Saturday, June 6, 2026

सामाजिक विकृतींचे जाळे आणि आत्मपरीक्षणाची गरज

Share

आजचा आधुनिक समाज विज्ञानाच्या जोरावर प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असला, तरी दुसरीकडे त्याचा नैतिक पाया ढासळत असल्याचे भीषण चित्र समोर येत आहे. नुकतीच समोर आलेली मुंबईतील गर्भपाताची आकडेवारी, विनयभंगाची वाढती प्रकरणे आणि कोल्हापूरचे सामूहिक बलात्काराचे प्रकरण या घटना केवळ कायदा-व्यवस्थेपुढील आव्हान नसून आपल्या कुटुंब व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर लक्षणे आहेत. कुटुंब हा समाजाचा पायाभूत घटक मानला जातो. जर या घटकातच वैचारिक पोकळी निर्माण झाली, तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागतो. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या ‘कुटुंब प्रबोधन’ विचारांवर आज सखोल आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.


मुंबई आणि कोल्हापूरची आकडेवारी: एक विदारक वास्तव
माहिती अधिकारांतर्गत (RTI) मुंबई महानगरपालिकेच्या कुटुंब कल्याण विभागाकडून मिळालेली आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. २०२४-२५ या वर्षभरात मुंबईत तब्बल २५,१७६ गर्भपातांची नोंद झाली. यातील सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारा आकडा म्हणजे १५ ते १९ वयोगटातील ७१६ अल्पवयीन मुलींचा झालेला गर्भपात. ही केवळ आकडेवारी नसून लहान वयातील मुलींच्या असुरक्षिततेचे आणि त्यांच्यावर ओढवलेल्या मानसिक व शारीरिक संकटाचे भयावह वास्तव आहे.

दुसरीकडे, कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांचे होणारे शोषण, राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधींवर दाखल होणारे विनयभंगाचे गुन्हे आणि समाजसेविकांना रस्त्यावर येणारे अश्लील अनुभव या घटना स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराची घटना तर अंगावर काटा आणणारी आहे. एका तरुणीला कागदपत्रांच्या बहाण्याने विश्वासात घेऊन, गुंगीचे औषध देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले गेले आणि त्याद्वारे तिला तब्बल ८ महिने ब्लॅकमेल करून सामूहिक अत्याचार करण्यात आला. या सर्व वेगवेगळ्या घटना असल्या, तरी त्यांच्या मुळाशी “कुटुंबातील कमी झालेला संवाद आणि संस्कारांची कमतरता” हीच मुख्य कारणे आहेत.


संवादातील दरी आणि कौटुंबिक विश्वासाची पोकळी
कोल्हापूरच्या घटनेत पीडित तरुणी किंवा मुंबईतील शेकडो अल्पवयीन मुली आपल्या पालकांशी वेळीच संवाद का साधू शकल्या नाहीत? हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. याचे मुख्य कारण कुटुंब व्यवस्थेतील वाढत्या अंतरामध्ये आहे.

  • घरातील विश्वासाची पोकळी: आजही लैंगिक अत्याचार किंवा वैयक्तिक समस्यांवर घरात मोकळेपणाने बोलले जात नाही. मुलींना वाटते की घरात सांगितल्यास पालक समजून घेण्याऐवजी त्यांच्यावरच संशय घेतील किंवा शिक्षण बंद करतील.
  • समाजाची भीती: कौटुंबिक आधाराची खात्री नसल्यामुळे मुली ‘नातेवाईक काय म्हणतील-समाज काय म्हणेल’ या भीतीने असह्य त्रास सहन करत राहतात.
  • पुरुषत्वाच्या चुकीच्या व्याख्या: लहानपणापासून मुलांच्या मनात हिंसक वर्चस्ववाद रुजवला जातो, ज्यामुळे अहंकार सुखावण्यासाठी बलात्कार किंवा विनयभंगासारखी विकृत गुन्हेगारी कृत्य घडतात.

गुन्हेगारी मानसिकता आणि संगोपनाचे अपयश
या घटनांमधील आरोपी हे देखील तरुण वयातील आहेत. मुले एवढी क्रूर कशी बनतात? याचा विचार करताना थेट बोट त्यांच्या संगोपनावर जाते. आज पालकांचा कल मुलांना केवळ भौतिक सुखसुविधा पुरवण्याकडे आहे. चांगला मोबाईल, पैसे दिले की कर्तव्य संपले असे पालकांना वाटते; मात्र मुलगा इंटरनेटवर काय पाहतो, त्याची संगत कशी आहे याकडे दुर्लक्ष होते. ज्या घरात स्त्रियांचा आदर केला जात नाही आणि ‘मुलगा आहे’ म्हणून त्याच्या चुकांकडे कानाडोळा केला जातो, तिथेच अशा समाजविघातक वृत्तीची बीजे रोवली जातात.

‘कुटुंब’: संस्कार पहिले केंद्र
विभक्त कुटुंब पद्धतीमध्येही कौटुंबिक मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहे:
१. कौटुंबिक वेळ: पालकांनी आणि मुलांनी रोज किमान अर्धा ते एक तास मोबाईल, टीव्ही विरहित एकत्र बसून संवाद साधला पाहिजे. तसेच, विविध सामाजिक मुद्यांवर मुलांची मते घेणे आणि आवश्यक तेथे समजावून सांगणे ही पालकांची जबाबदारी आहे.
२. मूल्यांची रुजवणूक: घरातूनच स्त्री आणि पुरुषाच्या आदरयुक्त नातेसंबंधांचे धडे दिले जावेत. “पुरुषत्व म्हणजे वर्चस्व नव्हे, तर आदर आणि जबाबदारी” हा दृष्टिकोन मुलांच्या मनात बिंबवणे आवश्यक आहे. स्त्रियांचा आदर कसा करावा, संमतीचे महत्त्व काय, आणि कोणाच्याही भावनांशी किंवा वैयक्तिक आयुष्याशी खेळणे हा किती मोठा गुन्हा आहे, याचे धडे घरातूनच मिळाले पाहिजेत.


कायदा आपले काम करेलच आणि आरोपींना शिक्षाही होईल. परंतु, जोपर्यंत आपण आपल्या कौटुंबिक व्यवस्थेतील दोष दूर करत नाही, तोपर्यंत अशा विकृती थांबणार नाहीत. आज पालकांना अधिक सजग होण्याची आणि मुलांशी मैत्रीचे नाते जोडण्याची गरज आहे. घरात जेव्हा उपभोगाऐवजी त्यागाचे आणि बंधनांपेक्षा विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, तेव्हाच समाज आणि राष्ट्र सुरक्षित होईल. कुटुंब वाचले, तरच समाज वाचेल!

– मैत्रेयी गोडसे

अन्य लेख

संबंधित लेख