भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आदिवासींचे आराध्य दैवत, जननायक ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. अवघ्या २५ वर्षांचे अल्प आयुष्य लाभलेल्या या महानायकाने ‘जल, जमीन आणि जंगल’ यांच्या रक्षणासाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी उभारलेला ‘उलगुलान’ (मोठे, महान बंड) आजही अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढण्याची अखंड प्रेरणा देतो.
आज, ९ जून २०२६ रोजी जननायक, ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात शासकीय, वैचारिक आणि सांस्कृतिक पातळीवर अनेक उपक्रम राबवले गेले. मुंबईतील ‘लोकभवन’ (राजभवन) येथे राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या उपस्थितीत भव्य अभिवादन सोहळा, विचारमंथन आणि ऐतिहासिक सांस्कृतिक सादरीकरण झाले. तर दुसरीकडे, याच कालखंडात संपूर्ण महाराष्ट्रात ‘भगवान बिरसा कलासंगम’ या राज्यस्तरीय आदिवासी कलामहोत्सवाने आदिवासी अस्मितेचा गजर केला. सत्तेच्या दरबारापासून ते दुर्गम पाड्यांतील पारंपरिक नृत्यांपर्यंत झालेला हा प्रवास म्हणजे आदिवासी संस्कृतीचा एक ऐतिहासिक सुवर्णयोग ठरला आहे.
‘लोकभवन’मधील ऐतिहासिक सोहळा – मान्यवरांची मांदियाळी
मुंबईतील ‘लोकभवन’ येथे आज आयोजित करण्यात आलेला अभिवादन कार्यक्रम हा केवळ एक शासकीय उपचार नव्हता, तर तो आदिवासी समाजाच्या हक्कांना, त्यांच्या बलिदानाला आणि योगदानाला राज्याच्या मुख्य प्रवाहात मानाचे सर्वोच्च स्थान देणारा क्षण ठरला. या सोहळ्यात महत्त्वाची भाषणे झाली आणि त्यानंतर कलावंतांनी आपली कला सादर केली.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या नेतृत्वाइतकीच सस्माननीय उपस्थिती म्हणजे, आदिवासी समाजातून पुढे येत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पद्म पुरस्कार विजेते कलावंत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जनजातींमधून आलेले शेकडो कलावंत यावेळी लोकभवनमध्ये हजर होते.

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन : ‘संघर्ष आणि बलिदाना’ची गाथा
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतीचा आणि समाजसुधारणेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. ते म्हणाले, ‘अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात जननायक, भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची अशी ज्योत पेटवली की संपूर्ण ब्रिटिश राजवट हादरून गेली. जल, जमीन आणि जंगलांसाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी उभारलेला लढा केवळ काही राज्यांपुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण देशभरातील आदिवासी समाजाला प्रेरणा देणारा ठरला.’
‘स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी नायक-नायिकांचे योगदान अनन्यसाधारण असूनही इतिहासाने त्यांची योग्य दखल घेतली नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे या वीरांचा गौरवशाली इतिहास देशासमोर आला आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचू लागला आहे. आदिवासी संस्कृतीतील निसर्गसंवर्धन, समता आणि समृद्ध समाजव्यवस्था ही आजही संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे,’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
“आदिवासी संस्कृतीचे जतन करणे आणि या समाजाचे सक्षमीकरण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून एक सक्षम आदिवासी समाज घडविण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आणि भगवान बिरसा मुंडा हेच या सर्व कार्यामागील आमचे मुख्य प्रेरणास्थान आहेत.”
यानंतर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून आपली प्रगती साधावी, असे आवाहन केले. अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या लढ्याचा त्यांनी आवर्जून गौरव केला.
तारपा आणि बोहाडाचा उत्साह
मान्यवरांची अधिकृत भाषणे संपल्यानंतर कार्यक्रमाचा दुसरा आणि अत्यंत ऊर्जादायी टप्पा सुरू झाला, तो म्हणजे संपूर्ण राज्यातून आलेल्या शेकडो जनजाती कलावंतांचे सादरीकरण. एरवी शिष्टाचार आणि गंभीर वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या लोकभवनच्या प्रांगणात कलावंतांनी आपली पारंपरिक कला सादर केली, तेव्हा तिथले वातावरण पूर्णपणे भारावून गेले.
- तारपा नृत्याचा फेर : हातात पारंपरिक तारपा वाद्य घेऊन, परस्परांच्या कमेरवर हात ठेवून जेव्हा कलावंतांनी गोलाकार फेर धरला, तेव्हा निसर्गाशी असलेले घट्ट नाते सांगणाऱ्या या नृत्याने लोकभवनमध्ये एक अभूतपूर्व चैतन्य निर्माण केले.
- बोहाडा नृत्याची भव्यता : आदिवासी संस्कृतीतील समृद्ध मुखवटा उत्सव म्हणजेच ‘बोहाडा नृत्य’. विविध देवदेवतांचे भव्य आणि पौराणिक मुखवटे परिधान करून, ढोल-झांजांच्या कडकडाटात जेव्हा हे कलावंत मंचावर उतरले, तेव्हा त्यांच्या उत्तम आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने सर्वांचे डोळे दिपवून टाकले.
कलावंतांच्या या अप्रतिम सादरीकरणाने सारेच नेते भारावून गेले होते.