२५ मे १९६४ ला श्रीलंकेत “वेसक दिवस” (Vesak Day) साजरा केला जात होता. वेसक दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा. आणि त्याच दिवशी श्रीलंकेने चहाच्या थर्मासमध्ये बर्फात व्यवस्थित पॅक करून विमानाने एका व्यक्तीच्या हस्ते आपला पहिला “नेत्रदानाच्या डोळ्यांचा पहिला संच” सिंगापूरला रवाना केला. या ऐतिहासिक घटनेची शिल्पकार होती श्रीलंका आय डोनेशन सोसायटी.
७०% बौद्ध पंथीय असलेल्या श्रीलंकेत पुढच्या काळात तिथल्या बौद्ध भिक्खूंनी “मरणोत्तर नेत्रदाना”ची चळवळ आपली मानली. बौद्ध पंथातल्या (निःस्वार्थी) “दान” या संकल्पनेवर आधारलेल्या या चळवळीने श्रीलंकेत चांगलेच मूळ पकडले. श्रीलंकेत मरणोत्तर नेत्रदान हे एक मोठे नैतिक आणि धार्मिक ‘पुण्यकर्म’ समजले जाऊ लागले. श्रीलंकेतील हिंदू व ख्रिश्चन समाजाने देखील या चळवळीत भरीव योगदान दिलेले आहे.

तेव्हापासून जानेवारी २०२६ पर्यंत श्रीलंका आय डोनेशन सोसायटीने श्रीलंकेत आपल्या नागरिकांसाठी ६५,५४६ तर ५७ देशांमधील रुग्णांसाठी कॉर्निया (नेत्रपटल) प्रत्यारोपणासाठी सुमारे १,०१,४८३ कॉर्निया प्रदान केले आहेत. ते ही अक्षरशः पूर्णतः विनामूल्य.
तर २० लाखांहून अधिक श्रीलंकन नागरिकांनी “मरणोत्तर नेत्रदाना”साठी श्रीलंका आय डोनेशन सोसायटीला इच्छापत्र लिहून दिलेले आहे. यामुळे दरवर्षी सुमारे ३,००० कॉर्निया मिळतात. श्रीलंकेत एवढी आवश्यकता नसल्यामुळे साधारण २००० हून अधिक कॉर्निया परदेशात पाठवले जातात.
अर्थात श्रीलंकेत त्यांच्या देशाच्या नागरिकांना कॉर्निया शस्त्रक्रियेसाठी प्रथम प्राधान्य दिले जाते आणि तेही कोणतेही शुल्क न आकारता. अशाप्रकारे अंध बंधू-भगिनींची इतक्या मोठ्या प्रमाणावर मानवतावादी सेवा करणारी ही जगातील एकमेव संस्था असावी.
या कॉर्नियाचा सर्वात लाभार्थी देश आहे. जगभरात भीक मागण्यासाठी सगळ्यात पुढे असलेला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान (कारण तिथे पारंपारिक इस्लामिक कायद्यानुसार मृतदेह संपूर्ण आणि अखंड दफन करणे आवश्यक आहे) इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला २६,००० हून अधिक कॉर्निया श्रीलंकेने पाठवले आहेत. (हे नि:शुल्क मिळालेले कॉर्निया खरेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये गरजूंना दिले जातात की अन्य देशांना परस्पर विकले जातात याची श्रीलंकेने खातरजमा करणे आवश्यक आहे.) इजिप्तला ८,००० आणि जपानला ६,००० हून अधिक कॉर्निया मिळाले आहेत.

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती जे. आर. जयवर्धने यांनी श्रीलंका आय डोनेशन सोसायटीमार्फत १९९६ “मरणोत्तर नेत्रदान” केले. त्यामुळे श्रीलंकेतील मरणोत्तर नेत्रदानाच्या चळवळीला एक वेगळीच प्रतिष्ठा लाभली व वेग मिळाला.

आज श्रीलंका आय डोनेशन सोसायटीच्या ४५० हून अधिक शाखा आहेत. त्यांच्याकडे १५,००० हून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक आहेत. हे स्वयंसेवक मरणोत्तर नेत्रदानाच्या दात्याचे डोळे काढण्यासाठी कायम तयार असतात. मृत्यूनंतर ४ तासांच्या आत डोळे काढून ते बर्फात पॅक केले जातात आणि ४ तासांच्या आत प्रयोगशाळेत ठेवले जातात. डोळे काढण्याची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक हाताळावी लागते. जेणेकरून कॉर्नियल एंडोथेलियमला नुकसान पोचणार नाही. डोळे काढल्यापासून त्यांचे ५ ते २१ दिवसांच्या आत प्रत्यारोपण केले जाते.
साधारणतः मरणोत्तर नेत्रदानाच्या एका दात्यामुळे दोन अंधांना दृष्टी मिळते कारण एका डोळ्याने गरज भागण्यासारखी असल्यामुळे प्रत्येक अंधाला एकच डोळा दिला जातो. एकूण जन्मांध मुलांपैकी अंदाजे ३०% ते ४०% मुलांचे अंधत्व हे शस्त्रक्रियेद्वारे किंवा योग्य उपचारांनी पूर्णपणे किंवा अंशतः ठीक होऊ शकते.
जर अंधत्वाचे कारण जन्मजात मोतीबिंदू (Congenital Cataract) किंवा काचबिंदू (Glaucoma) असेल तर वेळेवर शस्त्रक्रिया केल्यास दृष्टी मिळण्याची शक्यता ८०% ते ९०% पर्यंत असते.
अशाप्रकारे बौद्ध संप्रदायातील (निःस्वार्थी) “दान” या संकल्पनेवर आधारलेल्या या सामाजिक चळवळीद्वारे श्रीलंकेने आपल्या देशातील अंधत्वावर शक्य तेवढी मात केली आहे. तिथे कॉर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी वेटिंग लिस्टवर एकही जन्मांध नाही व जगालाही ते नि:स्वार्थ भावनेने यासाठी मदत करत आहेत.
श्रीलंका आय डोनेशन सोसायटीचे शिल्पकार डॉ. हडसन सिल्व्हा

१९२९ साली श्रीलंकेच्या कोलंबोत जन्मलेल्या हडसन सिल्व्हा यांनी १९५८ मध्ये वैद्यकीय विद्यार्थी असताना कॉर्निया गोळा करण्याची मोहीम सुरू केली. १९५९ मध्ये त्यांना कॉर्नियाचा पहिला संच मिळाला आणि तो त्यांनी कोलंबोतील विजेरामा मावाथा येथील त्यांच्या घरच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला.
त्यांच्या पत्नी इरांगानी (नी डी सिल्वा कुलरत्ने) यांच्या मदतीने हडसन सिल्वा यांनी १९६१ मध्ये श्रीलंका आय डोनेशन सोसायटीची ना नफा ना तोटा तत्त्वावर स्थापना केली. नंतरच्या काळात त्यांनी व श्रीलंकेतील बौद्ध भिक्खूंनी ही चळवळ पुढे नेली आणि श्रीलंकेतील बहुसंख्य बौद्ध समाजाला हे पटवून देण्यात यश मिळवले की, मृत्यूनंतर डोळे दान करणे हे एक पुण्यकर्म आहे. चळवळीला जसजशी गती मिळाली तसतसे हजारो लोकांनी मरणोत्तर नेत्रदानाचे इच्छापत्र भरून दिले आणि त्यानंतर चळवळीचा वेग कसा वाढत गेला हे आपण वरती पाहिलेच आहे. आज श्रीलंकेत ही चळवळ लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. लोकसहभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही त्याचे हे जगातील सर्वोत्तम उदाहरण आहे.

डॉ. हडसन सिल्व्हा, श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू, श्रीलंकेची जनता आणि सरकार यांच्या कार्याची महती पटण्यासाठी आपण केवळ अर्धा तास डोळ्यावर घट्टपट्टी बांधून बसून बघावे आणि The life without sight is just like all black no white या वाक्प्रचाराची अनुभूती घ्यावी. म्हणजे आपल्याला श्रीलंकेच्या मानवतावादी सेवेची महती पटेल. व मूलतः “परोपकार” (धर्मादाय) ही उपजत प्रवृत्ती व संस्कार असलेल्या हिंदू बहुल भारतातदेखील अशी “मरणोत्तर नेत्रदाना”ची प्रभावी चळवळ उभी राहावी यासाठी प्रेरणासुद्धा मिळेल.