Wednesday, October 21, 2026

प. पू. सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांच्या विजयादशमी उत्सव, नागपूर येथील उद्बोधनाचा सारांश

Share

॥ ॐ ॥

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

प. पू. सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांच्या विजयादशमी उत्सव, नागपूर येथील उद्बोधनाचा सारांश

(आश्विन शु. दशमी, युगाब्द ५१२८ — मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६)

स्मरण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या समारोपाच्या निमित्ताने आज आपण येथे विजयादशमी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हे वर्ष संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे वर्ष आहे. संघाच्या शाखांमध्येही संत रविदासजींचे जीवन आणि कार्य यांची माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देशातील जनतेवर परकीय आक्रमकांकडून अत्याचार होत असताना संत रविदासजींनी आपल्या परिश्रमांतून, तपश्चर्येतून, त्यागातून आणि प्रत्यक्ष जीवनाच्या आदर्शातून समाजात भक्ती, स्वधर्मनिष्ठा आणि सामाजिक समरसतेची भावना जागृत केली. त्यांनी दिलेला उपदेश आणि आपल्या जीवनातून घालून दिलेला आदर्श आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. स्वधर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या दोन महापुरुषांचे स्मरण करण्याचेही हे वर्ष आहे. आर्य समाजाचे तपस्वी संन्यासी, प्रखर धर्माभिमानी, विद्वान शिक्षणतज्ज्ञ, वीर स्वातंत्र्यसैनिक आणि शुद्धी आंदोलनाचे जनक स्वामी श्रद्धानंदजी यांच्या बलिदानाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ओडिशाच्या वनक्षेत्रात प्रत्यक्ष राहून तेथील समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या आणि त्याच कार्यासाठी आपले बलिदान देणाऱ्या स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती महाराज यांचेही हे जन्मशताब्दी वर्ष आहे.ज्या ‘स्व’च्या रक्षणासाठी या महापुरुषांनी बलिदान दिले, त्याच स्वबोधाची जाणीव समाजात जागृत करण्यासाठी, स्वदेशी मेळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ्या ‘हिंदू मेळ्या’चे प्रेरक आणि प्रवर्तक, बंगभूमीतील स्वर्गीय राजनारायण बसू यांचेही हे द्विशताब्दी जयंती वर्ष आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यही गेल्या १०० वर्षांपासून भारताला याच स्वबोधाच्या, अस्मितेच्या आणि सांस्कृतिक जीवनमूल्यांच्या आधारावर संघटित व सामर्थ्यसंपन्न करण्यासाठी सुरू आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या ज्या पाच उपक्रमांची सुरुवात प्रथम स्वयंसेवकांमध्ये करण्यात आली, त्यांचा समाजात विस्तार करण्याचे कार्य स्वयंसेवक पुढे करणार आहेत. यांपैकी स्वबोध जागृत करणे आणि स्वदेशीचा आचरणात स्वीकार करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

आपल्या ‘स्व’बोधाचा पाया

आपल्या देशाच्या संविधानातील उद्देशिकेमध्ये आपण स्वतःला ‘आम्ही भारताचे लोक’ असे संबोधले आहे. विविधता असूनही भावनिकदृष्ट्या एकात्म असलेल्या समाजाचे हे प्रतीक आहे. हे भावनिक बंध अधिकाधिक दृढ कसे करावेत, याचे मार्गदर्शनही संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमधून स्पष्टपणे मिळते. या भावनिक एकात्मतेची प्रत्यक्ष अनुभूती ज्या तत्त्वामुळे प्राप्त होते, ते तत्त्व आणि त्याचे स्पष्टीकरण करणारे जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आपल्याकडे असतानाही आपले आचरण त्यापासून पूर्णपणे वेगळे आणि हीन झाले. परिणामी, विश्वगुरूच्या स्थानावरून आपली घसरण होत गेली आणि अनेक शतके आपल्याला पारतंत्र्य भोगावे लागले.अनेक महान प्रयत्नांमधून आणि असंख्य बलिदानांमधून त्या दुर्दैवी परिस्थितीतून मुक्त झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा एकात्मता आणि प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू लागलो आहोत. त्यामुळे आपल्याला आपल्या विस्मृतीत गेलेल्या या तत्त्वाचे स्पष्ट आकलन करून घ्यावे लागेल, ते मनापासून स्वीकारावे लागेल आणि जीवनाच्या सर्व अंगांमध्ये त्यानुसार आवश्यक गुणांचा विकास करावा लागेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जितकी तपश्चर्या आणि समर्पण करावे लागले, त्यापेक्षाही अधिक प्रयत्नांची आवश्यकता आता आहे, हे आजच्या परिस्थितीवरून आपल्या लक्षात येते.

भारतासारख्या मत, पंथ, संप्रदाय, प्रांत, जात, भाषा, खानपान आणि रीतीरिवाज यांच्या विविधतेने समृद्ध असलेल्या देशात या सर्व विविधतांचा स्वीकार करणारा, त्यांचा सन्मान करणारा आणि सर्वांकडे आपलेपणाने पाहणारा विचारच आपल्या एकात्मतेचा आधार बनू शकतो. सुदैवाने, भारतात अनादिकालापासून चालत आलेली सनातन परंपरा आपल्याला याच सत्याची जाणीव करून देते. अनेक आध्यात्मिक महापुरुषांच्या प्रत्यक्ष अनुभूतींमधून हे तत्त्व सातत्याने स्पष्ट आणि दृढ होत आले आहे. सृष्टीतील विविधता जितकी स्वाभाविक आणि परिवर्तनशील आहे, तितकीच संपूर्ण अस्तित्वातील एकात्मता ही शाश्वत,दृढ आणि अढळ सत्य आहे, असे ही परंपरा सांगते. मनुष्य आपल्या विचारशक्तीच्या आधारे स्वतःपासून संपूर्ण सृष्टीपर्यंत असलेले एकत्व अनुभवू शकतो. असे केल्यानेच शाश्वत आणि नित्य सुखाच्या शोधातील प्रत्येक जीवाची यात्रा सफल व पूर्ण होते.

संघाच्या “हिन्दू जगे तो विश्व जगेगा…” या गीतातील पंक्ती व्यापक अर्थ स्पष्ट करणा-या आहेत. ..

“इसी सत्य को विविध पक्ष से

वेदों में हमने गाया था,

निकट बिठाकर इसी तत्व को

उपनिषदों में समझाया था ।

मंदिर – मठ – गुरुद्वारे जाकर

यही ज्ञान सत्संग मिलेगा,”

सर्व विविधतांचा सन्मान करणे, त्यांचा स्वीकार करून त्यांचे जतन करणे आणि त्याच वेळी परिवर्तनशील किंवा कालबाह्य झालेल्या गोष्टी बदलत राहण्याची लवचीकता बाळगणे, हा भारताचा स्वभाव आहे. हा स्वभाव सनातन दृष्टिकोनातून निर्माण झाला आहे. जेव्हा जेव्हा भारतातील जनमानसात ही भावना सर्वोच्च स्थानी राहिली, तेव्हा तेव्हा भारत सर्व दृष्टींनी जगासाठी आदर्श राष्ट्र ठरला. मात्र, जेव्हा आत्मविस्मृती, विघटन आणि परस्परांतील संपर्क तुटल्यामुळे आपण दुर्बल, संकुचित, अहंकारी किंवा भयग्रस्त झालो आणि हे आचरण सोडून दिले, तेव्हा आपली अधोगती झाली. त्यामुळे आपल्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा हा आधार पुन्हा स्मरणात आणून आपण संघटित झाले पाहिजे आणि परस्परांच्या हितासाठी कटिबद्ध झाले पाहिजे.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शाखांचा विस्तार आणि स्वयंसेवकांचा समाजातील संपर्क वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याचबरोबर देशात आणि जगभरात भारत, हिंदुत्व आणि संघ यांच्याविषयी व्यापक प्रबोधन करण्याची योजनाही कार्यान्वित करण्यात आली.

आतापर्यंत प्राप्त झालेला कार्यक्रमांचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे.

संपर्क अभियान : ४,६१,५२७ गावांमध्ये आणि ४१,०७६ नागरी वस्त्यांमध्ये मिळून १०,१९,८८,५११ घरांपर्यंत संपर्क साधण्यात आला.

प्रबुद्ध नागरिकांच्या बैठका : १,११७ जिल्ह्यांमध्ये आयोजित गोष्टींना महिला व पुरुष मिळून ४,२६,४९७ नागरिक उपस्थित होते.

सद्भावना बैठका : ५,०३६ खंडांमध्ये बैठका संपन्न झाल्या.

हिंदू संमेलने : ३४,१८७ मंडलांमध्ये हिंदू संमेलने आयोजित करण्यात आली.

युवा संमेलने : या संमेलनांना ३९,२५,२२५ युवक उपस्थित होते.

भारत, हिंदुत्व आणि संघ यांच्याविषयी त्या देशांतील समाजाला योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने संघाच्या काही कार्यकर्त्यांचे प्रवास पाश्चात्त्य देशांमध्येही झाले. या प्रवासांदरम्यान आपली सनातन, भारतीय संस्कृतीतील सर्वसद्भाव आणि हिंदू समाजाची सर्वसमावेशकता तसेच संघाचे उद्दिष्ट आणि कार्य यांची योग्य व सत्य माहिती तेथील समाजासमोर मांडण्यात आली. आज जगभरात भारताविषयी कुतूहल निर्माण होत आहे. जडवाद, व्यक्तिकेंद्रित विचार आणि अनिर्बंध उपभोगावर आधारित अपुऱ्या जीवनदृष्टीमुळे भौतिक संपन्नता असूनही हे देश चिंताग्रस्त आहेत.विविधतेचे व्यवस्थापन कसे करावे, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल कसा साधावा, आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांशी आपलेपणाने कसे वागावे, कौटुंबिक जीवनातील आणि नव्या पिढीतील संस्कारांचा ऱ्हास कसा रोखावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. यामुळेच आज जगाला भू-राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता, पर्यावरणीय संकटे आणि वर्चस्वाच्या संघर्षातून उद्भवणारा विनाश यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांवरील उपाय भारताकडे आहेत, याची जाणीव जगाला होत आहे. त्यामुळे तेथील समाजात आपल्या कार्यकर्त्यांचे विचार लक्षपूर्वक ऐकले जात असून त्यावर चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. देशात आणि जगभरात शताब्दी वर्षानिमित्त सुरू झालेला सर्व प्रकारचा संवाद पुढेही सातत्याने सुरू राहावा, यासाठी स्वयंसेवक नियोजन करीत आहेत.

पंचपरिवर्तनातील पाचही उपक्रमांना,  सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध व स्वदेशी आणि नागरिक कर्तव्यपालन यांचे समाजातील सर्व वर्गांत आणि स्तरांतून स्वागत झाले आहे. जगातील इतर देशांमध्येही या उपक्रमांची आवश्यकता जाणवली आहे. हे केवळ एका वर्षापुरते मर्यादित असलेले कार्यक्रम नाहीत, तर जीवनात परिवर्तन घडवून आणणारी आचरणपद्धती आहे. प्रत्यक्ष कृतीतून सवयी निर्माण होतात आणि सवयींतून स्वभाव घडतो. त्यामुळे जीवनाच्या सर्व अंगांमध्ये हे कार्य सातत्याने सुरू ठेवले, तरच अपेक्षित परिवर्तन घडेल. आपल्या समाजात संस्कारांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाच्या धारण-पोषणाला अनुकूल अशा धार्मिक जीवनपद्धतीतील सवयी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवल्या जात आल्या आहेत.

विवेकाधिष्ठित आचरणाची आवश्यकता

आजच्या काळात कुटुंबातील ज्येष्ठांकडून, शालेय अभ्यासक्रमातून किंवा समाजातील वातावरणातून मिळणाऱ्या संस्कारांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे समाजमाध्यमांद्वारे सर्व प्रकारची माहिती आणि बातम्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. अनेक देशांमध्ये नव्या पिढीतील मुले आणि युवक या माध्यमांतून मिळणारी माहिती योग्य-अयोग्यतेचा विवेक न करता स्वीकारतात. त्याचे दुष्परिणाम अनुभवल्यानंतर काही देशांनी या माध्यमांवर विशिष्ट नियम आणि निर्बंध लागू केले आहेत. आपल्या देशातही, विशेषतः ओटीटी (OTT) मंचांच्या संदर्भात, अशा उपाययोजनांची आवश्यकता समाजातून व्यक्त होत आहे. शासन आणि प्रशासनाने याचा विचार करायला हवा. माहिती सहज आणि मुक्तपणे उपलब्ध होत असली, तरी नव्या पिढीला योग्य-अयोग्य ओळखण्याची आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्याची दृष्टी द्यावी लागेल. या विवेकाच्या अभावामुळे व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक दुष्परिणाम दिसून येतात. विवेकाच्या अभावामुळेच जगभरातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जात आहे. व्यसन ही एक गंभीर राष्ट्रीय समस्या आहे. तिचे निवारण करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने वेळीच प्रयत्न सुरू केले पाहिजेत. समाजातील आजच्या पालक पिढीने नव्या पिढीला विवेकपूर्ण विचारांची आणि योग्य-अयोग्य ओळखण्याची दृष्टी द्यावी लागेल. त्याचबरोबर नव्या पिढीने स्वतःला व्यसनाधीन बनवू शकणाऱ्या सर्व प्रवृत्तींपासून दूर ठेवले पाहिजे. या दृष्टीने, देशातील या समस्येचे निराकरण करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्वांना सोबत घेऊन, देशभरात व्यसनांविरुद्ध व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक अभियान उभे करण्यासाठी स्वयंसेवक प्रयत्न करतील.

आगामी काळात परमवैभवसंपन्न, विश्वगुरू भारताच्या निर्मितीची मोठी जबाबदारी नव्या पिढीच्या खांद्यावर येणार आहे. हे आव्हान स्वीकारून त्याला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आपल्या युवकांनी सर्व दृष्टींनी सज्ज झाले पाहिजे.

संतुलित आणि समग्र विकासाची दृष्टी

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मनुष्याला भौतिकदृष्ट्या सुखी जीवन जगण्यास मदत होते. ज्ञान आणि तर्काच्या आधारे आपल्या दैनंदिन व्यवहारातील त्रुटी दूर करण्याची संधीही मिळते. त्यामुळे नवे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे स्वागत करून त्यांचा स्वीकार केला पाहिजे. मात्र, तंत्रज्ञान हे केवळ एक साधन आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे. केवळ उपभोगवादी किंवा जडवादी दृष्टिकोनातून विकास साधण्याचा प्रयत्न केला, तर सुखसोयी मिळत असल्या तरी त्याची मोठी किंमतही मोजावी लागू शकते. अलीकडे नेपाळमध्ये आलेल्या भीषण आपत्तीमध्ये हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. भारत, तिबेट, भूतान आणि चीन अशा अनेक देशांच्या प्रदेशांतून विस्तारलेल्या संपूर्ण हिमालयीन क्षेत्रात झालेल्या एकांगी विकासाचे परिणाम या आपत्तीच्या मुळाशी काही प्रमाणात असू शकतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी आपल्या सर्वांनाच दुःख देणारी आहे. आपत्तीनंतर पीडितांना मदत पोहोचविण्यासारख्या कार्यांत आपण सहभागी होतोच,  परंतु त्याचबरोबर विकासाकडे पाहण्याची समग्र आणि संतुलित दृष्टी निर्माण होणेही आवश्यक आहे. साधनांचा योग्य दिशेने उपयोग मनुष्य करतो  आणि त्यांचा वापर उचित आहे की अनुचित, हे ही मनुष्यच ठरवितो . त्यामुळे ज्ञान आणि तंत्रज्ञानासोबत त्यांचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक विवेक, तसेच त्यांच्या वापरासंबंधीचे नैतिक आणि व्यावहारिक अनुशासनही शिकले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे.  अन्यथा, अणूंच्या रचनेविषयीच्या ज्ञानातून स्वच्छ ऊर्जेऐवजी जीवसंहारक शस्त्रे निर्माण होतील. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञानाचाही उपयोग माणसाला संभ्रमित करण्यासाठी, फसविण्यासाठी आणि असत्याचा प्रसार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

भारताची सनातन जीवनदृष्टी ही तिच्या समग्रतेतून आणि एकात्मतेच्या भावनेतून विकसित झाली आहे. त्यामुळे समन्वय आणि संयमाचे संस्कार करणारी संस्कृती संपूर्ण विश्वात विकसित व्हावी, अशी या जीवनदृष्टीची अपेक्षा आहे. आपल्या पूर्वजांनी या संस्कृतीला ‘सा प्रथमा संस्कृतिर्विश्ववारा’ असे संबोधले आहे. या जीवनदृष्टीच्या आधारावर समग्र आणि एकात्म विकासाचा नवा आदर्श भारताने जगासमोर उभा केला पाहिजे.

हिंदुभाव आणि हिंदू स्वभाव — एकतेचा आधार

आपल्या राष्ट्राची चेतना हीच सनातन जीवनदृष्टी आहे. आज भारतातील आपण सर्वजण आणि संपूर्ण विश्वही या जीवनदृष्टीला ‘हिंदू दृष्टी’ या नावाने ओळखते. विशिष्ट उपासना पद्धती, खानपान, राहणीमान, सामाजिक अथवा राजकीय विचारधारा, तसेच विशिष्ट जात, भाषा किंवा प्रदेश यांपैकी कोणत्याही गोष्टीचे बंधन या जीवनदृष्टीला नाही. या सर्वांच्या पलीकडे असलेली आध्यात्मिकता, मानवता आणि विश्वबंधुत्व ही तिची प्रमुख लक्षणे आहेत. भारतीयांच्या मनात हा भाव असल्यामुळेच ‘भा’ म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशात रममाण असलेला भारत, ही भारतीयत्वाची एक अर्थपूर्ण व्याख्या रूढ झाली आहे.  संपूर्ण विश्वाला जोडण्याची क्षमता आणि सर्वांना जोडून घेण्याची स्वाभाविक प्रेरणा असलेल्या हिंदुभावाचे स्मरण, जागरण आणि संवर्धन हे भारताच्या प्रगतीसाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यावश्यक आहे. भारतातील या भावाचे प्रकटीकरण म्हणजे भारताविषयीची उत्कट भक्ती, सर्व भारतीयांमध्ये समान पूर्वजपरंपरेविषयी असलेला अभिमान व आदर्शांविषयीची निष्ठा आणि भारताच्या सनातन संस्कृतीतील मूल्यबोधानुसार स्वतःचे जीवन घडवत राहणे होय. प्राचीन काळापासून भारतभूमीवर निवास करणारा जनसमूह याच जीवनदृष्टीला अनुसरून एक समाज म्हणून जीवन जगत आला आहे.

भारतवासीयांचे एकत्व — स्वाभाविक आणि निरपेक्ष

आपला परस्परांशी आणि भारताशी असलेला संबंध हा जिवंत नात्याचा आहे. तो हृदयाचा संबंध असल्यामुळे त्याला कोणत्याही अटींचे बंधन नाही. ‘तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहें न रहें’ हा भाव या नात्याचे स्वरूप व्यक्त करतो. आपलेपणा, आत्मीयता आणि नातेसंबंध यांमध्ये अटी नसतात, या नात्यांवरील निष्ठा मात्र दृढ असावी लागते. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचेही राष्ट्राप्रती असेच संपूर्ण आणि बिनशर्त समर्पण होते. त्यांच्या त्यागपूर्ण संघर्षामुळेच ब्रिटिश सरकारला भारत सोडण्यास भाग पडले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच हिंदुभावाला जागृत करून संपूर्ण समाजाला सुसंघटित आणि सामर्थ्यसंपन्न बनविण्यासाठी कार्यरत आहे. व्यक्तिजीवनापासून विश्वजीवनापर्यंतची धारणा, प्रतिष्ठा आणि सुरक्षा ही सामर्थ्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे संघटित आणि सामर्थ्यसंपन्न हिंदू समाजाचा विचार करणे किंवा त्यासाठी कार्य करणे, हे सर्व पंथांविषयी आदरभाव अथवा राष्ट्राच्या भावनिक एकात्मतेच्या विरोधात नाही. हिंदू समाजाची विचारदृष्टी आणि स्वभाव समावेशक असल्यामुळे असे कार्य आपल्या सर्वांमधील भावनिक एकात्मता, सद्भावना आणि सदाचार यांचे पोषण करणारेच ठरेल, हे समजून घेतले पाहिजे. पिढ्यान्‌पिढ्या मिळत आलेला हाच स्वभाव आणि संस्कार कॅप्टन स्मित मच्छार यांना स्वतःच्या प्राणांची बाजी लावून इतरांच्या संरक्षणासाठी स्वतःला झोकून देण्याची प्रेरणा देतो.

सद्भावनापूर्ण व्यवहार आवश्यक

ही केवळ विचारांची किंवा वाणीची बाब नाही. आपल्या सर्वांच्या आचरणातून हा भाव प्रकट झाला पाहिजे.आपला भारत विशाल आहे. निसर्ग आणि पर्यावरणाच्या विविध रूपांनी तो नटलेला आहे. विविध पंथ, प्रदेश, भाषा, जाती, खानपानाच्या पद्धती आणि रीतीरिवाज मानणाऱ्या समूहांनी बनलेला हा बहुरंगी समाज आहे,  तरीही तो एक समाज आहे. परस्परांशी व्यवहार करताना, आपल्या मनात, वाणीत आणि कृतीत सद्भावना व आपलेपणा असला पाहिजे आणि तो दिसलाही पाहिजे. गतकाळातील इतिहासामुळे आपल्या मनात एकमेकांविषयी निर्माण झालेल्या शंका-कुशंका आपल्याला परस्परांपासून दूर ठेवतात. इतिहासातील तथ्ये स्वीकारूनही परस्परांमधील मनोमीलन साधता आले पाहिजे. जुन्या गाठी सुटाव्यात, नव्या गाठी निर्माण होऊ नयेत, असा आपला व्यवहार असला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून आपल्याला चिथावणी देऊन संघर्ष निर्माण करणाऱ्या लोकांपासून आपण दूर राहिले पाहिजे. एवढ्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या समाजात असे वातावरण निर्माण होण्यासाठी वेळ लागणार आहे. परंतु देशाच्या आणि विश्वाच्या कल्याणाची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्वांनी धैर्याने स्वतःला आणि समाजाला सावरत सातत्याने कार्यरत राहिले पाहिजे.समाजातील सर्वसामान्य व्यक्तींपासून शासन-प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांशी व्यवहार करताना, विशेषतः एखादी विशिष्ट मोहीम किंवा धोरण समाजात राबविले जात असताना, आपले वर्तन सभ्य, आत्मीयतापूर्ण आणि नागरिकांच्या सन्मानाची जाणीव ठेवणारे असले पाहिजे. याचे भान आपण नेहमी राखले पाहिजे.

इकडे-तिकडे घडणाऱ्या काही अवांछित अथवा अनपेक्षित घटनांचा आधार घेऊन संघाच्या सद्भावनेवर किंवा हेतूंच्या प्रामाणिकतेवर संशय निर्माण करण्याचे प्रयत्नही होत असतात. या घटनांशी संघाचा संबंध नसतो आणि संघाचे त्यांना समर्थनही नसते. संघकार्याचा आधार शुद्ध, सात्त्विक प्रेम हा आहे. स्वयंसेवकांचे समर्पण, सेवा आणि परिश्रम यांच्या बळावर संघाचे कार्य चालते. संघाला स्वतःसाठी काहीही नको आहे. एका सत्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून, त्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी स्वयंसेवक ध्येयपूर्ती होईपर्यंत कार्यरत राहतील.

आपण सर्वांनी या गोष्टी नीट समजून घेतल्या आहेत, तरीही त्यांची पुनरावृत्ती करण्याचे कारण असे की, आज समजूतदार माणसेही विचलित होतील, असे वातावरण निर्माण झाले आहे किंवा केले जात आहे. भारतासह संपूर्ण विश्वातील सभ्यता, मांगल्य, सांस्कृतिक मूल्ये आणि मानवी संस्कार नष्ट-भ्रष्ट करून टाकण्याचा आसुरी संकल्प घेऊन पश्चिमेकडून एक वादळ घोंघावत आले आहे. जगातील तथाकथित प्रगत देशही त्याच्या प्रभावामुळे त्रस्त आणि असहाय झाले आहेत. मात्र, गेल्या काही दशकांत भारताने स्वतःचे सामर्थ्य आणि सुनीती यांच्या बळावर जागतिक स्तरावर हळूहळू आपले स्थान निर्माण केले आहे. भारतीय समाजाचा पुरुषार्थ, सुदृढ धोरणे, नेतृत्व, देशाभिमान आणि विश्वाप्रती असलेल्या आपल्या दायित्वाची जागृती यांमुळे भारत विविध क्षेत्रांत यशस्वी होत आहे. भारताच्या या प्रगतीमुळे जगातील विविध राष्ट्रांमध्ये अराजकता निर्माण करून, स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी सहाय्यभूत ठरू शकणाऱ्या आपल्या हस्तकांना तेथे सत्तास्थानी बसविण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या शक्तींचे डावपेच निष्फळ ठरतील .ही वस्तुस्थिती या शक्तींनाही ठाऊक आहे. त्यामुळे भारत हाच त्यांच्यासाठी निर्णायक आणि सर्वाधिक सामर्थ्यवान प्रतिस्पर्धी, तसेच अंतिम व सर्वाधिक महत्त्वाचे लक्ष्य आहे. भारत, हिंदू समाज आणि संघ यांना कशा प्रकारे विभाजित किंवा विस्कळीत करता येईल, याचा विचार करून योजना आखत या शक्ती कार्य करतात. त्यांच्या प्रवृत्तीशी साम्य असलेले काही लोक त्यांना मदत करण्यासाठी पुढे येतात. क्षुद्र सत्तास्वार्थ आणि विवेकहीनतेपोटी काही महत्त्वाकांक्षी नेतेही त्यात सहभागी होतात. आपला समाज एवढा विशाल असल्यामुळे त्यात समस्या असणे स्वाभाविक आहे. व्यवस्थेमध्येही अनेक त्रुटी असू शकतात. त्यातून आंदोलने उभी राहणेही स्वाभाविक आहे. मात्र, आंदोलनांचा उद्देश समस्यांवर उपाय शोधणे हा असला पाहिजे. आंदोलन करणारा समाजातील कोणताही समूह असो, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यवाही करणारे शासन-प्रशासन असो किंवा राजकीय नेते असोत, आपल्या अखंड समाजात आपल्या कृतींमुळे परस्परांमध्ये विसंवाद, द्वेष, कटुता, असंतोष किंवा विभाजन निर्माण होता कामा नये. भावना तीव्र झाल्या तरी आपल्या कृती संविधान आणि कायद्याच्या मर्यादेत राहिल्या पाहिजेत. आपले बोलणे, वागणे आणि व्यवहार यांमध्ये सभ्यतेची मर्यादा राखली गेली पाहिजे. याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे. मतांचा लाभ, स्वस्त लोकप्रियता किंवा राजकीय फायदा मिळविण्याचा मोह आपल्या विवेकावर आणि सद्भावनेवर वरचढ होणार नाही, याची काळजी आपण घेतलीच पाहिजे.

समाजाच्या पुढाकारातून समस्यांचे निराकरण

समाजातील सर्व समस्यांचे निराकरण शासनच करू शकते किंवा केवळ आंदोलनांमधूनच समस्यांवर उपाय निघू शकतात, असेही नाही. समाजाच्या सक्रिय सहभागातून आणि परस्पर संवादातूनही समस्यांचे निराकरण होऊ शकते.

संघाचे स्वयंसेवक समाजात अशा प्रकारचा सामूहिक पुढाकार उभा करण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण शाळांचा विचार करता, स्वयंसेवकांच्या या प्रयत्नांचे अनुभव उत्साहवर्धक आहेत. २१ प्रांतांतील २१० जिल्ह्यांमधील सुमारे १,२९६ शाळांमध्ये असे दिसून आले की, ज्या ठिकाणी ग्रामस्थांचा सहभाग आणि स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले, तेथे विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्ययनाची पातळी आणि पालकांचा सहभाग यांत सुधारणा झाली. शिक्षणासाठी मदत, पायाभूत सुविधांची उपलब्धता यांसोबतच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि मूल्याधिष्ठित गतिविधींमध्येही समाजाने योगदान दिले. ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांच्या आधारे गावांचा समग्र विकास साधण्याचे कार्य हजारो गावांमध्ये सुरू आहे. देशभरात स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध सेवा उपक्रमांमागेही, आपल्या देशबांधवांमध्ये स्वाभिमान, स्वावलंबन आणि राष्ट्रजीवनातील सहकार्य व सहभागाची भावना अधिक दृढ व्हावी; तसेच ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक सामर्थ्य आणि क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी हाच प्रयत्न असतो.

सजगतेची आवश्यकता

या सर्व प्रयत्नांमागे एक महत्त्वाची प्रेरणा आहे ती आहे,  समाज आणि देश चालविण्याची जबाबदारी आपलीही आहे, कारण हा देश आणि हा समाज आपला आहे. आंदोलनांमागेही हाच आपलेपणाचा भाव असला पाहिजे. मात्र, जेव्हा असे होत नाही आणि आंदोलन हे राजकारणाचे साधन बनते, एखाद्या व्यक्तीविषयी, समूहाविषयी किंवा विचाराविषयी विरोधाची आणि शत्रुत्वाची भावना बाळगून ते चालविले जाते, तेव्हा भारताला दुबळे करू इच्छिणाऱ्या शक्ती त्याचा लाभ घेतात. परस्परांतील मतभेद अधिक तीव्र करून मनभेद निर्माण करणे, समस्यांच्या संदर्भात अन्यायग्रस्त असल्याची भावना सतत बळकट करणे आणि देशातील व्यवस्थांविषयी अविश्वास निर्माण करणे, ही अशा शक्तींची कार्यपद्धती असते. त्यातून कलह, तीव्र असंतोष, फूट पाडणे, अव्यवस्था आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. भारताला दुबळे ठेवू इच्छिणाऱ्या जागतिक शक्तीही कधीकधी अशा परिस्थितीचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. या संदर्भात श्रीमती आशा भोसले यांनी गायलेल्या आणि श्री. पी. सावळाराम यांनी रचलेल्या एका जुन्या मराठी गीताच्या शेवटच्या ओळी आठवतात—

वाढवीत भेदभावा ,दुष्टतेचा फिरतो कावा ।

गाठूनिया भोळ्या जीवा , अंधारात घालिल घावा ।।

म्हणूनच—

चित्त नित्य सावध ठेवा एक लक्ष्यि लावून डोळे

स्पष्ट आहे की, अशा भेद निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींमुळे होणाऱ्या वैचारिक संभ्रमाला बळी न पडता परस्परांतील सद्भावनेचे रक्षण केले पाहिजे. सावध राहून, कोणत्याही प्रकारे भावनांच्या आहारी किंवा उत्तेजनेच्या प्रभावाखाली न जाता, भारताला विश्वगुरुपदावर विराजमान पाहण्याची आपली आकांक्षा आणि ध्येय सतत डोळ्यांसमोर ठेवून आपण कार्यरत राहिले पाहिजे. आत्मीयता, शिस्त आणि राष्ट्रीय ध्येयाप्रती निष्ठा यांवर दृढपणे उभा असलेला समाजच एकात्मता आणि अपराजेय सामर्थ्य प्राप्त करतो, अशी संघाची धारणा आहे. प्राचीन काळापासून आपल्या समाजाने अस्तित्वाच्या एकात्मतेचे सत्य अनुभवले आहे. या एकात्मतेची अनुभूती वेळोवेळी संपूर्ण विश्वाला देण्यासाठी, सर्वांचा स्वीकार, सन्मान आणि प्रतिष्ठा जपणारे विविधतेने नटलेले, तरीही अंतःसूत्राने एकरूप असलेले जीवन आपला समाज जगत आला आहे.

एकतेच्या सूत्रांशी दृढ राहूया

आपल्या समाजाचे हे जीवनध्येय आपण लक्षात ठेवले, तेव्हा आपण विजय मिळवला आहे. लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करून हिंदू आणि मुसलमानांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक भूमी आणि एक समाज यांची सांप्रदायिक आधारावर विभागणी करण्याच्या या प्रयत्नाला समाजाने ठाम विरोध केला. अखेर ब्रिटिश सत्तेला फाळणीचा प्रस्ताव मागे घ्यावा लागला. त्या काळात याच राष्ट्रीय एकात्मतेचे आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून ‘वन्दे मातरम्’चा उदय झाला. फाळणीचा डाव पराभूत झाला. मात्र, १९४७ मध्ये असे का घडू शकले नाही? आपण वेगळे आहोत, आपली रूपे वेगळी दिसतात, म्हणून आपण वेगळेच आहोत, असा विचार आपल्या मनात रुजविण्यात आला. आपल्याला एकमेकांपासून वेगळे करून परस्परांमध्ये संघर्ष घडवू इच्छिणाऱ्यांनी हा विचार दृढ केला. सांप्रदायिक कट्टरपंथी विचारसरणीच्या प्रभावाखाली आपणही वेगळे दिसतो, म्हणून प्रत्यक्षातही एक नाही, तर वेगळेच आहोत, अशी धारणा स्वीकारली. विद्रोह, राजकीय वर्चस्वाची लालसा आणि स्वार्थपूर्तीचा हव्यास यांच्या एकत्रित प्रभावामुळे आपल्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या आधारांनाच आपण क्रमशः नाकारत गेलो. तुष्टीकरणाच्या मानसिकतेमुळे आपल्याला विभाजित करणाऱ्या या प्रवृत्तीला अधिक बळ मिळत गेले. परिणामी, देशाची फाळणी झाली. परंतु, फाळणीमुळे शांतता आणि स्वतंत्र अस्तित्वाचे सुख मिळेल, अशी जी आशा दाखविण्यात आली होती, ती पूर्ण झाली नाही. उलट, सीमांवर आणि देशांतर्गत कायमची अशांतता, परस्परांविषयी अविश्वास, असुरक्षितता आणि क्षुल्लक कारणांवरून उद्भवणारे संघर्ष यांना आपल्याला सामोरे जावे लागले.

बंगालच्या फाळणीचा विभाजनकारी डाव पराभूत करणारे ‘वन्दे मातरम्’ आजही राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देण्यास समर्थ आहे. ते आपले राष्ट्रगीत आहे. ते स्वाभिमानाने, बुलंद स्वरात आणि संपूर्ण म्हणण्याबाबत कोणताही संकोच किंवा विरोध असता कामा नये.

भारतभूमीविषयीची मातृभूमी म्हणून असलेली भक्ती, आपल्या समान भारतीय पूर्वजांच्या जीवनकार्याचा गौरव आणि त्यांच्या आदर्शांचे अनुकरण, तसेच सनातन भारतीय संस्कृतीतील वैश्विक मानवी मूल्यांनुसार आपले जीवन घडविणे, या गोष्टी आपल्याला नेहमीच एकत्र बांधून ठेवत आल्या आहेत. सर्व पंथ, प्रांत, भाषा, जाती इत्यादींमधील विविधतांशी विरोध नसलेली आणि या सर्व भेदांच्या पलीकडे असलेली ही सर्वांना जोडणारी समान सूत्रे आहेत. त्यांचे सातत्याने चिंतन, अध्ययन आणि आचरण केल्याने ही  सूत्रे अधिक चांगल्या प्रकारे समजतील आणि मनापासून स्वीकारली जातील. त्यामुळे आपली एकता दृढ होण्याबरोबरच प्रत्येकाचे वैशिष्ट्यही अधिक पुष्ट होईल.

आपल्या लहान लहान अस्मितांना धोका निर्माण होईल, या आशंकेने किंवा त्यांच्या अहंकारात अडकून, आपल्या एकतेचे आधार असलेल्या या गोष्टींचा त्याग करून पुन्हा पुन्हा त्याच चुका करण्याचे आणि ठेचा खाण्याचे पाप आपण करता कामा नये. आपापले क्षुद्र अहंकार, स्वतःच्या तसेच इतरांच्या उपासना पद्धतींविषयी मनात असलेले गैरसमज आणि विविधतेला विभेद समजण्याची प्रवृत्ती आपण सोडलीच पाहिजे. भारतभक्ती, पूर्वजांचा गौरव आणि भारतीय संस्कृती या आपल्याला जोडणाऱ्या त्रिसूत्रीचा मनापासून स्वीकार करून देशासाठी जगण्याच्या मार्गावर आपल्याला पुढे जायचे आहे.

भारताचे वैश्विक दायित्व आणि आपली कर्तव्ये

आज संपूर्ण जग ज्या समस्यांमुळे त्रस्त आणि भयभीत झाले आहे, त्यांच्या मुळाशी जीवनदृष्टीचा अपुरेपणा आहे. अन्यथा, पुरुषार्थाच्या बाबतीत आपणही उर्वरित जगाकडून बरेच काही शिकू शकतो. जगातील चांगल्या गोष्टी शिकतानाच आपल्या राष्ट्रीयत्वाचे स्पष्ट स्वरूप समजून घेऊन ते स्वीकारणे, आपली एकता आणि गुणवत्ता जपणे आणि संघटित पुरुषार्थासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. धर्मतत्त्वाच्या आधारावर विकासाचा मार्ग सर्वांगपरिपूर्ण करून जगाला सुख आणि शांतीचा नवा मार्ग दाखविणारा भारत उभा करायचा आहे. आपल्या राष्ट्रीय मूल्यांच्या आधारावर संपूर्ण विश्वाला विकासाचा नवा मार्ग आपल्या कृतीतून दाखवायचा आहे. आपण जीवनात जे काही करू, ते गुणवत्तेच्या दृष्टीने उत्कृष्ट असले पाहिजे. समाज आणि देशाची सुरक्षा, एकात्मता, सामाजिक न्याय, प्रगती आणि प्रतिष्ठा यांना पूरक असेच आपले कार्य असले पाहिजे, याविषयी आपण सदैव सजग राहिले पाहिजे. भारताचे परमवैभव आणि विश्वगुरुपद हे आपल्यापैकी प्रत्येकाच्या पुरुषार्थातून साकार होणार आहे. यासाठी दुसरा कोणताही पर्याय किंवा शॉर्टकट उपलब्ध नाही. आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात दररोज छोट्या-छोट्या सत्कृतींच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणत सामान्य व्यक्तीदेखील आपले कर्तव्य पार पाडू शकते. पंचपरिवर्तनाचे उपक्रम आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध गतिविधी याच कार्यपद्धतीनुसार व्यक्तीला देशसेवा आणि देशभक्तीच्या मार्गावर टप्प्याटप्प्याने पुढे नेतात.

संघकार्याच्या शताब्दी वर्षातील कार्यक्रम आणि उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर, समाजात संघटित पुरुषार्थाच्या बळावर विजयशाली सामर्थ्य उभे करण्याच्या दिशेने संघ पुढे वाटचाल करेल.

“साध्य करना है हमें केशव प्रदर्शित ध्येय सपना।

बस उसी की पूर्ति के हित हो समर्पित जन्म अपना।।

तुष्ट माँ होगी तभी तो विश्व में सम्मान पा कर।

बढ़ रहे हैं चरण अगणित बस इसी धुन में निरंतर।।

ध्येय के पथ पर निरंतर ”।।

।। भारत माता की जय ।।

अन्य लेख

संबंधित लेख