Wednesday, February 11, 2026

जय जय रघुवीर समर्थ!

Share

आज मारलो गेलो नाही हीच ईश्वरकृपा आणि मारलो गेलो तर ईश्वरेच्छा म्हणून दैववादी झालेल्या समाजाला ‘वन्ही तो चेतवावा रे, केल्याने होत आहे रेʼ असं म्हणून ज्यांनी समाजाचं स्फुल्लिंग चेतवलं. ‘भवाच्या भये काय भीतोसी लंडीʼ असं ठणकावून विचारताना धीर धरायलाही सांगितलं. मानवी जीवनाच्या हरेक अंगाला स्पर्श करणारा दासबोधासारखा ग्रंथ लिहिला. संत म्हणजे जो जपमाळ घेऊन बसतो. देवावर विसंबून असतो, अशी समजूत तेव्हा होती. अशा काळात हाताखालच्या कुबडीत गुप्ती बाळगणारे पहिले संत या बंडखोरीमुळेच समर्थ झाले. 

शाळेत असताना “गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा” या घोकंपट्टीपासून ते आज “उत्तम पदार्थ दुसर्‍यास द्यावा” पर्यंतचे समर्थ रामदास… केवढा अवाका… जगताना काय करावं, काय करू नये, कसं बोलावं, कसं गावं, कसं लिहावं, कसं ल्यावं अशा लहानात लहान गोष्टींचे सुलभ दाखले समर्थांनी दिले आहेत. सामाजिक कार्य करणाऱ्या कुठल्याही माणसाला समर्थांचं जीवन पथप्रदर्शक आहे.

बालपणी १२ वर्षांचं कठोरतम तप केलेलं. कुणी भिक्षा वाढावी. कुणी उपहास करावा. मन खंतावून जावं. मग बोलायचं कुणाशी? आई तर तिकडे जांबात! मग हे लेकरू रामरायाच्या कुशीत शिरे आणि मागणं मागे की रामराया, कोमल वाचा दे!

अंतरपारखी दे रे राम। बहुजनमैत्री दे रे राम। 

समाज हसेल, दूषणं देईल. मग मी का त्यांना शिव्याशाप देऊ? मला तर तुला भेटायची ओढ. तुझ्या कृपेने याच दूषणं देणाऱ्यांचा उद्धार करायचा आहे. तर माझी वाणी कोमलच ठेव आणि करणी विमल ठेव! समाज बदलायचा तर तो बनतो व्यक्तींचा! मग व्यक्तीला बदलत गेलं, संस्कारित करत गेलं तर समाज बदलेल आणि बदलायचा अधिकार विश्वास आणि मैत्रीशिवाय मिळत नाही. यासाठी अनेकांशी मैत्री होऊ दे! माणसांचं अंतरंग ओळखण्याची बुद्धी दे! धूर्तकळा दे! जे जे उत्तम ते ते दे! असं रामरायाकडे मागावं.

बारा वर्षांत बलदंड शरीर आणि उपासनेचं सामर्थ्य घेऊन हा तरूण निघाला. अखंड हिंदुस्थान पुढची बारा वर्षं फिरून समाजाचं दर्शन घेतलं. पारतंत्र्यात मनं मोडून गेलेला, कणाहीन समाज बघितला. दैवावलंबी, आळशी समाज पारतंत्र्याच्या दलदलीलाच अमृताचं सरोवर समजून त्यात लोळत होता. परधर्मीय आक्रमकांची तळी उचलण्यात धन्यता मानत होता. मात्र समर्थांच्या दृष्टीला काही निराळंच दिसे. कुण्या मुघली अंमलदाराने यावं, गावं बेचिराख करावीत, आयाबहिणी नासवाव्यात. विरोध करणाऱ्या तरण्याबांड पोरांची खांडोळी उडवावी. सगळीकडे दैन्य आणि आपदा!  

या हिंदुस्थानात ना शौर्याची कमी ना बुद्धीची! कमतरता फक्त संघटनेची! मग ते उभारायला हवं. बस! ठरलं!! शक्तीची उपासना शिकवायची. बलभीमाची मंदिरं उभारून तिथे तरूणांची शरीरं आणि मनं पोलादासारखी घडवायची. मात्र हे करायचं कसं?

मुलाच्या चालीनें चालावें। मुलाच्या मनोगतें बोलावें॥
तैसें जनास सिकवावें। हळुहळु॥

संकल्प केला नी त्यासाठी जीवन वाहिलं. भारतभर मंदिरं स्थापली. तिथे तरणी पोरं हजार बाराशे सूर्यनमस्कार घालू लागली. भारतभर महंतांचं एक विशाल संगठन उभं राहिलं. महंत आणि अनुशासन यांचा तोपर्यंत अर्थाअर्थी काही संबंध दिसतच नव्हता. मात्र रामदासी संप्रदाय वेगळाच! तिथे कसं असावं, हे सांगताना समर्थ म्हणतात, 

समुदाव पाहिजे मोठा। तरी तणावा असाव्या बळकटा॥
मठ करूनि ताठा। धरूं नयें॥

एकीकडे छत्रपती शिवराय राजकारण खेळत होते. आपल्या असामान्य युद्धतंत्र आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर पातशाह्यांना जेरीस आणत होते. भक्ती आणि शक्ती एकवटली की काय होतं, हे विद्यारण्य स्वामी आणि हरिहर बुक्करायाने एकदा दाखवलं होतं. “महंते महंत करावे” असा समर्थांचा आपल्या शिष्यांना उपदेश होताच! ते महंत गावोगावी फिरत, अशी धारणेची मुलं गोळा करत, एकेकाचे अधिकार जाणून त्याची इष्ट योजना केली जाई. स्वराज्य तेही हिंदूंचं येऊ शकतं; नव्हे आपण ते आणू शकतो, हा विश्वास समर्थांनी समाजाला दिला. जिवीतापेक्षा स्वातंत्र्य मोठं आहे, हे शिकवलं. लोकसंपर्क, लोकसंग्रह, लोकसंस्कार आणि लोकयोजना समर्थांनी केली. 

आयुष्याच्या अवघड टप्प्यावर ज्यांनी ज्यांनी दासबोध हाती घेतला, त्यांचं आयुष्य अंतर्बाह्य बदलून गेलं. इतक्या व्यापातून जगण्यातल्या सौंदर्यावरही समर्थांनी अपार प्रेम केलं.अगदी बागा कशा उभाराव्यात, सुंदर अक्षर कसं काढावं अशा नाना गोष्टी सांगितल्या. कुरिती, रूढी तर अशा चिरडल्या की बोकडाचा निवेद लागतो म्हणून म्हसोबावर धावून गेले. पहिला मारूती स्थापला स्मशानात! 

समाजाला आचारशील, विचारशील केलं. बऱ्यावाईटाचा विवेक दिला. जगणं संयत असावं, कोणतीही गोष्ट अति करू नये, हे सांगितलं. सतत लहानसहान गोष्टीत वाद घालणाऱ्या करंट्यांना समर्थ सांगत,

“राखावी बहुतांचि अंतरे। भाग्य येते तदनंतरे॥” 

समर्थांच्या सगळ्या जीविताच्या मध्यभागी होता तो विवेक! जे करायचं ते विचारपूर्वकच! महंतांना समर्थ सांगतात, 

“ दीर्घ सूचना आधीं कळे | सावधपणे तर्क प्रबळे ||
जाणजाणोनि निवळे | येथायोग्य ||”

पुढे संभावणाऱ्या घटनांची आधीच कल्पना असलेला, त्यावर सावधपणे तर्कशुद्ध विचार करणारा, परिस्थिती समजून घेत ती योग्य प्रकारे निवळेल याची काळजी घेणारा महंत असावा. असा जो बुद्धिवंत महंत असतो तोच रामदासी परंपरा सांभाळू शकेल. हे गुण नसतील तर ते ‘अंतवंत’च, असं समर्थ म्हणतात. 

महंत म्हणजे सामाजिक कार्यकर्ताच! त्याने समाजाच्या सुखदुःखांमध्ये समाजाबरोबर राहावं; असं समर्थ सांगतात. 

दुखः दुसऱ्याचें जाणावें | ऐकोन तरी वांटून घ्यावें ||
बरें वाईट सोसावें | समुदायाचें ||

 सामान्यांमधे सामान्यांसारखंच राहून असामान्य जगलेले समर्थ, रागाने फेकून मारलेलं पोतेरं धुवून त्याच्या वाती वळून त्या पोतेऱ्याला रामासमोर जळायचं भाग्य देणारे समर्थ, जिथे औरंगजेबाच्या नजरेला नजर द्यायची हिंमत अनेक धुरंधरांमधे नव्हती तिथे त्याला कठोर आणि ठामपणे बुडाला औरंग्या पापी म्हणणारे समर्थ, अंगावर भगवी छाटी घेऊन भारतभ्रमण करणारे समर्थ, शिवथरघळीत बसून दासबोध सांगणारे समर्थ, आरत्या, सवाया रचणारे समर्थ, लहान मुलांवर प्रेम करणारे, त्यांना लळा लावणारे समर्थ, शिवछत्रपतींचा गुणगौरव करणारे समर्थ, महाराजांच्या काळजीपोटी ‘येकांती वि-वंचना करोनि। इष्ट योजना करावी।ʼ असा सल्ला देणारे समर्थ, छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या वडीलांची थोरवी सांगून ‘याहूनि करावे विशेष।….ʼ असं सांगणारे समर्थ! किती तरी रूपं!

समर्थ म्हणजे अखंड जागरण, समर्थ म्हणजे सदोदित सावधपण, समर्थ म्हणजे निरंतर चळवळ, समर्थ म्हणजे अजरामर रामभक्ती, समर्थ म्हणजे भीमशक्ती! शब्दभंडार कमी पडेल इतकं व्यापकपण समर्थांचं आहे. आज दासनवमी आहे. समर्थ इहलोक सोडून गेले तो दिवस! माघ वद्य नवमीला शके १६०३ ला समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला. समर्थ गेले ते देहरूपाने! आज जवळपास ३४५ वर्षांनंतरही ते दासबोधाच्या रूपाने आजही आपल्यासोबत आहेत. स्वतः समर्थच तसा निर्वाळा देतात,

“आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वतः सिद्ध|| 
असता न करावा हो खेद | भक्तजनी ||”

– ऋतुराज कशेळकर

अन्य लेख

संबंधित लेख