Friday, July 31, 2026

लढवय्या लेखिकेचे पुनरागमन..!

Share

जगविख्यात लेखिका तस्लिमा नसरीन या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यानंतर तब्बल १९ वर्षांनी कोलकत्यात परतल्या आहेत. या निमित्ताने त्यांच्या प्रवासाचा हा आलेख…

जेव्हा एखादी लेखणी सत्तेला, धर्मांधतेला आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेला थेट प्रश्न विचारू लागते, तेव्हा तिच्या नशिबी अनेकदा निर्वासन, फतवे आणि हद्दपारी येते. बांगलादेशी लेखिका, मानवी हक्कांच्या कट्टर समर्थक आणि निर्भीड विचारवंत तस्लिमा नसरीन यांचा प्रवास असाच वादळी, वेदनादायी परंतु अभूतपूर्व संघर्षाने भरलेला आहे. तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर त्या पुन्हा कोलकात्याच्या भूमीत परतल्या आहेत. सन २००७ मध्ये ज्या सुसंस्कृत महानगराने हिंसक आंदोलनांनंतर त्यांना निरोप दिला होता, त्याच कोलकात्यात त्यांचे पुन्हा पाऊल पडणे, हा केवळ एका लेखिकेचा वैयक्तिक प्रवास नसून तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.

वैद्यकीय डॉक्टर ते निर्भीड लेखिका
तस्लिमा नसरीन यांचा जन्म बांगलादेशात (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पेशाने त्या एक वैद्यकीय डॉक्टर. सरकारी रुग्णालयांमध्ये आणि ग्रामीण भागात काम करत असताना त्यांना समाजातील शोषित स्त्रियांचे जगणे जवळून पाहता आले. धर्माच्या नावाखाली महिलांवर होणारे कौटुंबिक व सामाजिक अत्याचार, त्यांचे आरोग्य आणि त्यांच्या मानवी हक्कांची होणारी पायमल्ली त्यांनी रोज उघड्या डोळ्यांनी पाहिली. या अनुभवांनीच त्यांच्यातल्या संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ केले आणि त्यांच्या हाती शस्त्र म्हणून लेखणी आली.
त्यांनी कविता, वृत्तपत्रीय स्तंभ आणि कादंबऱ्यांच्या माध्यमातून स्त्री-मुक्तीचा आणि धर्मनिरपेक्षतेचा आक्रमक पुरस्कार करण्यास सुरुवात केली. मात्र, एका स्त्रीने धर्मातील कुप्रथांवर, पुरुषांच्या वर्चस्ववादी मानसिकतेवर आणि राज्यव्यवस्थेवर बोट ठेवावे, हे बांगलादेशी समाजातील धर्मांध आणि कट्टरतावादी घटकांना मुळीच पचणारे नव्हते. त्यांच्या सुरुवातीच्या लेखांपासूनच त्यांच्या विरोधात विरोधाची ठिणगी पडली.

‘लज्जा’ कादंबरी आणि भीषण संघर्ष
तस्लिमा नसरीन यांच्या संपूर्ण आयुष्याला आणि साहित्यिक प्रवासाला कलाटणी देणारी कलाकृती म्हणजे त्यांची १९९३ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘लज्जा’ ही कादंबरी. या एका पुस्तकाने संपूर्ण दक्षिण आशियातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे वादळ निर्माण केले.


कादंबरीची पार्श्वभूमी आणि कथानक पाहायला गेले तर ते थोडक्यात असे आहे.. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पडली. याचे पडसाद बांगलादेशात उमटले. मुस्लिम धर्मांधांनी अल्पसंख्य हिंदू समाजावर हल्ले केले. घरे जाळली, मंदिरे उद्ध्वस्त केली गेली आणि निष्पाप लोकांवर, महिलांवर अनन्वित अत्याचार झाले. अशा काळात बांगलादेशातील एका ‘दत्त’ नावाच्या हिंदू कुटुंबाची झालेली मानसिक, सामाजिक आणि शारीरिक परवड ‘लज्जा’ कादंबरीत उमटली.


कादंबरीतील मुख्य पात्र ‘सुरामॉय दत्त’ हा एक देशभक्त नागरिक. तो आपल्या मायदेशावर (बांगलादेश) जीवापाड प्रेम करतो. परिस्थिती कितीही वाईट झाली तरी “हा माझा देश आहे, मी इथेच राहीन” असा ठाम विश्वास त्याला असतो. मात्र, धार्मिक उन्मादापुढे त्याचा हा विश्वास कसा छिन्नविच्छीन होतो, हे तस्लिमा यांनी प्रत्ययकारी शब्दांत मांडले.

फतवे, रॅली आणि इनाम
‘लज्जा’ प्रसिद्ध होताच बांगलादेशात गदारोळ माजला. तस्लिमा यांच्यावर “इस्लामचा आणि बांगलादेशचा अपमान केल्याचा” आणि “देशद्रोहाचा” आरोप लावला गेला. धर्मांध संघटना रस्त्यावर उतरल्या. ढाका शहरात हजारो लोकांचे मोर्चे निघाले. ‘काउन्सिल ऑफ इस्लामिक सोल्जर्स’सारख्या धर्मांध संघटनांनी तस्लिमा यांच्या विरोधात फतवा काढला. तस्लिमा यांना मारेकऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले. त्यांच्या अटकेसाठी आणि फाशीसाठी धर्मांधांनी संपूर्ण बांगलादेश बंद पाडला. तत्कालीन सरकारने तस्लिमा यांना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्या पुस्तकावर बंदी घातली आणि त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवून खटला भरला.

निडर लढा आणि निर्भय लेखणी
अशा धोकादायक परिस्थितीत तस्लिमा नसरीन यांनी मागे हटण्यास ठाम नकार दिला. देशभर गदारोळ माजत होता, तेव्हा त्या ढाका शहरात काही महिने भूमिगत झाल्या. धर्मांध शक्ती त्यांना माफी मागण्यासाठी धमकावत होत्या. त्यांना तस्लिमा यांनी उत्तर दिले, “माफी मागणे म्हणजे सत्याचा पराभव स्वीकारणे. मी जे लिहिले ते मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले सत्य आहे. जर अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार मांडणे हा गुन्हा असेल, तर मी हा गुन्हा वारंवार करीत राहीन.”
तस्लिमा केवळ एक लेखिका नव्हे तर लढाऊ विचारवंत बनल्या. एका लेखिकेने संपूर्ण देशातील धर्मांध सत्तेला हादरवून सोडले. अखेर जागतिक मानवाधिकार संघटना, पाश्चात्य लेखक आणि विचारवंतांच्या दबावामुळे बांगलादेश सरकारने त्यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली. ऑगस्ट १९९४ मध्ये तस्लिमा यांना मायदेश सोडावा लागला.

साहित्यावरील नवे वाद
मायदेश सोडल्यानंतरही तस्लिमा यांच्या लेखणीची धार कमी झाली नाही. युरोपमध्ये आश्रय घेतल्यानंतर त्यांनी आत्मपर पुस्तके लिहिली. द्विखंडित या पुस्तकात त्यांनी बालपणापासून तारुण्यापर्यंत अनुभवांचे प्रामाणिक विश्लेषण केले. यात बंगाली समाजातील पुरुषसत्ताक मानसिकता, धर्माचा पगडा आणि विख्यात लेखकांचे दुटप्पी वर्तन यावर भाष्य आहे.
सन २००३ मध्ये पश्चिम बंगालमधील तत्कालीन डाव्या आघाडीच्या (CPM) सरकारने धार्मिक भावना दुखावण्याचे कारण देत ‘द्विखंडित’ पुस्तकावर बंदी घातली. तस्लिमा ज्या कोलकात्याला आपले घर मानत होत्या, तिथेच तथाकथित पुरोगामी सरकारने त्यांच्या पुस्तकाची गळाचेपी झाली. (नंतर उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली.)

कोलकात्यातील वास्तव्य; दुर्दैवी हद्दपारी
बांगलादेशातून हद्दपार झाल्यावर तस्लिमा यांनी युरोपमध्ये काही काळ घालवला. परंतु, बंगाली भाषा, संस्कृती, आणि तेथील मातीची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी २००४ च्या सुमारास कोलकात्याला आपले ‘दुसरे घर’ बनवले. त्या कोलकात्यात राहू लागल्या, तिथे साहित्य संमेलनांमध्ये भाग घेऊ लागल्या. परंतु, धर्मांधतेचे भूत तिथेही त्यांच्या पाठीशी लागले. नोव्हेंबर २००७ मध्ये कोलकात्याच्या रस्त्यावर तस्लिमा यांच्या विरोधात हिंसक निदर्शने झाली. गाड्या जाळल्या गेल्या. लष्कराला पाचारण करावे लागले. तत्कालीन पश्चिम बंगाल सरकारने सुरक्षेचे कारण पुढे करत तस्लिमा यांना रातोरात शहराबाहेर घालवले.
त्या आधी जयपूर आणि नंतर दिल्लीत अज्ञातस्थळी राहिल्या. एका राज्याकडून दुसऱ्या राज्यात त्यांना फुटबॉलसारखे टोलवले जात होते. परंतु, तरीही त्यांनी भारत सोडण्यास नकार दिला. भारताने त्यांना ‘दीर्घकालीन निवास परवाना’ दिला आणि त्या दिल्लीत राहू लागल्या.

धर्मांधता आणि कट्टर इस्लामला विरोध
तस्लिमा नसरीन यांची ओळख केवळ एक कादंबरीकार म्हणून नाही, तर धर्मांधतेला थेट आव्हान देणाऱ्या एक विचारवंत म्हणून आहे. तस्लिमा यांचा स्पष्ट आरोप आहे की, जगातील बहुतांश संघटित धर्म हे पुरुषांनी पुरुषांच्या फायद्यासाठी आणि स्त्रियांना गुलाम ठेवण्यासाठी बनवले आहेत. शरिया कायदा, बुरखा पद्धत, आणि तिहेरी तलाक यांसारख्या कुप्रथांविरोधात त्या सातत्याने बोलत राहिल्या. त्या कायमच समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतात. त्यांच्या मते, कोणत्याही देशात धर्माच्या आधारावर वेगळे कायदे असणे म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. तस्लिमा यांच्या मते, सर्व धर्मांचा आदर म्हणजे धर्मनिरपेक्षता नव्हे, तर राजकारण, शिक्षण आणि कायद्यापासून धर्म दूर ठेवणे म्हणजे खरी धर्मनिरपेक्षता.

लेखिका म्हणून भूमिका
तस्लिमा नसरीन यांच्या मते, लेखकाचे काम हे वाचकांचे मनोरंजन करणे किंवा सत्तेची आणि धर्मपंडितांची जीहुजूरी करणे नाही. लेखकाने समाजाच्या जखमा दाखविल्या पाहिजेत, बहुसंख्याक समाज अल्पसंख्याकांवर अत्याचार करीत असेल तर लेखकाने अल्पसंख्याकांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे आणि कोणत्याही फतव्याला, धमक्यांना किंवा सरकारी बंदीला न घाबरता लिहीत राहिले पाहिजे, अशी त्रिसूत्री त्या सांगतात.

कोलकात्यात ऐतिहासिक पुनरागमन
तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ विरहानंतर तस्लिमा नसरीन कोलकात्याच्या भूमीवर उतरल्या, तेव्हा तो क्षण ऐतिहासिक ठरला. विमानतळावर त्या आल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर घरी परतल्याचे समाधान होते. “मी कधीच स्वतःच्या मर्जीने कोलकाता सोडले नव्हते. मला इथून बळजबरीने घालवण्यात आले होते. पण माझ्या मनात या शहराबद्दलचे प्रेम कधीच कमी झाले नाही. आज इथे परतताना मला स्वतःच्या घरी आल्यासारखे वाटत आहे,” असे उद्गार त्यांनी काढले.


कोलकात्यातील ‘रवींद्र सदन’ येथे मानवी मूल्यांचा जागर करणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात त्या सहभागी होत आहेत. अनेक विचारवंत, साहित्यिक आणि नागरिक तस्लिमा यांचे सहर्ष स्वागत करीत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यामुळे हे सुखद परिवर्तन घडले आहे…

अन्य लेख

संबंधित लेख