मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या ‘PULSE’ जागतिक वैद्यकीय परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला वेलनेस आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणारा ब्रँड म्हणून उभे करण्याचे, तसेच बल्क ड्रग पार्क्स आणि स्टार्टअप्समध्ये अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे निर्देश दिले. जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई, येथे 27 व 28 मार्च 2026 रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यकीय क्षेत्रामधील 2900 पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.
पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचारांऐवजी ‘वेलनेस’ उपचारांकडे नागरिकांचा ओघ वाढत आहे. ‘वेलनेस’ उपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे ‘आयुष’मधील उपचार पद्धतींना ‘वेलनेस’कडे वळविण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त स्टार्टअप्स यांना परिषदेत सहभागी करून घ्यावे, जेणेकरून नवनवीन संशोधनावर आधारित चर्चेतून कर्करोगासारख्या आजारांवर सहज, सोपी व परवडणारी उपचारपद्धती विकसित करण्यात स्टार्टअप्सला मदत होईल. वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील याची दक्षता घ्यावी, त्या माध्यमातून राज्यात होत असलेल्या ‘बल्क ड्रग पार्क’ मध्ये गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले
‘पल्स’ परिषदेची रुपरेषा
✅27 मार्च रोजी उदघाटन.
✅ प्लेनरी, 360 डिग्री डोम, आदींसह स्टार्टअपसाठी आणि उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधनाची माहिती देणारी वेगवेगळी दालने असणार.
✅परिषदेत जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को यांचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होतील.
✅वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या जगभरातील नामांकित विद्यापीठांचे कुलगुरू आणि संशोधकही परिषदेत सहभागी होणार.
✅भविष्यातील वैद्यकीय शिक्षण, डिजिटल हेल्थ व कृत्रिम बुद्धिमत्ता, उपचार पद्धतींमधील संशोधन या विषयांवर पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि केस स्टडीज होणार.
✅प्रदर्शन, राऊंड टेबल चर्चा, ‘टेक टॉक’ असणार.
या बैठकीस राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक विभागाने ‘नोडल अधिकारी’ नियुक्त करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.