दिव्यांगांसाठीच्या तिरंदाजीमध्ये, आज अहमदाबाद येथे झालेल्या ‘२०२६ वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज’च्या तिसऱ्या टप्प्यात भारताने दोन सुवर्णपदके जिंकली.
‘पॅरा रिकर्व्ह पुरुष दुहेरी’च्या अंतिम सामन्यात स्लोव्हाकियाचा ६-२ असा पराभव करून हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांनी ‘वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज’चे सलग तिसरे विजेतेपद पटकावले. या जोडीने यापूर्वी बँकॉक आणि नोव्हे मेस्टो येथील टप्प्यांवर अनुक्रमे चायनीज तैपेई आणि युक्रेनचा पराभव करून सुवर्णपदके जिंकली होती.
‘पॅरा महिला रिकर्व्ह दुहेरी’ प्रकारात, अंतिम सामन्यात चीनकडून ०-६ असा पराभव झाल्यामुळे पूजा जत्यान आणि भावना चौधरी यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
कम्पाऊंड विभागात, तोमर कुमार आणि श्याम सुंदर स्वामी यांनी इराकच्या अलदावूद अन्वर आणि काधिम अब्बास यांचा १५२-१३९ असा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले.
दरम्यान, ‘महिला कम्पाऊंड दुहेरी’ प्रकारात चीनविरुद्धचा कांस्यपदकाचा सामना गमावल्यामुळे पायल नाग आणि शीतल देवी यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.