाऱ्या संस्कृत शिक्षकांचा देशव्यापी प्रचंड तुटवडा आहे. त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे. तसेच, पारंपरिक इंग्रजांच्या सोयीने रचलेल्या घोकंपट्टी पद्धती आणि कठीण व्याकरणाच्या नियमांऐवजी दैनंदिन वापरातील ‘संभाषणात्मक सरल संस्कृत’ शिकवण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी डिजिटल खेळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.

संस्कृत ही केवळ भूतकाळातील ऋषीमुनींची भाषा नाही, तर ती भविष्यात सर्व भारतीयांना एका भाषेने जोडून ठेवणारा महामार्ग आहे. तिचे संवर्धन राजकीय चौकटीत न अडकवता, तिचे लोकशाहीकरण करून ती सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि रंजक करणे, हेच खऱ्या अर्थाने या धोरणाचे यश ठरेल. भाषा माणसांना जवळ आणण्यासाठी असते, दूर नेण्यासाठी नाही; हाच भाषेचा खरा हेतु विसरता कामा नये.

– मैत्रेयी गोडसे

अन्य लेख

संबंधित लेख