यावर्षी (२०२६) होळीच्या सणावर खग्रास चंद्रग्रहणाचे (Lunar Eclipse) सावटही पडले. त्यामुळे, अनेक ठिकाणी काही गोष्टी आणि रुढी पंरपरा पाळल्या गेल्या. ग्रहणात काय करावे आणि काय करु नये, हे पूर्वजांनी, वयोवृद्धांनी किंवा जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे प्रथा पाळल्या जातनाचे दिसून आले. अनेक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. साधारणतः ग्रहण काळात काही महत्त्वाच्या आणि शुभ कामांनाही मनाई केली जाते.
ग्रहण काळात (दुपारी ३ वाजून २० मिनिटे ते संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत) पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बंद करण्यात आले होते. ग्रहण संपल्यानंतर विधिवध पूजा करून दगडूशेठ मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आले.
टीम इंडिया पुढील सामन्यासाठी मुंबईत दाखल झाली होती. पण खग्रास चंद्रग्रहणाची माहिती भारतीय संघ व्यवस्थापनाला मिळाली आणि त्यानंतर टीम इंडियाच्या सरावाची वेळ संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात आली. प्रत्यक्षात भारतीय संघ आज संध्याकाळी ७ वाजल्यानंतर फ्लडलाईट्समध्ये सराव करताना दिसले.
या सगळ्या घटनांमुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आग आग झालेली आहे. तसेच सोशल मिडियातून ग्रहणाविषयी अनेक अतिरंजित दावे केले जात असून गर्भवती महिलांनी ग्रहण काळात एकाच जागेवर बसावे. पाणी पिऊ नये. तसेच मलमूत्र विसर्जन करू नये अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले दिले जात होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रहणविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. हमीद दाभोळकर यांनी केली आहे.
हिंदू सण, उत्सव, धार्मिक संमेलने असे विषय आले की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाचा कुंभकर्ण धडबडून जागा होतो. बाकी रमजान ईद, बकरी ईद, गुड फ्रायडे, ईस्टर संडे, ख्रिसमस या सणांना हा कुंभकर्ण डाराडूर झोपलेला असतो. त्याची झोप आणि जागृती सोईस्कर (selective) आहे. हे सकल हिंदू समाज पुरेपूर जाणून आहे.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील रेषा अतिशय पुसट असते. ती पुसण्याचे पाप डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी करू नये. अंधश्रद्धेवर घाला घालत असताना आपण कोणाच्या (अर्थात फक्त हिंदूंच्या) श्रद्धा तर दुखावत नाही ना? याची त्यांनी काळजी घ्यावी. अर्थात त्यांनी घेतली काय आणि नाही घेतली काय. आपली स्वतःची काळजी घ्यायला सकल हिंदू समाज समर्थ आहे. तो आपल्यात कालानुरूप बदल घडवून आणतो आणि म्हणूनच तो चिरंजीव आहे.
अपवादाला नियम समजू नये…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘सोडा अंधश्रद्धेचं ग्रहण’ हा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रहण लागलं की अजूनही अनेक ठिकाणी गर्भवती महिलांना भाजी चिरू नको, कात्री लावू नको, काही खाऊ नको असं सांगितलं जातं. “ग्रहणात भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात”, अशी समजूत आजही काही घरांमध्ये पाळली जाते. पण पुण्यातील नांदेड सिटी, सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या चांदणी प्रफुल्ल थोरात यांनी ही समजूत फेटाळली. ग्रहण सुरू होताच त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन भाज्या चिरल्या, कात्रीने कागद कापले आणि अगदी निर्धास्तपणे जेवणही केलं.
पुण्यात चंद्रग्रहणाच्या निमित्ताने अंधश्रद्धेविरोधात हा हटके उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा जो फोटो मीडिया सोशल मीडिया प्रसिद्ध झाला आहे त्यात चांदणी ताई, त्यांचे पती व पतीने कडेवर घेतलेला मुलगा दिसत आहेत. मात्र मुलाच्या कपाळावर आणि गालाला काळी तीट लावलेली आहे आणि आपल्याकडे बाळाला नजर लागू नये म्हणून तीट लावतात. पण चांदणी ताईंच्या बाबतीत ती अंधश्रद्धा नसावी. आपल्या हटके उपक्रमाचा डांगोरा पिटण्यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चांदणी ताईंच्या बाळाच्या कपाळावरची व गालावरची तीट निर्मूलन केली असती तर त्यांच्या या उपक्रमाचा चांगला प्रभाव समाजावर पडला असता. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अपवादाला नियम समजू नये.
हिंदू समाज आपल्या रूढी परंपरा कोणावरही लादत नाही. अंतराळात घडणाऱ्या खगोलशास्त्रीय घटनेचा पृथ्वीवरील मानवी जीवनावर परिणाम होतो अशी ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी आपल्या पूर्वजांनी सांगितलेले ग्रहण काळातील यमनियम जरूर पाळावेत. ज्यांची जितकी श्रद्धा आहे त्यांनी तितकेच पाळावेत किंवा ज्यांची अजिबात श्रद्धा नाही त्यांनी अजिबात पाळू नयेत. श्रद्धा अश्रद्धेच्या बाबतीत इतका साधा सरळ हिशोब सकल हिंदू समाज करतो. “अंधश्रद्धा” म्हणून त्याला डिवचण्याचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांना काहीही कारण नाही.
मात्र चर्चच्या पापांची चर्चा देखील नाही…

आपल्या देशात ख्रिस्ती मिशनरी चर्चमध्ये किंवा एखाद्या सभागृहात रोज कुठेनाकुठे कोणी पास्टर किंवा फादर अगदी रेव्हरंड देखील “चंगाई सभा” घेत असतात. चंगाई (Changai) या हिंदी शब्दाचा अर्थ ‘बरे होणे’, ‘आरोग्य लाभणे’ किंवा ‘आजारपणातून मुक्त होणे’ असा होतो. ख्रिश्चन सुवार्ता/बायबलच्या मराठी किंवा हिंदी भाषांतरात ‘चंगाई’ म्हणजे चमत्कारीकरित्या बरे होणे. या अर्थाने मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. कॅन्सर आणि एड्स सारखे दुर्धर रोग देखील चंगाई सभेत चमत्काराने बरे केले जातात म्हणे.

अगदी “आशिर्वाद प्रार्थना केंद्रा”तून आणलेले आशिर्वादीत तेल लावून १५ दिवस बंद असलेला मोबाईल प्रभू येशूच्या कृपेने चालू झाल्याचे चमत्कार देखील भारतातील चर्च घडवत असतात.

मग भारतातील हेच ख्रिस्ती मिशनरी एखादी चंगाई सभा विकलांग होऊन व्हीलचेअरवर फिरणाऱ्या आपल्या सर्वोच्च धर्मगुरुला म्हणजे पोपला “चंगा” करण्यासाठी व्हॅटिकनला का घेत नाहीत? आशीर्वाद प्रार्थना केंद्राची एखादी तेलाची बाटली विकलांग झालेल्या पोप महाशयांसाठी व्हॅटिकनला कुरियर का करत नाहीत? असा प्रश्न डॉक्टर हमीद दाभोळकर यांना भारतातल्या चर्चला कधी विचारावासा वाटत नाही? त्यांना ही ख्रिश्चन धर्मातील ही अंधश्रद्धा दिसत नाही? की ती ख्रिश्चन धर्मातली आहे म्हणून ते सोईस्कररित्या मूग गिळून शांत बसतात?
चंगाई सभा असो किंवा आशीर्वाद प्रार्थना केंद्र असो… चमत्काराच्या नावाखाली आमच्या भोळ्याभाबड्या, अशिक्षित आणि संकटाने घेरलेल्या हिंदू समाज बांधवांचे कन्वर्जन करण्याचे हे देशव्यापी भयंकर षडयंत्र आहे. आणि याबाबतीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मौन हे त्याच्यापेक्षा मोठे कुटील षडयंत्र आहे.

१७ व्या शतकात सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे हा ‘सूर्यकेंद्री सिद्धांत’ (Heliocentrism) गॅलिलिओ गॅलिलिने मांडला होता. तो त्याने त्या वेळच्या उपलब्ध पुराव्यानुसार सिद्ध देखील केला होता परंतु चर्चच्या मते बायबलमध्ये लिहिलेले असल्यामुळे पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्याभोवती फिरतो (पृथ्वीकेंद्री सिद्धांत) आहे. गॅलिलिओ गॅलिलिने हे मान्य करण्यास नकार दिल्यामुळे चर्चने त्याला पाखंडी ठरवून आयुष्याची शेवटची ९ वर्षे घरातच नजरकैदेत करून ठेवले होते.
१६३३ मध्ये रोमन कॅथोलिक चर्चच्या दबावाखाली (म्हणजे जीवे मारण्याच्या धमकी मुळे) गॅलिलिओ गॅलीलीने आपला सिद्धांत (पृथ्वी सूर्याभोवती फिरते) चुकीचा असल्याचे मान्य केले आणि माफी मागितली होती. माफी मागितल्यानंतर गॅलिलिओ गॅलिली “तरीही पृथ्वी फिरते आहे” (Eppur si muove) असे पुटपुटले होते, अशी आख्यायिका आहे.
पुढे ३५० वर्षानंतर ३१ ऑक्टोबर १९९२ रोजी पोप जॉन पॉल II यांनी अधिकृतपणे मान्य केले की, १६३३ मध्ये चर्चकडून गॅलिलिओच्या खटल्यात चर्चची चूक झाली होती… व्वा रे व्वा!! काय ते चर्चचे औदार्य. काय ती विनम्रता. काय ती करुणा. काय तो वैचारिक प्रामाणिकपणा. हा सगळा किस्सा ऐकून बहुदा डॉक्टर हमीद दाभोळकर यांची मान चर्चसमोर आदराने झुकली असेल. डोळे आनंदाश्रुनी डबडबून आले असतील आणि आमची हिंदू धर्मपीठे हिंदू धर्माचार्य चर्च आणि पोप पुढे किती तुच्छ आहेत याची खात्री पटली असेल. हो की नाही हो डॉक्टर हमीद दाभोळकर?
बाबा बंगाली… अंनिसची वाचा बसली…

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये किंवा सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये मुठकरणी व वशीकरणातील तज्ञ बाबा बंगाल्यांची विपुल पोस्टर्स लागलेली असतात. अगदी फोन नंबर सकट. मनचाहा प्यारपासून जादूटोणा विदेश यात्रा फिल्म मे सफलता तुमच्या आयुष्यातली कोणतीही जटील समस्या हे बाबा बंगाली १००% गॅरंटीने आणि २४ तासात सोडवतात.
डॉक्टर हमीद दाभोळकर यांना एखाद्या बाबा बंगल्याचा फोन नंबर कधी फिरवावासा वाटला नाही? त्यांना यात अंधश्रद्धा दिसत नाही की बाबा बंगाली हा हटकून मुसलमान असल्यामुळे डॉक्टर हमीद दाभोळकर त्यांना टरकून असतात (खरं म्हणजे टर्रकन फाटते)?
चपट्या पृथ्वीचे चंद्रग्रहण…

या चंद्र ग्रहणातील यमनियमांवरून डॉक्टर हमीद दाभोळकर हिंदू रुढी परंपरांना लक्ष्य करत आहे. त्या डॉक्टर हमीद दाभोळकरांनी पृथ्वीला चार कोपरे असल्याचे बायबल म्हणते आणि कुराणमध्ये ‘फराशनाहा’ (आम्ही ती पसरवली) ‘सुतिहत’ (सपाट केली) किंवा ‘बिसात’ (सतरंजीसारखी पसरलेली) असे शब्द वापरले आहेत. अर्थात् कुराणात पृथ्वी “चपटी” असल्याचे सुचवले आहे. यावर एक चकार शब्द बोलत नाहीत. हे त्यांचे सोईस्कर मौन सकल हिंदू समाजाच्या नजरेतून सुटलेले नाही. म्हणजे बायबल आणि कुराणाप्रमाणे कालचे चंद्रग्रहण वरच्या फोटोप्रमाणे दिसयला हवे होते. डॉक्टर हमीद दाभोळकरांना बहुधा ते तसेच दिसले असावे.
भूगोल… खगोल… हिंदूंचा विषयच खोल…

भगवंताचा तिसरा अवतार वराह अवतार. त्याने आपल्या अणकुचीदार दातांवर “गोल” पृथ्वी तोलून धरली होती. अशी आमची श्रद्धा आहे. डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी त्याला खुशाल अंधश्रद्धा म्हणावे पण पृथ्वी “गोल” आहे याचे ज्ञान आमच्या पूर्वजांना अनादी कालापासून होते हे त्यांनी प्रामाणिकपणे मान्य करावे.
Geographyला “भूगोल” आणि Astronomyला “खगोल” म्हणणारे आमचे पूर्वज कधीच “चपटी”च्या भानगडीत पडले नाहीत. वैज्ञानिकदृष्ट्या आमचे पूर्वच किती प्रगत होते त्याची साक्ष देणारी ही शब्दावली आहे. श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे हिंदू समाजाला शिकवण्याच्या भानगडीत डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी पडू नये. विज्ञान श्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे काय हे समजावण्याचा त्यांना कंड सुटला असेल तर तो त्यांनी मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मीयांना आपले ज्ञानामृत पाजून शमवावा.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती हीच घोर अंधश्रद्धा…

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर (ज्याला ‘ओंकारेश्वर पूल’ असेही म्हटले जाते) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि तपासातील विलंबाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस) आणि इतर पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते दरवर्षी २० ऑगस्टला या ठिकाणी एकत्र येतात. आंदोलक या पुलावर काळ्या फिती बांधतात आणि स्वतःही काळ्या फिती लावून किंवा काळे कपडे घालून निषेध व्यक्त करतात.
वर्षातून एक दिवस पुलावर काळ्या फिती बांधून काळे कपडे घालून डॉ. नरेंद्र दाभोळकर परत येणार आहेत की त्यांचे “खरे (हो हो खरेखुरे) मारेकरी” सापडणार आहेत? तरीही अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे सव्यापसव्य कशासाठी करते? खरं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलन करते हीच घोर अंधश्रद्धा आहे.
अहं… आवाम… वयम्…

२० ऑगस्टच्या निदर्शनांच्या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हातात “आम्ही सारे दाभोळकर” चे फलक घेऊन उभे राहतात. आम्ही हे मी या एकवचनाचे अनेक वचन आहे. केवळ संस्कृत भाषेतच एकवचन (अहं… म्हणजे मी एकटा), द्विवचन (आवाम… म्हणजे आम्ही दोघे) आणि बहुवचन (वयम्… म्हणजे आम्ही तिघे) आहे. त्या फलकातील “आम्ही” या बहुवचनाला साजेसे. संस्कृतमधले बहुवचन तिघे सोडा मराठी भाषेतील बहुवचनाप्रमाणे किमान दोन जण तरी असावेत. एकट्याने “आम्ही”चा फलक पकडणे हाच खरा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याचा पराभव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला केवळ हिंदू श्रद्धांवर रूढींवर परंपरांवर आघात करायचा असल्यामुळे सकल हिंदू समाज यांच्यापासून फटकून राहतो आणि एकट्याने “आम्ही”चा फलक पकडावा लागतो.
चोरीचा मामला… हळूहळू बोंबला…

डॉक्टर हमीद दाभोळकर ज्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या आधारे ग्रहणातील रूढी परंपरांना अंधश्रद्धा ठरवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. तो कायदा महाराष्ट्र सरकारने त्यांच्या पिताश्रींच्या अट्टाहासामुळे २०१३ साली पारित केलेला आहे.
मात्र या कायद्याची मुळे आणीबाणीच्या काळात तत्कालीन (हुकुमशहा) पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७६ साली ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे कोणतीही चर्चा घडवून न आणता भारताच्या संविधानात “वैज्ञानिक दृष्टिकोना”चा (Scientific Temper) उल्लेख अक्षरशः घुसडला होता. अगदी “समाजवादी” आणि “धर्मनिरपेक्ष” या शब्दांसारखाच अगदी त्याच घटनादुरुस्तीत आणीबाणीच्या काळात संसदेचे विरोधी पक्षांचे अस्तित्व नसताना कोणत्याही चर्चेविना केलेली ही घटना दुरुस्ती निव्वळ अनैतिक आहे. ना त्या शब्दाची व्याख्या कोणी सांगितली. ना त्याची व्याप्ती कोणाला कळली. आले इंदिरेच्या मना तेथे कोणाचे चालेना. अशा काळातील हा वैज्ञानिक दृष्टिकोन पण चोरीचा मामला असल्यामुळे डॉक्टर हमीद दाभोळकर हळूहळू बोंबलताहेत. आणि त्या अनैतिक घटना दुरुस्तीच्या पायावर महाराष्ट्रात २०१३ साली जो कायदा बनला आहे, आज त्याचा धाक डॉक्टर हमीद दाभोळकर फक्त सकल हिंदू समाजाला दाखवत आहेत. चर्च, फादर, पास्टर, रेव्हरंड, मुल्ला, मौलवी, मुफ्ती, इमाम यांना हा कायदा लागू होत नाही असे डॉक्टर हमीद दाभोळकर यांना वाटते. काय? जर या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर,
हे राष्ट्र संकटंशी लढले अनेक वेळा
कोणी न जिंकले हे भासे अजेय काळा
आदर्श जीवनाचा हा वृक्ष अमर याला
जरी तोडिले बळाने तरी स्पर्शितो नभाला
त्याचेच पुत्र आम्ही जयवंत जे सदाचे ॥
आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे
उजळून आज दावू भवितव्य मातृभूचे ॥
हा आमच्या हिंदू राष्ट्राचा अमर अजरामर तेजस्वी इतिहास आहे. एवढेच डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी लक्षात ठेवावे.