स्वातंत्र्यलढ्याचे पवित्र स्तोत्र, हजारो क्रांतिकारकांच्या ओठांवरचे स्फूर्तिगीत आणि कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात उचंबळत असणारी अजरामर मातृवंदना म्हणजे ‘वंदे मातरम्’! हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या रक्ताने पुनीत झालेल्या या अलौकिक राष्ट्रीय गीताबाबत काँग्रेस पक्षाने घेतलेला निर्णय अत्यंत संतापजनक, देशाच्या अखंडतेला गालबोट लावणारा आणि संकुचित वृत्तीचे लज्जास्पद दर्शन घडवणारा आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीने (CWC) आपल्या अंतर्गत कार्यक्रमांमध्ये आणि पक्षीय व्यासपीठांवर ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोनच कडवी गायली जातील, या १९३७ च्या जुनाट, अत्यंत वादग्रस्त आणि मुस्लिम तुष्टीकरणावर आधारित निर्णयाचा पुनरुच्चार केला आहे. हा निर्णय केवळ एका कालजयी गीताचा अपमान नाही, तर या भारतभूमीच्या राष्ट्रीय अस्मितेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा घोर अवमान आहे.
आज एकविसाव्या शतकात, जेव्हा भारत नव्या आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि जागतिक पटलावर सांस्कृतिक वैभव घेऊन उभा राहत आहे, अशा अमृतकाळात काँग्रेसची ही मागासलेली आणि लाचार भूमिका म्हणजे थेट बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या भारतद्वेष्ट्या विचारसरणीचे पुनरुज्जीवन आहे. हा निर्णय म्हणजे काँग्रेस ही ‘आजच्या काळातील मुस्लिम लीगच बनली आहे’, असे अतिशय स्पष्ट, रोखठोक, ठाम आणि कठोर शब्दांत ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय प्रतिकांचे तुकडे करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याची ही संकुचित वृत्ती लोकशाहीला आणि राष्ट्रवादाला घातक आहे.
राष्ट्रपती भवन ते संसद : संपूर्ण ‘वंदे मातरम्’चा घोष
गेल्या काही काळात देशामध्ये राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचे नवे गौरवशाली पर्व सुरू झाले आहे. देशाचे सर्वोच्च घटनात्मक पद असलेल्या राष्ट्रपती भवनापासून ते १४० कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेच्या सर्वोच्च लोकशाही मंदिरापर्यंत, अशा सर्व महत्त्वाच्या, लोकशाहीचे मानबिंदू असलेल्या आणि अधिकृत सरकारी ठिकाणी आता संपूर्ण वंदे मातरम्चे गायन मानाने, अभिमानाने केले जात आहे.
केंद्र सरकारने आणि संसदेने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, ‘वंदे मातरम्’च्या दीडशेव्या वर्धापनाचे औचित्य साधून या अमर कृतीला तिचे मूळ, पूर्ण आणि सर्वोच्च स्थान मिळवून देण्यात आले. सर्व शासकीय आणि राष्ट्रीय समारंभांमध्ये संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गाणे कायद्याने अनिवार्य करण्यात आले असून, या राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांवर किंवा त्याच्या गायनात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. या ऐतिहासिक निर्णयामुळे देशभर राष्ट्रभक्तीचा आणि आत्मसन्मानाचा एक नवा आणि अभूतपूर्व अध्याय सुरू झाला.
संसदेच्या भव्य सभागृहात आणि शासकीय सोहळ्यांमध्ये जेव्हा ऋषितुल्य साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले हे संपूर्ण काव्य गायले जाते, तेव्हा प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाचा उर अभिमानाने भरून येतो. संपूर्ण ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक विशिष्ट धार्मिक रूपक नाही, तर ते या भारतभूमीच्या भौगोलिक, नैसर्गिक आणि आध्यात्मिक सौंदर्याचे अद्वितीय वर्णन आहे. ‘सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्, शस्यश्यामलाम् मातरम्’ या ओळींतून प्रकटणारी या भूमीची निसर्गदत्त समृद्धी आणि पुढील कडव्यांमधील कोटी-कोटी लेकरांच्या रक्षणकर्त्या शक्तीचे अजोड वर्णन हे कोणत्याही एका धार्मिक चौकटीतील नसून संपूर्ण राष्ट्राच्या जडणघडणीचे आहे.
जेव्हा संपूर्ण देश राष्ट्रपती भवनापासून ते शाळा-महाविद्यालयांपर्यंत पूर्ण ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत आहे, तेव्हा देशातील एका प्रमुख आणि जुन्या राजकीय पक्षाने या अखंड राष्ट्रगीताचे तुकडे करण्याचा पुन्हा एकदा अट्टहास धरावा, ही दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे.
तुष्टीकरणाचे गलिच्छ राजकारण
काँग्रेसच्या या राष्ट्रविरोधी भूमिकेवर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कठोर शब्दांत प्रहार केला आहे. सन १९३७ मध्ये काँग्रेसने केवळ आणि केवळ मुस्लिम तुष्टीकरणासाठी आणि व्होट बँकेच्या स्वार्थी राजकारणासाठी ‘वंदे मातरम्’चे तुकडे केले. ती काँग्रेसची ऐतिहासिक आणि अक्षम्य चूक होती. त्याच चुकीने पुढे जाऊन देशाच्या फाळणीची आणि द्विराष्ट्रवादाच्या (Two-Nation Theory) विषारी सिद्धान्ताची बीजे पेरली. दुर्दैवाने, स्वातंत्र्याच्या आठ दशकांनंतरही काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्याच जुन्या ऐतिहासिक चुकांना लाचारपणे घट्ट कवटाळून बसला आहे.
बंकिमचंद्रांच्या या अमर कृतीचा अपमान म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीच्या तख्तावर चढलेल्या आणि आयुष्याची वर्षेच्या वर्षे अंदमानच्या काळ्या पाण्याची सजा भोगलेल्या क्रांतिकारकांच्या बलिदानाचा अवमान आहे. आज मोदी सरकारने संसदेत कायदा करून या राष्ट्रगीताला पूर्ण सन्मान मिळवून दिला आहे, त्याचवेळी काँग्रेस या कायद्याला आणि देशभावनेला पायदळी तुडवून १९३७ च्या जुनाट ठरावाला प्राधान्य देत आहे.
भारतीय जनता पक्षाने आणि देशातील सर्व राष्ट्रप्रेमी जनतेने काँग्रेसच्या या भूमिकेला ‘आजच्या काळातील नवी मुस्लिम लीग’ असे म्हटले तर त्यात काय चुकले? स्वातंत्र्यापूर्वी मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लिम लीगने स्वतःच्या जातीयवादी आणि विभक्ततावादी अजेंड्यासाठी ‘वंदे मातरम्’ला विरोध केला आणि काँग्रेसने त्यांच्यासमोर गुडघे टेकले. हुबेहूब तीच लाचार, भित्री आणि लांगूलचालनाची वृत्ती आज दिसते आहे.
‘वंदे मातरम्’चा गौरवशाली इतिहास
आजची काँग्रेस ही मूळ काँग्रेसची केवळ एक बुरसटलेली सावली उरली आहे. एकेकाळी काँग्रेसच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला आत्म्याचे स्थान होते. ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनांमधील या गीताचा प्रवास प्रेरणादायी राहिला आहे..
- १८९६ चे कोलकाता (कलकत्ता) अधिवेशन : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासात १८९६चे कोलकाता अधिवेशन सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले. या अधिवेशनात पहिल्यांदाच काँग्रेसच्या अधिकृत मंचावरून ‘वंदे मातरम्’ हे गीत गायले गेले. विशेष म्हणजे, विश्वकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः या काव्याला अतिशय सुरेल चाल लावून ते व्यासपीठावर पूर्णपणे गायले. टागोरांच्या या गायनाने अधिवेशनात राष्ट्रभक्तीची एक लाट उसळली.
- १९०५ चे वाराणसी अधिवेशन आणि वंगभंग आंदोलन : लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीविरोधात जेव्हा संपूर्ण देश पेटून उठला, तेव्हा १९०५ च्या वाराणसी अधिवेशनात सरलादेवी चौधुराणी यांनी आपल्या भगिनींच्या साथीने वंदे मातरम्चे सूर आळवले. या अधिवेशनानंतर ‘वंदे मातरम्’ हा केवळ एका पक्षाचा किंवा गीताचा भाग राहिला नाही, तर तो इंग्रजी हुकूमशाहीला थरकाप उडवणारा संपूर्ण भारताचा परवलीचा महामंत्र बनला. ‘वंदे मातरम्’चा नारा देत हजारो देशभक्तांनी इंग्रजांच्या लाठ्या-काठ्या आणि गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या.
- १९२३ चे काकीनाडा अधिवेशन आणि पहिला धार्मिक आक्षेप : १९२३ च्या काकीनाडा अधिवेशनात काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मौलाना मोहम्मद अली यांनी वंदे मातरम्च्या गायनाला पहिला सार्वजनिक विरोध दर्शवला आणि हे गीत गायले जाऊ नये अशी भूमिका घेतली. परंतु, तत्कालीन राष्ट्रीय स्वाभिमान इतका जागा होता की, पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी अध्यक्षांच्या या विरोधाला न जुमानता व्यासपीठावर उभे राहून पूर्ण वंदे मातरम् गायले.
- १९३७ ची काँग्रेसची शरणागती : १९३० च्या दशकात जिन्नांची मुस्लिम लीग आक्रमक झाली. मग काँग्रेस नेतृत्व डगमगू लागले. मुस्लिम लीगने ‘वंदे मातरम्’मध्ये मूर्तिपूजा आहे आणि ते इस्लामविरोधी आहे असा अपप्रचार सुरू केला. या जातीय दबावाला बळी पडत, ऑक्टोबर १९३७ च्या कोलकाता येथील काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसने ऐतिहासिक शरणागती पत्करली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या सल्ल्याचा विपर्यास करत, धार्मिक आक्षेप टाळण्याच्या नावाखाली काँग्रेसने या राष्ट्रगीताची छाटणी केली आणि केवळ पहिली दोनच कडवी गाण्याचा तडजोडीचा ठराव संमत केला. ही तडजोडीची भूमिका म्हणजेच राष्ट्रीय अस्मितेशी केलेला पहिला भयंकर द्रोह होता.
दोनच कडव्यांचा अट्टहास का?
आज स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे उलटून गेल्यानंतर आणि देश अमृतकाळात पदार्पण करत असताना, काँग्रेसला पुन्हा एकदा त्याच १९३७ च्या आत्मघाती वळणावर जाण्याची गरज का वाटली? याचे एकमेव उत्तर म्हणजे काँग्रेसचे गलिच्छ आणि लाचार व्होट बँक राजकारण.
देशाची संस्कृती, महान परंपरा आणि राष्ट्रीय प्रतिकांशी मनापासून जोडले जाण्याऐवजी, केवळ मुस्लिम मतपेढीला खूष करण्यासाठी राष्ट्रगीताची छाटणी करणे ही मानसिक लाचारीची आणि वैचारिक दारिद्र्याची पराकाष्ठा आहे. ‘आम्ही संसदेचा कायदा मानणार नाही, आम्ही राष्ट्रपती भवनातील परंपरा मानणार नाही, आम्ही आमचाच १९३७ चा जुनाट आणि तुष्टीकरणाचा निर्णय लागू करू..’ हा राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अहंकार देशप्रेमी जनता कधीही सहन करणार नाही. संपूर्ण वंदे मातरम् देशभर सर्व नागरिक अभिमानाने गातात, तर काँग्रेसच्या मंचावर त्याचे असे संपादन का?
हुतात्म्यांचा आणि बंकिमचंद्रांचा अपमान
वंदे मातरम् यात केवळ साहित्यिक सौंदर्य नसून तो एक राष्ट्रीय महामंत्र आहे. ज्याच्या एका हुंकाराने ब्रिटिश साम्राज्याची पाळेमुळे हादरली. प्रत्येक क्रांतिकारकाच्या मुखातून ‘वंदे मातरम्’चेच सूर उमटले. फाशीच्या दोराचे चुंबन घेताना असंख्य नरवीरांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला.
अशावेळी या अमर रचनेवर कात्री चालवणे आणि तिचे तुकडे करणे म्हणजे प्रत्येक हुतात्म्याच्या बलिदानाचा अवमान. काँग्रेसच्या या निर्णयामुळे सीमेवर ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचाही अपमान होतो आहे.
हा खेळ आता थांबायला हवा
वंदे मातरम् हे केवळ साधे गाणे नाही. वंदे मातरम् ही या भारतभूमीची आरती आहे. तो या मातीचा उच्छवास आहे. त्यातील प्रत्येक शब्दात या भूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा आहे. सन १९३७ मधील काँग्रेसच्या आत्मघातकी तडजोडींमुळे आणि तुष्टीकरणामुळे या देशाने फाळणीची किंमत मोजली. लाखो निष्पाप बळी गेले. आता मात्र राष्ट्रभक्तीशी तडजोड करणाऱ्यांना जनता क्षमा करणार नाही. काँग्रेसने आपल्या या देशविरोधी, संकुचित आणि देशविरोधी भूमिकेचा पुनर्विचार करावा आणि संपूर्ण वंदे मातरम्चा स्वीकार करावा. काँग्रेसची अवस्था बुडत्याचा पाय खोलात, अशी आहे. ‘वंदे मातरम्’चा अपमान ही काँग्रेसच्या प्रवासातली नवी खाई आहे…