Thursday, April 30, 2026

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन

Share

अखंड जागृत देशभक्ती, श्रेष्ठ चारित्र्य, अनुशासन आणि सामाजिक जाणीव या सद्गुणांची निर्मिती संघाच्या कार्यातून, संघ शाखेतून होते. संघ अनुभवातूनच अधिक समजतो. समाजातील सज्जनशक्तीने सक्रिय आणि जागरूक नागरिक बनावे आणि संघाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यातील पर्वती भागातर्फे ‘सेवा संगम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून हिरेमठ बोलत होते. देशातील ९८ टक्के जिल्ह्यांमध्ये एक लाखांहून अधिक गावात संघाचे काम शाखांच्या माध्यमातून सुरू आहे. भारताबाहेर पन्नास देशांमध्येही हे काम सुरू असून आणखी शंभर देशांमध्ये हा विचार पोहोचला आहे. देशात गरजूंसाठी दीड लाखांहून अधिक सेवाकार्ये चालवली जात आहेत, अशी माहिती हिरेमठ यांनी प्रारंभी दिली.

जागृत समाज हीच प्रत्येक देशाची शक्ती असते आणि चांगल्या देशाचे प्रश्न तेथील देशभक्त नागरिकच सोडवू शकतात. म्हणून चांगला माणूस घडवण्याचे काम संघाने हाती घेतले आहे. हिंदुत्वाच्या आधारे या देशातील हिंदू समाजाचे संघटन करण्याचे काम संघ करत असून हिंदू समाजाने संघटित राहणे आवश्यक आहे, असे हिरेमठ म्हणाले. या देशात जागृत आणि देशभक्तीने भारलेला, राष्ट्र प्रथम, समाजहित प्रथम या भावनेने भारलेला समाज संघाला उभा करायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘स्व’-रूपवर्धिनीचे शिरीष पटवर्धन यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेमध्ये कोणाही व्यक्तीला करता येतील असे कार्यक्रम आहेत. संपूर्ण समाज हे करेल तेव्हा परिवर्तन घडेल. या विचारामागे तशी कृती देखील झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

विविध प्रकारची सेवाकार्ये चालवणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांचे पदाधिकारी या ‘सेवा संगम’मध्ये उपस्थित होते. पर्वती भागाचे संघचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. मुरलीधर कचरे यांनी प्रास्ताविक, उत्तरा सुमंत यांनी सूत्रसंचालन आणि दर्शन मिरासदार यांनी आभार प्रदर्शन केले.

अन्य लेख

संबंधित लेख