मुंबई : राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता अखेर महिलांच्या बँक खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास विभागाने सोमवार, २३ फेब्रुवारीपासून या प्रक्रियेला प्रारंभ केला असून, अनेक महिलांना हप्ता जमा झाल्याचे संदेश (SMS) मिळण्यास सुरुवात झाली आहे.
सामाजिक न्याय विभागाने १८ फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास विभागाला ९८ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता. हा निधी प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने जानेवारी महिन्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यास सुरुवात केली आहे. जुलै २०२४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा हा १९ वा हप्ता आहे.
लाभार्थी संख्येत घट आणि ‘ई-केवायसी’चा परिणाम
योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या २ कोटी ४६ लाखांच्या आसपास होती. मात्र, राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ‘ई-केवायसी’ (e-KYC) बंधनकारक केल्यानंतर ही संख्या घटली आहे. १ कोटी ९० लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली, तरी केवळ १ कोटी ६० लाख पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला होता. जानेवारीच्या हप्त्यासाठीही याच निकषांचा आधार घेण्यात आला आहे.
दुरुस्तीसाठी शेवटची संधी
ज्या महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत त्रुटी आहेत किंवा चुकीचे पर्याय निवडले गेले आहेत, त्यांना शासनाने दिलासा दिला आहे. अशा महिलांना ३१ मार्च २०२६ पर्यंत आपली ई-केवायसी दुरुस्त करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. यामुळे प्रलंबित लाभार्थ्यांना पुन्हा योजनेचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.
शेतकरी महिलांना अतिरिक्त लाभ
योजनेच्या नियमानुसार, ज्या महिला शेतकरी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा लाभ घेतात, त्यांना या योजनेतून दरमहा ५०० रुपयांचा लाभ दिला जात आहे.