नाशिक : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकाला विमान प्रवास करता यावा यासाठी देशातील महत्वाच्या शहरात उड्डाण योजनेतंर्गत विमान सेवा सुरू करण्याचा संकल्प केला. त्यात नाशिकच्या विमानतळाचा समावेश होता. या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता वाढणार आहे. आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आठ ते दहापट भाविक येणार आहेत. त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहेत. विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. कृषी क्षेत्रात नाशिक अग्रेसर जिल्हा असल्याने निर्यातीला तसेच औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे.
या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे विमानच भरारी घेणार नाही, तर नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेणार आहे. दावोस दौऱ्यात नाशिकसाठी 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती वाढणार आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात 30 हजार कोटी रूपयांची विविध विकास कामे होणार आहेत. गोदावरी नदी निर्मल राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नाशिकचा परिक्रमा मार्ग हा नाशिकचे ग्रोथ इंजिन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागील सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षितपणे पार पडला. त्या साठी साधू- संत, महंत यांचे सहकार्य लाभले होते. यावेळेसही त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कामे सुरू आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकार कुठलीही कसर ठेवणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.