Monday, August 3, 2026

‘मन तड़पत हरी दरशनको आज’: हिंदू समरसतेचे प्रतीक

Share

जेव्हा जेव्हा भारतीय संगीत, भक्ती आणि सांस्कृतिक ऐक्याची चर्चा होते, तेव्हा अनेक नावे समोर येतात. त्यापैकीच एक हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार शकील बदायुनी यांची जयंती ३ ऑगस्ट १९१६ रोजी असते. शकील साहेबांनी आपल्या लेखणीतून प्रेमाचे नाजूक रंग भरले, विरहाच्या वेदना मांडल्या आणि ईश्वराच्या भक्तीचे असे सूर छेडले, जे काळाच्या पटलावर अजरामर झाले.

त्यापैकीच त्यांनी लिहिलेले १९५२ मधील ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील एक भजन आपोआप ओठांवर येते- ‘मन तड़पतहरी दरशन को आज…’

एक अमर भक्तिगीत

या भजनाचे अलौकिक सौंदर्य केवळ त्याच्या शब्दांत किंवा रागात नाही, तर ज्या भावनेतून याची निर्मिती झाली त्या भावात आहे.

• गीतकार: शकील बदायुनी

• संगीतकार: नौशाद अली

• गायक: मोहम्मद रफी

हे तिघेही जन्माने आणि उपासना पंथाने मुस्लिम. पण जेव्हा ईश्वराच्या भक्तीचा आणि संगीताचा विचार आला, तेव्हा या तिघांनी मिळून असा एक भावपूर्ण ‘हरिपाठ’ रचला, ज्याने कोट्यवधी भाविकांच्या हृदयात भक्तीचा कल्लोळ निर्माण केला. शास्त्रीय संगीतातील राग ‘मालकंस’ वर आधारित हे भजन ऐकताना आज ६०-७० वर्षांनंतरही मन ईश्वराच्या दर्शनासाठी तितकेच व्याकुळ होते.

संस्कृति सब की एक चिरंतन…

संगीतकार नौशाद साहेबांनी जेव्हा या भजनाची धून बसवली, तेव्हा त्यांनी गाण्याच्या सुरुवातीला असणारा ‘हरी ॐ’ चागजर आणि मंगलाचरण इतक्या तन्मयतेने रचले की ऐकणारा मंत्रमुग्ध होतो. आणि जेव्हा मोहम्मद रफी यांनी आपल्या पहाडी तरीही भावूक आवाजात शकील साहेबांचे शब्द आळवले, तेव्हा देव आणि भक्तामधील अंतर मिटून गेले.
हाच आपल्या व्यापक हिंदू संस्कृतीचा एक अलौकिक दाखला आहे. व्यक्तीने आपल्या ईश्वरचिंतनासाठी कोणत्याही उपासना पंथाचा मार्ग स्वीकारलेला असो, पण जेव्हा ती या भारतभूमीच्या मातीशी आणि तिच्या सांस्कृतिक अस्मितेशीअंतःकरणापासून एकरूप होते, तेव्हा द्वेषाच्या सर्व भिंती क्षणात ढासळून पडतात. भारतीय तत्त्वज्ञानात ‘धर्म’ म्हणजे केवळ पूजा-पद्धत नसून, ‘धर्म म्हणजे कर्तव्य’ असे म्हटले आहे. त्यामुळे उपासना मार्ग वैदिक असो वा इस्लाम, जोपर्यंत व्यक्ती या भारतभूमीची मूल्ये, उदात्त परंपरा आणि या हिंदू संस्कृतीशी तादात्म्य पावलेली आहे, तोपर्यंत संस्कृतीच्या आणि धर्माच्या अंगाने ‘हिंदू’च आहे. हीच आपल्या राष्ट्राची चिरंतन ताकद आहे — जिथे कलेला, संगीताला आणि भक्तीला प्रचलित धर्माच्या चौकटीत कधीच बांधता आले नाही.

फाळणीनंतरचा अक्षम्य अपराध

स्वातंत्र्य आणि फाळणीच्या भीषण आघातानंतर भारतातच राहण्याचा निर्णय घेणाऱ्या मुस्लिम बांधवांना, सामायिक संस्कृतीशी आणि भारतमातेशी अंतःकरणापासून एकरूप करणे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाला अत्यंत सहजसाध्यहोते. पं. बिस्मिल्ला खाँ यांना ते शेवटी आजारी असताना जेव्हा विचारले होते की, तुमचे सर्व वैद्यकीय उपचार आता दिल्लीत करूया का? तेव्हा ते म्हणाले होते की, आता मी काशीतच जाणार! 

‘चना चबैना गंगजल, जो पुरवै करतार, काशी कबहूं न छोड़िए, विश्वनाथ दरबार।’

शकील साहेब, नौशाद आणि रफी साहेबांसारख्या कलाकारांनी संगीताच्या माध्यमातून जो राष्ट्रीय एकात्मतेचा सुंदर पूल बांधला होता, तो सामाजिक व राजकीय पातळीवर अधिक दृढ करण्याची ती एक सुवर्णसंधी होती. मात्र, दुर्दैवाने राष्ट्रीय एकात्मतेऐवजी ‘मतपेटीचे राजकारण’ आणि तुष्टीकरणाचा मार्ग निवडला गेला. मुस्लीम समाजाला भारतमातेच्या मुख्य सांस्कृतिक प्रवाहाशी जोडून घेण्याऐवजी, केवळ निवडणुकीच्या गणितांसाठी त्यांचा वापर केला गेला. याच राजकीय स्वार्थामुळे काळाच्या ओघात हिंदू-मुस्लिम समाजात दुर्दैवी दुरावा आणि अविश्वास निर्माण होत गेला.

शकील साहेबांना विनम्र अभिवादन

आज शकील बदायुनी यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या या अजरामर रचनेची आठवण करणे म्हणजे एका महान गीतकाराचासन्मान करणे तर आहेच. शिवाय, आपल्या या देशाच्या चिरंतन संस्कृतीची नाळ किती घट्ट रुतलेली आहे याचे ते एक द्योतक आहे.

शकील साहेब, तुमच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द आणि भक्तीचा हा भाव युगानुयुगे प्रत्येक भारतीयाच्या मनावर असाच अधिराज्य गाजवत राहील!


@askindiaask

अन्य लेख

संबंधित लेख