भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आता एका विशिष्ट भौगोलिक आणि धार्मिक चौकटीत वेगाने संकुचित होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेस हा खरोखरच ‘राष्ट्रीय’ पक्ष उरला आहे की केवळ एका विशिष्ट मतपेढीवर तग धरून असलेला ‘धार्मिक गट’ बनला आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. काँग्रेसने स्विकारलेली ही ‘मुस्लिम धार्जिणी’ भूमिका त्यांच्या ऐतिहासिक अस्तित्वाच्या विनाशाचा मार्ग ठरत आहे.
राज्यांच्या विधानसभेतील भयावह वास्तव
निवडणुकीच्या आकड्यांचे विश्लेषण केले तर काँग्रेसची मदार आता केवळ आणि केवळ मुस्लिमबहुल मतदारसंघावरच उरल्याचे दिसते. आसाममध्ये काँग्रेसने १९ जागा जिंकल्या आहेत, पण त्यातला सर्वांत मोठा विरोधाभास असा की, त्यातील १८ आमदार मुस्लिम समुदायाचे आहेत. याचा अर्थ असा की, आसाममधील बहुसंख्य समाजाने काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आहे. तिथे काँग्रेस आता केवळ एका विशिष्ट मतपेढीचा पक्ष बनला आहे.
दक्षिण भारतातही हीच स्थिती आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूडीएफ’ आघाडीच्या ३५ मुस्लिम आमदारांपैकी ८ आमदार थेट काँग्रेसचे आहेत, तर उर्वरित त्यांचे मित्रपक्ष असलेल्या ‘मुस्लिम लीग’चे आहेत. तामिळनाडूत ५ पैकी एक मुस्लिम आमदार आहे. पश्चिम बंगालमध्ये तर काँग्रेसची अवस्था अधिक केविलवाणी आहे. तिथे काँग्रेसचे जे दोन आमदार निवडून आले, ते दोन्ही मुस्लिम आहेत. म्हणजेच, बंगालच्या विस्तृत भूभागात जिथे मुस्लिम मतदार नाहीत, तिथे काँग्रेसचे अस्तित्व शून्य झाले आहे.
राज्यनिहाय काँग्रेस मुस्लिम आमदार
| राज्य | एकूण काँग्रेस आमदार | मुस्लिम आमदार | प्रमाण (%) |
| आसाम | १९ | १८ | ९४.७% |
| पश्चिम बंगाल | ०२ | ०२ | १००% |
| केरळ | – | ०८ | (आघाडीत एकूण ३०) |
| तामिळनाडू | ०५ | ०१ | २०% |
एकीकडे देशातील एकूण मुस्लिम खासदार आणि आमदारांची संख्या (सर्व पक्ष मिळून) लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत घटत असताना, दुसरीकडे काँग्रेसच्या निवडून आलेल्या गोटात मात्र त्यांचेच प्रमाण वाढणे, हे त्या पक्षाच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. जेव्हा एखादा राष्ट्रीय पक्ष केवळ एकाच समुदायाच्या जीवावर तग धरून राहतो, तेव्हा तो आपला ‘अखि़ल भारतीय’ दर्जा गमावून बसतो.
मुंबई महापालिका : २४ पैकी निम्म्याहून अधिक मुस्लिम
महाराष्ट्रातही काँग्रेसची हीच घसरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांतून दिसते. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीत काँग्रेसने केवळ २४ जागा जिंकल्या. या २४ जागांचे विश्लेषण केले तर धक्कादायक माहिती समोर येते. यातील १३ नगरसेवक (५४%) हे मुस्लिम समुदायाचे आहेत. भायखळा, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि धारावी यांसारख्या मुस्लिमबहुल पॉकेट्समध्येच काँग्रेसला यश मिळाले आहे. याउलट, मुंबईतील मराठी आणि इतर भाषिक मतदारांनी काँग्रेसला सपशेल नाकारले.
मुंबईतील प्रमुख विजयी मुस्लिम नगरसेवक (२०२६):
१. आसिफ झकेरिया (वांद्रे पश्चिम) २. अश्रफ आझमी (कुर्ला) ३. मस्तान इश्तियाक खान (प्रभाग २०) ४. मोहम्मद मोईन सिद्दीकी (प्रभाग ३३) ५. हैदर अस्लम शेख (प्रभाग ३४) ६. झियाउद्दीन शेख (गोवंडी) ७. सफीउल्ला खान (मानखुर्द) ८. राफिया अब्दुल रशीद दामुडी (प्रभाग २०९ – भायखळा) ९. नाझिया अशफाक सिद्दीकी (प्रभाग २१२ – भायखळा) १०. निजामुद्दीन राईन (प्रभाग १३७ – मानखुर्द) ११. साजिदा बी बब्बू खान (प्रभाग १८४ – धारावी) १२. रहेबर (राजा) सिराज खान (प्रभाग १०२ – वांद्रे पश्चिम) १३. सैफ अहद खान (प्रभाग ६२ – वर्सोवा)
या नावांवरून हे स्पष्ट होते की, काँग्रेसचे अस्तित्व आता केवळ मुंबईतील विशिष्ट वस्त्यांपुरतेच मर्यादित झाले आहे. उर्वरित ११ नगरसेवकांमध्ये दलित आणि उत्तर भारतीय चेहरा असला तरी, मराठी मतदारांमध्ये काँग्रेसची पकड पूर्णपणे सुटली आहे.
‘मुस्लिम अनुनय’ की राजकीय आत्मदहन?
काँग्रेसचा हा प्रवास ‘सर्वसमावेशकते’कडून ‘धार्मिक ध्रुवीकरणा’कडे सुरू आहे. आजचे राजकीय वास्तव हे आहे की, काँग्रेस आता केवळ अशाच ठिकाणी निवडून येते जिथे मुस्लिम मतांची टक्केवारी ३० ते ४० टक्क्यांच्या पुढे आहे. जिथे मतदारांमध्ये विविधता आहे, तिथे काँग्रेसचा पराभव निश्चित मानला जातो. यामुळेच देशातील मध्यमवर्गीय आणि हिंदू मतदार काँग्रेसकडे एका अविश्वासार्ह शक्ती म्हणून पाहत आहे.
काँग्रेसची ही भूमिका म्हणजे राजकीय आत्मदहनच आहे. काँग्रेस विशिष्ट धार्मिक कायदे किंवा वक्फ बोर्डाच्या अधिकारांचे समर्थन करते, तेव्हा ती प्रत्यक्षात स्वतःचीच कबर खोदत असते. कारण, यामुळे पक्षाची ‘नॅशनल’ इमेज पुसली जाऊन ती केवळ एका ‘विशिष्ट प्रेशर ग्रुपची वकील’ अशी बनत चालली आहे. ज्या राज्यांत काँग्रेसने फक्त मुस्लिम मतांवर मदार ठेवली, तिथे इतर समाजातील मतांची टक्केवारी १५ ते २० टक्क्यांनी घटली आहे. हा तोटा मुस्लिम मतांच्या बेरजेने कधीही भरून निघणारा नाही.
काँग्रेसच्या बुडत्या जहाजाचे संकेत
कोणताही राजकीय पक्ष जेव्हा आपल्या मूळ मतदारांना सोडून केवळ एका विशिष्ट वर्गाचा अनुनय करू लागतो, तेव्हा पतन सुरू होते. काँग्रेसच्या बाबतीत नेमके हेच घडत आहे. मुस्लिम आमदारांची आणि नगरसेवकांची वाढती संख्या ही काँग्रेसच्या विजयाची नव्हे, तर त्यांच्या आकुंचन पावणाऱ्या प्रभावाची साक्ष आहे. हा पक्ष आता भारताच्या बहुसांस्कृतिक आकांक्षांचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी केवळ एका गटाचे राजकारण करत आहे.
एकेकाळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आज स्वतःच्याच चुकीच्या धोरणांमुळे ‘एकाकी’ पडत चालला आहे. जर हीच स्थिती राहिली, तर भविष्यात काँग्रेसला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणवून घेणेही कठीण होईल. महाराष्ट्रापासून ते आसामपर्यंतचा हा ट्रेंड पाहिला तर स्पष्ट होते की, काँग्रेस आता सत्तेच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली जात आहे. ८० टक्के समाजाच्या संवेदनांना डावलून केवळ २० टक्के मतांच्या आधारावर निवडणुका जिंकण्याचे दिवस आता संपले आहेत. काँग्रेसचे हे ‘मियाँकरण’ त्यांना सत्तेच्या सिंहासनाकडे नेण्याऐवजी कायमच्या विनाशाच्या गर्तेत घेऊन जात आहे.
– सारंग दर्शने