Monday, March 9, 2026

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

Share

मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने “सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र” या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हा सोहळा आज, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्यांचा सन्मान
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की, विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्यात प्रामुख्याने खालील घटकांतील महिलांचा गौरव केला जाणार आहे.

अनाथ प्रमाणपत्र प्राप्त महिला आणि बालगृहात राहिलेल्या महिला.

शक्ती सदन, निरीक्षण गृह, महिला आश्रम व महिला वसतिगृहातील यशस्वी महिला.

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका.

हा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

तसेच, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार अरविंद सावंत आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्याचा उद्देश
या कार्यक्रमाद्वारे केवळ सत्कारच केला जाणार नाही, तर या महिलांच्या संघर्षगाथा समाजासमोर मांडून इतर महिलांनाही सक्षम होण्यासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. “या महिलांनी समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे मत मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

अन्य लेख

संबंधित लेख