
गेल्या पहिल्या भागात आपण शाडू मातीच्या मूर्तीचे फायदे आणि तोटे पाहिले…
आजच्या या दुसऱ्या भागात आपण पीओपी (PoP) मूर्तीचे फायदे आणि तोटे पाहू…
प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मूर्ती (विशेषतः गणेशमूर्ती) त्याच आकाराच्या शाडू मातीच्या मूर्तीच्या तुलनेत वजनाने हलक्या, आकर्षक आणि आकाराने सुबक असतात…
पीओपीला हवा तसा आकार देणे सोपे असते… तसेच त्यांना रंगाचा मुलामा देणे सोपे असते… त्यामुळे या मूर्ती अत्यंत सुबक, बारीक नक्षीकामाच्या आणि आकर्षक दिसतात…
व्यावसायिक उत्पादनासाठी पीओपी मूर्ती साच्यांचा (molds) वापर करून घाऊक प्रमाणावर बनवता येतात… तसेच त्या लवकर वाळतात…
या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होते…
या सर्व कारणांमुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो आणि त्या शाडू मातीच्या त्याच आकाराच्या मूर्तींपेक्षा स्वस्त मिळतात…
शाडूच्या मातीच्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती वजनाने अतिशय हलक्या असतात… तसेच या मूर्ती सहज तुटत नाहीत त्यामुळे त्यांची ने-आण करणे सोपे जाते…

व्यावहारिक दृष्ट्या ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती शाडू मातीच्या बनवणे वजनामुळे आणि कमकुवतपणामुळे कठीण असते… म्हणून मोठ्या मूर्ती विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती पीओपीच्या बनवल्या जातात…
मात्र पीओपी हे रासायनिक घटक (कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट) वापरून तयार केलेले साहित्य आहे… त्यामुळे त्याचे विघटन होत नाही… पीओपीचे नैसर्गिक विघटन होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो… त्यामुळे विसर्जनानंतर
या मूर्ती तलावांमध्ये किंवा नद्यांच्या तळाशी साचून राहतात…
पीओपी मूर्ती घडवताना त्याच्या रंगरंगोटीसाठी बहुतांशी रसायनिक कृत्रिम रंग वापरले जातात…
या दोन कारणांमुळे पीओपी मूर्तींमुळे प्रचंड जलप्रदूषण होते… तलाव व नद्यांसारख्या जलस्त्रोतांमध्ये पाण्याची गुणवत्ता आणि जलचर यांचे अस्तित्व धोक्यात येते…
आणि एकदा प्रदूषित झालेले जलस्त्रोत परत शुद्ध करणे महाकर्मकठिण काम असते…
विसर्जनानंतर अनेकदा पीओपीच्या मूर्तींचे अवशेष पाण्याच्या प्रवाहामुळे किंवा किनार्यावर अस्ताव्यस्त पडलेले आढळतात… ते दृश्य पाहणे भक्तांसाठी अत्यंत वेदनादायक असते…
पीओपी मूर्ती बनवताना आणि त्यावर प्रक्रिया करताना उडणारी
धूळ कारागिरांच्या डोळ्यात किंवा फुफ्फुसात गेल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात…
पीओपी चे मूळ स्वरूप असलेल्या जिप्सम (कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट) या खनिजाचा वापर प्राचीन काळापासून होत असल्यामुळे… व त्याच्या सुबकता, टिकाऊपणा तसेच स्वस्त किमतीमुळे पीओपीच्या गणेश मूर्ती अत्यंत लोकप्रिय आहेत…
मात्र त्याच्यातील लवकर विघटन न होण्याच्या गुणधर्मामुळे व रासायनिक घटकांमुळे… “जलप्रदूषण” ही एक खूप मोठी समस्या निर्माण होते…
याच्या पुढच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल याच्या पर्यायांचा विचार करू…
– पराग नेरूरकर