Wednesday, February 11, 2026

सद्गुण विकृतीचा कळस अमरकोटचे राजपूत सोढा राणा

Share

मुघल शासक अकबराचा जन्म हुमायून आणि हमिदा बानो यांच्या पोटी १५ ऑक्टोबर १५४२ रोजी सिंध प्रांतातील अमरकोट संस्थानाच्या (जहागीर) किल्ल्यात झाला.

हुमायून शेरशाह सूरीकडून पराभूत होऊन निर्वासित म्हणून भटकत असताना अमरकोटचे तत्कालीन हिंदू शासक राणा प्रसाद यांनी त्याला आपल्या किल्ल्यात आश्रय दिला होता. तिथेच अकबराचा जन्म झाला.

तेव्हापासून अमरकोटच्या या सोढा राजपूत राणांचे इस्लामी शासक असलेल्या मुघलांशी अतुट असे ऋणानुबंध तयार झाले. आपण “हिंदू” असल्याची त्यांची भावना क्षीण होत गेली आणि आपण “सोढा राजपूत” असल्याच्या ज्ञातीच्या अभिमानाने धर्माभिमानावर मात केली. किती? तर पुढच्या काळात त्याने सद्गुण विकृतीचा कळस गाठला.

१९४५ सालच्या केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुकीत अमरकोट संस्थानाचे २४ वे सोढा राजपूत शासक राणा अर्जुन सिंह यांनी धर्माच्या आधारावर मुसलमानांसाठी वेगळी भूमी मागणाऱ्या मुस्लिम लीगच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. हिंदूंचे प्रतिनिधित्व केवळ काँग्रेस करते अशी ब्रिटिशांची मुस्लिम लीगची आणि सकल हिंदू समाजाची ठाम धारणा असताना राणा अर्जुन सिंह यांचे मुस्लिम लीगच्या तिकिटावर निवडणूक लढवणे ही एक अनाकलनीय घटना होती.

आणि सहाजिकच १४ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यातील संस्थानिकांसाठी असलेल्या Instrument of Accessionचा फायदा घेत प्रजा बहुसंख्य हिंदू असूनही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये विलीन केला.

शिवाय त्यांच्या संस्थानाच्या सीमा भारत व इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान या दोन्ही देशांना भिडत असल्यामुळे (Continuity of Land) त्यांना कुठेही सामील होण्याचे स्वातंत्र्य होते. याचाही फायदा त्यांनी उचलला. (Continuity of Land चा फायदा न मिळाल्यामुळे इच्छा असूनही हैदराबाद संस्थान इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये सामील होऊ शकले नाही. त्याला नाईलाजाने भारतातच राहावे लागले)

इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये सामील झाल्याबरोबर इस्लामी परंपरेप्रमाणे सर्वप्रथम त्यांच्या संस्थानाचे अमरकोट नाव बदलून उमरकोट करण्यात आले.

राणा अर्जुन सिंह यांना इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये जाऊनही आपला व आपल्या प्रजेचा (हिंदू) धर्म, रीती, रिवाज, परंपरा, स्वायत्तता आणि हक्क सुरक्षित राहतील असे का वाटले असेल? या प्रश्नाला काहीच उत्तर नाही.

अकबराचा जन्म आपल्या किल्ल्यात झाला आहे. त्याच्या वडिलांना आपल्या पूर्वजांनी आश्रय दिला आहे. त्यामुळे मुसलमानांविषयी असलेल्या अपरंपार प्रेम शिवाय मोहम्मद अली जिन्ना यांनी राणा अर्जुन सिंह यांना (बंद दाराआड) काही खास आश्वासने दिली होती म्हणे.

तसेच भारताची सीमा अमरकोट पासून जवळपास ४०० किमी लांब होती. आजूबाजूला सगळा मुस्लिम इलाका होता. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणे क्रमप्राप्त होते.

मात्र अमरकोट हे पूर्णतः स्वतंत्र ‘संस्थान’ (Princely State) नसून एक मोठी ‘जहागिरी’ (Estate) होती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सिंध प्रांताचा भाग म्हणून ते आपोआपच पाकिस्तानात समाविष्ट झाले असेही सांगितले जाते.

बाप से बेटा सवाई…

१९४८ साली राणा अर्जुन सिंह यांचे निधन झाले आणि त्यांच्या मागून त्यांचे १७ वर्षीय पुत्र राणा चंदर सिंह अमरकोटचे २५ वे सोढा राजपूत संस्थानिक झाले. राजकारणाच्या बाबतीत बाप से बेटा सवाई निघाला.

राणा चंदर सिंह हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे पुढे पंतप्रधान झालेले झुल्फिकार अली भुत्तो यांचे परममित्र. कारण दोघेही बडे जहागीरदार. भुत्तो खानदानाची त्यांच्या लरकाना जिल्ह्यात २.५ लाख एकर जमीन होती असे सांगतात. दोघांची इतकी गाढ मैत्री होती की, १९६७ साली झुल्फिकार अली भुत्तो अध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या डाव्या विचारसरणीच्या आणि “इस्लाम हा आमचा धर्म आहे, लोकशाही हे आमचे राजकारण आहे, समाजवाद ही आमची अर्थनीती आहे आणि सत्ता जनतेच्या हातात असते (Islam is our Religion; Democracy is our Politics; Socialism is our Economy; Power Lies with the People) असा जाहीरनामा असलेल्या “पाकिस्तान पीपल्स पार्टी”चे (PPP) संस्थापक सदस्य होते.

राणा चंदर सिंह उमरकोट मतदार संघातून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीचे ७ वेळा (एकूण ५३ वर्षे) खासदार म्हणून निवडून गेले होते. केंद्र सरकारमध्ये त्यांनी कृषी आणि महसूल खात्याची मंत्रिपदे भूषवली होती.

रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे पंतप्रधान पद भूषवलेल्या झुल्फिकार अली भुत्तो यांना लष्करी शासक जनरल झिया उल् हक यांनी ४ एप्रिल १९७९ रोजी फासावर लटकवले.

झुल्फिकार अली भुत्तो यांचा राजकीय वारसा आपसूक त्यांची लेक बेनझीर भुत्तो यांच्याकडे आला. राणा चंदर सिंह पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि बेनझीर भुत्तो यांच्याशी कमालीचे एकनिष्ठ राहिले.

१९८८ साली इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. (२३७पैकी) २१७ जागांवर निवडणूक झाली. १०९ जागा जिंकणारा पक्ष सत्तेवर येणार होता. बेनझीर भुत्तो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी ९४ जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष ठरला. मात्र बहुमत दूर राहिले या ९४ खासदारांमध्ये उमरकोटचे राणा चंदर सिंह हे देखील एक खासदार होते.

बेनझीर भुत्तो यांनी अपक्ष म्हणून कराची आणि हैदराबाद इथून निवडून आलेल्या भिकमाग्या (भूखे नंगे) मोहाजीर कौमी मुव्हमेंट (MQM) च्या १३ व इतर सटरफटर पक्षांच्या खासदारांच्या मदतीने बहुमत गाठले आणि त्या पंतप्रधान झाल्या. राणा चंदर सिंह त्यांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले.

मात्र १९८९ च्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात विरोधी पक्षनेते नवाज शरीफ आणि गुलाम मुस्तफा जतोई यांनी बेनझीर सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणला. भीकमाग्या मोहाजीर कौमी मुव्हमेंटने आधीच बेनझीर सरकारची साथ सोडली होती. विरोधी पक्षांकडून आपले खासदार फोडण्यासाठी भरपूर पैसा ओतला जातो आहे (घोडेबाजार/Horse Trading) अशी कुणकुण बेनझीर होतो यांना लागली. त्या प्रचंड बिथरल्या. त्यांनी आपल्या पक्षाच्या आणि आपल्याला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या सर्व खासदारांना एकत्र केले. त्यांच्यासमोर कुराण ठेवले आणि त्यांना कुराणावर हात ठेवून एकनिष्ठतेची शपथ घ्यायला लावली.

राणा चंदर सिंह यांच्यासारख्या काफीराला कुराणावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून त्यांच्यासमोर भगवद्गीता ठेवण्यात आली आणि त्यांना एकनिष्ठतेची शपथ घ्यायला सांगण्यात आले.

राणा चंदर सिंहानी भगवत गीतेवर हात ठेवून एकनिष्ठतेची शपथ घ्यायला स्पष्ट शब्दात नकार दिला. “राजपूत की जबान ही उसका हलफनामा होता है” मी तुम्हाला एकनिष्ठतेचा शब्द दिला आहे आणि एका राजपुतासाठी त्याने दिलेला शब्द हीच शपथ असते. वेगळी शपथ घेण्याची आवश्यकता नाही असे ठणकावून सांगितले.

(बहुदा आपल्या उभ्या आयुष्यात राणा चंदर सिंह एकदाच पराकोटीच्या स्वाभिमानाने जगले असावेत…)

बेनझीर भुत्तो यांनी देखील राणा चंदर सिंहांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्यांना भगवद्गीतेवर हात ठेवून एकनिष्ठतेची शपथ घेण्यासाठी जबरदस्ती केली नाही.

१ नोव्हेंबर १९८९ रोजी अविश्वास प्रस्ताव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीध्ये मतदानासाठी ठेवला गेला.

अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने १०७ मते पडली विरोधात १२५ मते पडली आणि ५ सदस्य अनुपस्थित राहिले आणि अविश्वास प्रस्ताव १२ मतांनी फेटाळला गेला.

बेनझीर भुत्तो यांचे सरकार थोडक्यात बचावले मात्र कुराणावर हात ठेवून एकनिष्ठतेची शपथ घेतलेल्या त्यांच्या व समर्थन देणाऱ्या पक्षांच्या काही खासदारांनी ऐनवेळी दगाफटका केला होता हे अविश्वास प्रस्तावा विरुद्ध मतदान केलेल्या संख्याबळाने उघड झाले.

त्याच वेळी राणा चंदर सिंह मात्र भगवद्गीतेवर हात न ठेवता एकनिष्ठतेची शपथ न घेता “राजपूत की जबान ही उसका हलफनामा होता है” म्हणत अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करून बेनझीर भुत्तोंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. “रघुकुल रीत सदा चली आई, प्राणजाई पर वचन न जाई” या आपल्या सनातन जीवन मूल्याला जागले.

फंदफितुरी… दगा फटका… विश्वासघाताने बापाला भावाला कैदेत टाकून किंवा त्यांचे मुंडके उडवून गादी बळकवण्याची इस्लामिक परंपरा असलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला पहिल्यांदा हिंदूंच्या क्षात्रतेजाची ओळख पटली.

अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत।

मात्र १९९० साली राणा चंदर सिंह यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टी सोडली. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये हिंदू लोकसंख्या मोठी असूनही त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी आणि त्यांचा आवाज प्रभावीपणे मांडण्यासाठी कोणतीही स्वतंत्र राजकीय संघटना नाही असे त्यांना वाटले म्हणे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील हिंदूंची उन्नती करण्यासाठी त्यांना राजकीयदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी विशेषतः हिंदू देवळांची होणारी दैनावस्था थांबवण्यासाठी त्यांचे बळजबरीने होणारे धर्मांतर थांबवण्यासाठी त्यांनी “पाकिस्तान हिंदू पार्टी” नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. “हिंदू” म्हणून आपले अस्तित्व टिकले तरच आपण “सोढा राजपूत” असल्याचे अभिमानाने सांगू शकतो या वास्तवाची जाणीव बहुदा त्यांना झाली असावी.

आता त्यांचा हिंदू धर्माचा सार्थ अभिमान जागृत झाला होता. त्यांनी पक्षासाठी जो भगवा झेंडा निवडला होता त्याच्यावर हिंदू मूल्यांचे प्रतीक असलेली ‘ॐ’ आणि ‘त्रिशूळ’ ही चिन्हे होती.

मात्र त्यांची आणि त्यांच्या पाकिस्तान हिंदू पार्टी या राजकीय पक्षाची देखील २००९ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत वाताहात होत गेली. पुढे त्यांचा मुलगा राणा हमीर सिंह यांनी आपल्या वडिलांच्या “पाकिस्तान हिंदू पार्टी”चा राजकीय वारसा चालवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि नंतर गपचूप पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये सामील झाला.

१९४७ साली जेव्हा आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे पहिल्यांदा धर्माच्या आधारावर विभाजन झाले तेव्हा रावी पार असलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये सामील होण्यापूर्वी आपल्या हिंदू समाजाचा हिंदू जीवनमूल्यांचा विचार करायला हवा होता तेव्हा तो ना त्यांच्या वडिलांनी राणा अर्जुन सिंह यांनी केला.

ना Islam is our Religion म्हणणाऱ्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची स्थापना करताना हिरिरीने पुढाकार घेणाऱ्या त्या पक्षाचे संस्थापक सदस्य असलेल्या राणा चंदर सिंह यांनी केला.

जेव्हा त्यांना आपण “सोढा राजपूत” असण्याबरोबर त्याच्याही पेक्षा अधिक आपण “हिंदू” असल्याचा साक्षात्कार झाला तेव्हा खूप उशीर झाला होता. संत कबीरांच्या भाषेत सांगायचे झाले तर,

करता रहा सो क्यों किया, अब करी क्यों पछताए |
बोये पेड़ बबूल का, अमुआ कहाँ से पाए ||

अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात सांगायचे तर

अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत।

अशीच राणा चंदर सिंह यांच्या जीवनाची शोकांतिका आहे.

अन्य लेख

संबंधित लेख