
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेआठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली, ही घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. या घटनेने मनाला प्रचंड वेदना झाल्या आहेत. असे दु:ख उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेआठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि मानवतेला काळीमा फासणारे आहे. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी या प्रकरणाची सुनावणी ‘फास्ट-ट्रॅक कोर्टा’त (जलदगती न्यायालयात) व्हावी, अशी विशेष विनंती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
या प्रकरणातील तपासाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. तसेच, या प्रकरणाची पारदर्शक व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून तपास वेगाने सुरू आहे.
पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी आपण लवकरच पिंपळवंडीला भेट देणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. त्या चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. अशी ग्वाही त्यांनी दिली.