गंगाखेड (परभणी) : घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि व्यावसायिक ठिकाणी होणारा त्यांचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या आदेशानुसार गंगाखेड तहसील कार्यालयाने शुक्रवारी (दि. १३ मार्च) शहरात मोठी तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत ६ नामांकित हॉटेल्समधून १० घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, या धडक कारवाईमुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.
२७ हॉटेल्सची झाडाझडती
तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने गंगाखेड शहरातील एकूण २७ हॉटेल आणि रेस्टॉरंटची अचानक तपासणी केली. यामध्ये ६ ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेले सर्व सिलिंडर पुढील कार्यवाहीसाठी अक्षय गॅस एजन्सीच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
कठोर कारवाईचा इशारा
“व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये केवळ व्यावसायिक (Commercial) सिलिंडरचाच वापर करणे बंधनकारक आहे. घरगुती सिलिंडरचा वापर करणे हा शासन नियमांचा भंग असून, असा प्रकार पुन्हा आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,” असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. ही तपासणी मोहीम यापुढेही तालुकाभर सातत्याने सुरू राहणार असल्याचे तहसीलदार कार्यालयाने स्पष्ट केले.
ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे आणितसेच स्थानिक पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ही तपासणी मोहीम पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रितमकुमार दोडल, मंडळ अधिकारी गंगाखेड शंकत राठोड तसेच महसूल सहाय्यक गणेश सोडगीर पुरवठा लिपीक अक्षय बसगुंडे, महसूल सेवक प्रकाश कांबळे व वाहन चालक भालेराव आणि सहकाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.