Friday, May 29, 2026

‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ!

Share

रितेश देशमुख यांनी निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतो आहे. हा मूळ मराठी चित्रपट हिंदीत तर गेला आहेच; पण आता तो अनेक दक्षिण भारतीय भाषांमध्येही जातो आहे. रितेश देशमुख यांनी एका दशकापेक्षा दीर्घकाळ या भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे स्वप्न पाहिले. अनेक अडचणी, अडथळे पुरे करून त्यांनी हे स्वप्न आता पुरे केले आहे. एक मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आजवर सव्वाशे कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे.

एका मूळ मराठी चित्रपटाने मारलेली ही भरारी नक्कीच अभिनंदनीय आहे. मात्र, यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबोलपणे आपला वाटा उचलला होता. खुद्द रितेश देशमुख यांनीच या गोष्टीचा उल्लेख केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या सहकार्याची माहिती सर्वांसमोर आली.

झाले असे की, या चित्रपटाचे आउटडोअर चित्रिकरण सातारा, वाई, महाबळेश्वर तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील काही जागी होत होते. मात्र, मुंबईजवळ असणाऱ्या राज्य सरकारच्या मालकीच्या जागेत (फिल्म सिटी) चित्रिकरण काही होत नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे या जागेचे भाडे परवडणारे नव्हते. या जागेवर प्रचंड मोठा सेट उभारावा लागला तर तो दीर्घकाळ ठेवावा लागणार होता.

 इतके भाडे कसे परवडणार, अशी चिंता रितेश यांना वाटत होती. याच चिंतेतून या चित्रपटाचा निर्माता या नात्याने रितेश देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि आपली अडचण कानावर घातली. हिंदी चित्रपटांइतके बजेट मोठे नसल्याने सरकारी जागेचे भाडे परवडणार नाही, याची काळजी त्यांच्या मनात होती. मात्र, त्यांची ही अडचण ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी ‘उद्या सकाळी तुम्हाला हवी असणारी जागा चित्रिकरणासाठी उपलब्ध असेल,’ असा शब्द दिला आणि त्याप्रमाणे ही जागा पुढे अनेक महिने चित्रिकरणासाठी उपलब्ध झाली.

 विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी आजवर कधीही याचा साधा उल्लेखही केला नाही. एका पुरस्कार सोहळ्यात रितेश यांनी नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी, सत्काराला उत्तर देताना रितेश देशमुखांनी ही आठवण सर्वांना सांगितली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आणि कार्यावर चित्रपट निघत असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे हे महाराष्ट्र सरकारचे कर्तव्यच आहे,’ अशी मुख्यमंत्र्यांची भावना होती, असेही रितेश देशमुख यांनी आवर्जून सांगितले. 

कित्येक वर्षांपूर्वी जब्बार पटेल यांनी ‘सिंहासन’ हा चित्रपट काढला, तेव्हा मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवार यांनी मूळ कथानकाची विश्वासार्हता वाढावी, यासाठी कसे मंत्र्यांचे बंगलेच चित्रिकरणासाठी दिले, याच्या कथा आजही सांगितल्या जातात. अर्थात, तेव्हा विधानसभेच्या सभागृहाचे चित्रिकरण पुण्यातील बी. जे. मेडिकल महाविद्यालयाच्या सभागृहात करावे लागले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही जाहिरात होऊ न देता आणि श्रेयाचा विचारही मनात न आणता रितेश देशमुख यांची अडचण एका क्षणात दूर केली. स्वत: रितेश यांनी ही आठवण सांगितलीच नसती तर कदाचित् महाराष्ट्राला ही गोष्ट कधी समजलीही नसती. 

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे आऊटडोअर चित्रिकरण अनेक ठिकाणी झाले. मात्र, चित्रपटातील अनेक घटनांचे चित्रिकरण भव्य अशा सेट्सवरच करावे लागणार होते. असे इनडोअर शूट करण्यासाठी लागणारा भव्य सेट अनेक महिने जपून ठेवावा लागणार होता. या साऱ्याची किंमत कदाचित काही कोटी रुपयांमध्ये गेली असती. मराठी निर्मात्याच्या दृष्टीने हा खर्च आवाक्याबाहेरचा होता. ही सारी अडचण मुख्यमंत्र्यांनी दोन मिनिटांच्या टेलिफोन संभाषणात दूर केली. 

मुख्यमंत्री तेव्हा म्हणाले तीच महाराष्ट्राची लोकभावना होती आणि आजही असते, ‘आपल्या शिवाजी महाराजांचे कार्य आहे ना, मग आपण जमेल ते आणि जमेल तितके करायचेच…’!

– सारंग दर्शने

अन्य लेख

संबंधित लेख