Friday, June 12, 2026

ती फुलराणीचा निर्माता तो पुलराजा… स्मृतिदिन

Share

किमान ५ दशके आपल्या कथाकथनाने आणि लिखाणाने महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पुल उर्फ भाई यांचा आज २६ वा स्मृतिदिन…

“निखळ विनोद” हे पुलंच्या विनोदाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य…
त्यांनी आपल्या लिखाणातून मराठी माणसाच्या सवयी, स्वभाव आणि समाजातील विसंगतींवर अत्यंत हलक्या फुलक्या आणि उपरोधिक शैलीत भाष्य केले आहे…
१९४३ साली अभिरुची मासिकाच्या एका अंकामध्ये ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले आणि ते मराठी वाचकांच्या प्रचंड पसंतीस आले… नंतर १९६३ पर्यंत प्रसिद्ध झालेली एकूण २० व्यक्तिचित्रे ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकाच्या माध्यमातून संग्रहित झाली… आणि मग प्रत्येकामध्ये एक ‘वल्ली’ लपलेला असतो तो फक्त टिपता आला पाहिजे हे पुलंच वाक्य १००% पटते…


या पुस्तकात ‘नामू परीट’ नावाची अगदी वेगळी सामाजिक पार्श्वभूमी लाभलेली व्यक्तिरेखा वाचकांसमोर उभी करताना पुलं.नी त्याचे “सदैव कपड्यांच्या जगात वावरणारा इतका नागवा माणूस माझ्या पाहण्यात नाही” म्हणून केलेले वर्णन विलोभनीय आहे…

“माहेर” एका अंकातील भारती आचरेकरांच्या मुलाखतीत त्या म्हणतात… त्यांची आई माणिक वर्मा ह्यांचे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले ‘हिने तर वर्मावरच घाव घातला’… मराठी भाषेच्या श्लेष अलंकाराचे हे वर्म सुचायला पुलच हवेत असे म्हणावेसे वाटते…

मराठी भाषेतील नवीन प्रतिशब्दांवर चर्चा करताना पुल म्हणाले, “जर आपण विमानातील एअरहोस्टेसला ‘हवाई सुंदरी’ म्हणतो, तर हॉस्पिटलमधील नर्सला ‘दवाई सुंदरी’ का म्हणू नये? आणि हॉटेलात वाढणाऱ्याला जर आपण ‘वाढपी’ म्हणतो, तर विमान चालवणाऱ्या वैमानिकाला ‘उडपी’ का म्हणू नये?”… अशा अप्रतिम शाब्दिक “कोट्या” करणारे पुल मराठी भाषेतील “कोट्याधीश” होते…

पोस्ट ऑफिसच्या जुन्या कामकाजाची आणि त्यातील कर्मचाऱ्यांच्या ‘खाद्यसंस्कृतीची’ (उदा. चहा-पाणी आणि खाणे) अतिशय गमतीशीर आणि उपरोधिक वर्णने केलेल्या आपल्या ललित लेखाला… “माझे पौष्टिक जीवन” म्हणून शीर्षक सुचण्यासाठी सरस्वतीचा वरदहस्तच असावा लागतो आणि तो पुलंवर नक्की होता…

पाश्चात्त्य संस्कृती आणि आपली संस्कृती यातला फरक सांगताना पुलंनी मार्मिकपणे… “त्यांची संस्कृती द्राक्षाची आहे तर आपली रुद्राक्षाची” म्हणत बहार उडवून दिली होती…

बटाट्याची चाळ, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, खोगीरभरती, अघळपघळ, गोळाबेरीज, हसवणूक, खिल्ली, पुरचुंडी, उरलंसुरलं हे ललित आणि विनोदी साहित्य… अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा ही प्रवास वर्णने… तुझं आहे तुजपाशी, ती फुलराणी, एक झुंज वाऱ्याशी, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, अंमलदार, तुका म्हणे आता अशी नाट्यसंपदा… गुण गाईन आवडी, आपुलकी ही व्यक्तीचित्रे… पुल अशा विपुल साहित्य सेवेचे धनी आहेत…

मात्र बटाट्याची चाळ हा त्यांच्या सगळ्या साहित्य भंडारावरचा कळस आहे…

पुलंचा “बटाट्याची चाळ” हा मराठी साहित्यातील एक अजरामर एकपात्री व बहुरूपी प्रयोग आहे… १६ फेब्रुवारी १९६१ रोजी मुंबईतील भारतीय विद्या भवन येथे या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग झाला… हा कार्यक्रम अठरापगड जातीची कुटुंब राहणाऱ्या गिरगावातील ६० खोल्यांच्या चाळीतील संस्कृती… तेथील रहिवाशांचे जीवन… त्यांच्या स्वभावाचे कंगोरे आणि विविध विनोदी प्रसंगांवर आधारित आहे… पुढे या बटाट्याच्या चाळीचे देश विदेशात शेकडो प्रयोग झाले…
याच प्रयोगात “वायु भक्षण करून राहणारे ऋषी काय किंवा साबुदाण्याच्या लापशीवर एकादशी करणाऱ्या मावशी काय, एकाच थोर परंपरेचे वारस”… अशा अप्रतिम शैलीत पुल आपल्या संस्कृतीचा मर्मभेद करतात…


पुलंचा “बटाट्याची चाळ” हा एकपात्री प्रयोग… एका अर्थाने महाराष्ट्रातला मराठीतला पहिला “स्टॅन्ड अप कॉमेडी” प्रयोग मानला पाहिजे… आपल्या या एकपात्री प्रयोगातून अभिरुची संपन्न नर्म विनोदी शैलीत मानवी जीवनाचे कंगोरे उलगडून दाखवणारे पुल हे खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे वैभव आहे…
आणि अलीकडेच मराठी भाषिक स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे यांच्या शो मधील एका प्रेक्षकाच्या विधानामुळे ‘३७० रुपयांची बिर्याणी’ हा मोठा वाद सोशल मीडियावर पेटला… हिमांशू जांग्रा नावाच्या प्रेक्षकाने शो दरम्यान सांगितले होते की… एका डेटवर ३७० रुपयांची चिकन बिर्याणी खाऊ घातल्यानंतर, महिलेने त्याला घरी सोडण्यास सांगितल्यावर त्याने त्या पैशांची ‘वसुली’ म्हणून लैंगिक अपेक्षा केली होती… प्रणीत मोरे यांनी या संतापजनक विधानाला आक्षेप घेण्याऐवजी त्याचे समर्थन केले…

प्रणीत मोरे यांच्या शो मधील या ‘सडक्या मानसिकतेवर’ आणि महिलांविषयीच्या अवमानकारक विचारांवर नेटकऱ्यांनी कडाडून टीका केली… प्रचंड ट्रोलिंग आणि वादानंतर प्रणीत मोरे आणि त्या प्रेक्षकाने सोशल मीडियावर माफी मागितली…
पण निश्चितपणे हे आपले सांस्कृतिक अधःपतन आहे…
आज पुल हयात असते आणि त्यांनी आपल्या “स्टॅन्ड अप कॉमेडी” या एकपात्री नाट्य प्रकाराची झालेली वाताहात पाहिली असती… तर ते नक्की म्हणाले असते… “तुझं आहे का तुजपाशी, मोरे तू सभ्यता चुकलासी”…

अन्य लेख

संबंधित लेख