दरवर्षी गणेशोत्सवानंतर लाखो भाविक जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. परंतु, यादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मुळे निर्माण होणारे पर्यावरणावरचे संकट वर्षानुवर्षे अधिक गडद होत चालले होते. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला निर्णय- ‘विसर्जित पीओपी मूर्तींपासून पुन्हा नवीन मूर्ती आणि स्टडी टेबल यांसारख्या विविध वस्तू बनविणे’- हा पर्यावरण संवर्धनाचा एक उत्तम वस्तुपाठ ठरला आहे. या ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ बनवण्याच्या नाविन्यपूर्ण मॉडेलचे पर्यावरण पूरक महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे.
पीओपी चा पर्यावरणावरील घातक प्रभाव – गेल्या अनेक दशकांपासून विसर्जित केलेल्या पीओपी मूर्तींचे काय करायचे हा स्थानिक प्रशासनासमोर एक मोठा यक्षप्रश्न होता.
- जलचरांना घातक ठरणारे पाणी प्रदूषण – शाडूच्या मातीसारखे पीओपी पाण्यात सहज विरघळत नाही. एका पीओपी मूर्तीला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळण्यासाठी अनेक महिने, कधी कधी अनेक वर्षेही लागतात. यामुळे तलावांच्या आणि समुद्राच्या तळाशी पीओपीचा थर साचत होता. ज्यामुळे पाण्याचा ऑक्सिजन स्तर कमालीचा खालावत होता आणि जलचरांचे अस्तित्वही धोक्यात येत होते.
- न विरघळलेल्या पीओपीचे ढीग आणि विटंबना – विसर्जन झाल्यानंतर काही दिवसांनी अर्धवट विरघळलेल्या मूर्ती पालिकेमार्फत बाहेर काढल्या जात होत्या. अनेकदा या मूर्तींची डम्पिंग ग्राउंड वर विल्हेवाट लावली जात होती. ज्यामुळे भूमी प्रदूषण तर व्हायचेच आणि शिवाय धार्मिक भावनांनाही ठेच पोहोचत होती.
- रासायनिक रंगांचे विष – पीओपी मूर्तींवर वापरल्या जाणाऱ्या रासायनिक आणि कृत्रिम रंगांमध्ये शिसे, मर्क्युरी आणि क्रोमियम सारखे जड धातू असतात. हे धातू पाण्यात मिसळल्याने पाणी विषारी बनत होते आणि साखळी पद्धतीने मानवी आरोग्यालाही हानी पोहोचत होती.
- नवीन निर्णयामुळे होणारा सकारात्मक फरक
नवी मुंबई महापालिकेच्या या नवीन पीओपी पुनर्वापर’ प्रकल्पामुळे पर्यावरणावर अतिशय दूरगामी आणि सकारात्मक परिणाम होणार आहेत: - ‘शून्य कचरा’ (Zero Waste) संकल्पना: या प्रकल्पामुळे विसर्जित मूर्ती डम्पिंग ग्राउंडवर न जाता थेट रिसायकलिंग प्लांटमध्ये जातील. त्यामुळे पीओपी ने होणारे भूमी आणि जल प्रदूषण १००% रोखता येईल.
- निसर्ग संपत्तीची बचत: पीओपीचा पुनर्वापर करून पुन्हा नवीन मूर्ती बनवल्या गेल्यामुळे, नवीन पीओपी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि ऊर्जेची मोठी बचत होईल.
- सामाजिक आणि शैक्षणिक लाभ: न्यू ओटेरा संस्थेमार्फत पीओपीचा पुनर्वापर करून शालेय फर्निचर, जसे की विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासाचे टेबल’ बनवले जाणार आहेत. हा उपक्रम ‘वेस्ट टू वेल्थ’ निर्मितीचे उत्तम उदाहरण आहे. यामुळे सरकारी किंवा गरजू शाळांना स्वस्त आणि टिकाऊ फर्निचर मिळू शकेल.
सामूहिक प्रयत्नांतून पर्यावरण क्रांती
हा महत्त्वपूर्ण निर्णय केवळ प्रशासकीय पातळीवर झालेला नाही, तर यात समाजातील विविध घटकांचा सहभाग आहे जो या प्रकल्पाच्या यशाची खात्री देतो:
- तज्ज्ञ संस्थांचे सहकार्य: पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामांकित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित असलेल्या बैठकीत ‘न्यू ओटेरा’ या संस्थेने याचे मॉडेल सादर केले व सामंजस्य कराराचा प्रस्ताव मांडला.
- मूर्तिकारांची सकारात्मक साथ: शाडूची माती वापरून गणपती बनवणे यामध्ये वेळ खर्ची पडत असल्याने आणि पीओपी चा स्वस्त पर्याय उपलब्ध असल्याने मूर्तिकार देखील पीओपी वर भर देत होते. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मूर्तिकार संघटनेच्या’ प्रतिनिधींनी या पुनर्वापरातून येणाऱ्या पीओपीचा वापर करून नव्या मूर्ती बनवण्यास आपली संमती दर्शवली आहे.
राष्ट्र उभारणीसाठी डॉ. बिनिश देसाई आणि न्यू ओटेरासारख्या तरुणांची गरज!
या संपूर्ण प्रकल्पाच्या केंद्रस्थानी आहे ‘न्यू ओटेरा’ ही संस्था आणि तिचे मुख्य प्रवर्तक डॉ. बिनिश देसाई, ज्यांना देश आज ‘रिसायकल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखतो. वयाच्या अवघ्या ३२-३३ व्या वर्षी त्यांनी देशासमोरील कचरा व्यवस्थापनाचे सर्वात मोठे संकट हे एका संधीत बदलून दाखवले आहे.
आज आपल्या भारताला अशाच तरुणांची आणि संस्थांची खऱ्या अर्थाने गरज आहे. जेव्हा तरुण पिढी पर्यावरण, समाज आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन उद्योजकतेकडे वळेल, तेव्हाच भारत ‘आत्मनिर्भर’ आणि खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् बनू शकेल. ‘न्यू ओटेरा’चे हे मॉडेल देशातील प्रत्येक तरुणासाठी एक मोठी प्रेरणा आहे.
नवी मुंबई शहराला ‘रिसायकल हब’ बनवणारा हा उपक्रम देशातील इतर सर्व महानगरांसाठी मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. श्रद्धेला विज्ञानाची, प्रशासनाला समाजभानाची आणि तरुणांच्या कल्पकतेला राष्ट्रहिताची जोड दिली, तर आपण कोणतीही समस्या सोडवू शकतो, हेच या निर्णयातून सिद्ध होते. ही स्वागतार्ह संकल्पना जेव्हा देशभर स्वीकारली जाईल तेव्हा आपली विसर्जित केलेली मूर्ती एका लहान मुलाच्या अभ्यासाचे टेबल बनून देशाचे भविष्य उज्ज्वल करेल!
– मैत्रेयी गोडसे