Tuesday, February 10, 2026

पुणे महापौरपदी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

Share

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या महापौर आणि उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची, तर उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचा विजय सुकर झाला.

पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौरपदासाठी महायुतीकडून मंजुषा नागपुरे यांनी अर्ज दाखल केला होता, तर उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर रिंगणात होते. सुरुवातीला महाविकास आघाडीकडूनही अर्ज दाखल करण्यात आले होते, परंतु संख्याबळ पाहता आणि शहराच्या विकासासाठी एकमत करण्याच्या उद्देशाने विरोधी पक्षांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा केली.

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजुषा नागपुरे यांनी यापूर्वी विविध समित्यांवर काम केले आहे. त्यांच्या निवडीमुळे पुणे महापालिकेत महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळाली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये मंजुषा नागपुरे या २०१२,२०१७ मतांनी वजयी झाल्या. तर २०२६ मध्ये महापालिकेतील पहिल्या बिनविरोध नगरसेविका म्हणून त्या विजयी झाल्या. पुण्यातील भाजपच्या पहिला बिनविरोध नगरसेविका होण्याचा मान त्यांना मिळाला. त्या राष्ट्रसेविका समितीच्या सेविका आणि प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या आहेत.

आरपीआयचे (आठवले गट) ज्येष्ठ नेते असलेले परशुराम वाडेकर हे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. महायुतीमधील घटक पक्षाला सन्मान दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नूतन महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “पुणे शहराचा प्रलंबित विकास आराखडा, वाहतूक कोंडीची समस्या आणि पाणीपुरवठा सुरळीत करणे ही आमची प्राथमिकता असेल. सर्वांना सोबत घेऊन पुण्याचा कायापालट करण्याचा आमचा मानस आहे.”

पुणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक ११९ नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २७, काँग्रेसचे १५, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे १, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ३ उमेदवार विजयी झालेत.

“पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जो ऐतिहासिक विश्वास दाखवला आहे, त्याला पूर्णपणे न्याय देणे हीच आमची प्राथमिकता आहे. शहराचा सर्वांगीण विकास आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून पुण्याची ‘सुसंस्कृत आणि विकसित’ शहर ही ओळख अधिक भक्कम करू,” असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मोहोळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे देखील नूतन महापौर आणि उपमहापौरांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “पुणे शहराचा कारभार आता अधिक पारदर्शक आणि जनहिताचा राहील,” असा विश्वास त्यांनी यावेळी पुणेकरांना दिला.

अन्य लेख

संबंधित लेख