भारताचे ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ अजित डोवाल यांना नुकताच ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या निमित्ताने या अलौकिक रणनीतीधुरंधराचे हे व्यक्तिदर्शन……
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या पटलावर ज्या काही मोजक्या व्यक्तींनी अत्यंत सखोल, क्रांतिकारक आणि दूरगामी प्रभाव पाडला आहे, त्यात अजित डोवाल यांचे नाव अग्रस्थानी आहे. गुप्तचर खात्यातील एका धाडसी आणि चाणाक्ष अधिकाऱ्यापासून ते थेट देशाच्या सर्वोच्च पदावर- म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून- कार्यरत असण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही; तर तो आधुनिक भारताच्या सुरक्षेचा आणि मुत्सद्देगिरीचा एक नवा इतिहास आहे.
पुण्याच्या प्रतिष्ठेच्या ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ आणि ‘राष्ट्रीय अस्मिता’ यांचा जो विचार दिला, त्याच तत्त्वांवर अधिष्ठित राहून देशाच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या या महान भूमिपुत्राचा हा उचित बहुमान आहे, यात काहीच शंका नाही.
अर्थशास्त्राकडून पोलिस खात्याकडे
अजितकुमार डोवाल यांचा जन्म २० जानेवारी १९४५ रोजी उत्तराखंडमधील गढवाल प्रदेशात (तत्कालीन संयुक्त प्रांत) एका गढवाली ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. त्यामुळे लष्करी वातावरणातील कडक शिस्त, वेळेचे भान, निष्ठा आणि ‘राष्ट्र प्रथम’ हे संस्कार त्यांना लहानपणापासूनच घरातून मिळाले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अजमेर येथील प्रसिद्ध ‘मिलिटरी स्कूल’मध्ये झाले. लष्करात जाण्याचे वातावरण असूनही त्यांनी अर्थशास्त्रात रस दाखवला. आग्रा विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी (M.A.) संपादन केली, तीही सुवर्णपदकासह! त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाण्याची वृत्ती या काळातच स्पष्ट दिसू लागली होती.
सन १९६८ मध्ये अजित डोवाल यांनी केंद्रीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भारतीय नोकरशाहीत प्रवेश केला. त्यांना आयपीएस सेवेतील केरळ केडर मिळाले. त्यांनी आपल्या धाडसाची आणि कार्यक्षमतेची चुणूक लगेचच दाखवली. केरळमधील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळताना त्यांनी दाखवलेले चातुर्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत भरले. रुटीन कामांपेक्षा गुप्तचर विश्वातील गुंतागुंत डोवाल यांना आकर्षित करत होती. परिणामी, सन १९७२ मध्ये त्यांची निवड भारताची मुख्य गुप्तचर संस्था असलेल्या ‘इंटेलिजन्स ब्युरो’ (IB) मध्ये झाली. येथूनच त्यांच्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू झाला. तो जगापासून दीर्घकाळ अज्ञात राहिला.
पाकिस्तानमधील सात वर्षे
गुप्तचर विश्वात एका निष्णात ‘अंडरकव्हर एजंट’ म्हणून अजित डोवाल यांनी केलेले काम थक्क करणारे आहे. भारताची सुरक्षा मजबूत करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानात तब्बल सात वर्षे घालवली. तेथे राहताना त्यांनी स्वतःची भारतीय किंवा हिंदू असण्याची ओळख पूर्णपणे पुसून टाकली. तेथील स्थानिक बोलीभाषा, संस्कृती, पेहराव आणि चालीरीती इतक्या आत्मसात केल्या होत्या की, कोणालाही त्यांच्यावर संशय येणे शक्य नव्हते.
लाहोरमधील थरारक प्रसंग…
लाहोरमधील एका मशिदीबाहेरून जात असताना एका स्थानिक मुस्लिम फकिराने डोवाल यांच्या कानाला असलेले छिद्र (लहानपणी कान टोचलेले) पाहून त्यांना विचारले की, ‘तू हिंदू आहेस का?’ एका क्षणासाठी कोणताही गुप्तचर घाबरला असता, पण डोवाल शांत राहिले. त्यांनी त्या फकिराला खासगीत नेऊन कबूल केले की, ते हिंदूच आहेत, परंतु धर्मांतर करून येथे राहत आहेत. त्यांनी फकिराचा विश्वास संपादन केला आणि नंतर एका छोट्या शस्त्रक्रियेने कानावरील ते छिद्र बंद करून घेतले. या प्रसंगावरून त्यांची समयसूचकता आणि मानसिक कणखरता दिसून येते. या सात वर्षांच्या काळात त्यांनी पाकिस्तानात राहून तिथल्या अणुकार्यक्रमाची माहिती, सैन्याची हालचाल आणि भारताविरोधात रचले जाणारे कट-कारस्थान याबद्दलची गोपनीय माहिती सरकारकडे पोहोचवली.
देशांतर्गत बंडाळीचे आव्हान
अजित डोवाल केवळ माहिती गोळा करणारे गुप्तचर नव्हते, तर मैदानावर उतरून रणनीती अंमलात आणणारे ‘ऑपरेशनल मास्टरमाइंड’ होते. त्यांचे एकेक पराक्रम आपण असे पाहू शकतो..
(अ) मिझोरममधील बंड (१९८६)
१९८० च्या दशकात मिझोरममध्ये ‘मिझो नॅशनल फ्रंट’ (MNF) च्या लाल डेंगा यांनी भारत सरकारविरुद्ध उघड युद्ध पुकारले. मिझो बंडखोर जंगलात राहून भारतीय सैन्यावर गनिमी काव्याने हल्ले करत. डोवाल यांनी जीव धोक्यात घालून मिझो बंडखोरांच्या गोटात प्रवेश केला. ते केवळ तिथे गेले नाहीत, तर लाल डेंगा यांच्या विश्वासू अशा सातपैकी सहा कमांडरांना त्यांनी केंद्र सरकारच्या बाजूने वळवले. बंडखोरांची ताकद आतून मोडून काढल्यामुळे लाल डेंगा यांना शस्त्रे खाली ठेवावी लागली आणि मिझोरममध्ये शांतता करार झाला.
(ब) ऑपरेशन ब्लॅक थंडर (१९८८)
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दहशतवाद्यांनी पुन्हा कब्जा मिळवला होता. सैन्याला थेट आत पाठवून रक्तपात करणे भारताला परवडणारे नव्हते. अशा वेळी डोवाल रिक्षाचालक बनले. मंदिरात गेले आणि दहशतवाद्यांशी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’चा एजंट असल्याचे भासवले. दहशतवाद्यांचा पूर्ण विश्वास संपादन केल्यानंतर, त्यांनी दहशतवाद्यांना सैन्याच्या ताकदीविषयी चुकीची माहिती दिली आणि आत पुरवल्या जाणाऱ्या अन्न-पाण्याचा पुरवठा थांबवण्याची व्यूहरचना केली. परिणामी, आपल्या सैन्यदलांना एकही गोळी न झाडता सर्व दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडता आले.
(क) काश्मीरमधील ‘इख्वान’ फळी (१९९० चे दशक)
१९९० च्या दशकात काश्मीरमध्ये पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद शिखरावर होता. स्थानिक तरुण लढत होते. डोवाल यांनी तिथे एक नवा प्रयोग केला. त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या माजी बंडखोरांना संघटित केले आणि ‘इख्वान-उल-मुस्लिमिन’ ही दहशतवादविरोधी फळी उभी केली. दहशतवाद्यांचा सामना त्यांच्याच भाषेत करण्याची ही रणनीती यशस्वी ठरली आणि काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात येऊन तिथे निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला.
(ड) कंदाहार विमान अपहरण प्रकरण (१९९९)
भारतीय विमानाचे अपहरण करून दहशतवादी त्याला कंदाहारला (अफगाणिस्तान) घेऊन गेले. तालिबानने ओलीस ठेवलेल्या १९० प्रवाशांचे प्राण वाचवणे आवश्यक होते. सरकारने वाटाघाटी करण्यासाठी पाठवलेल्या पथकाचे नेतृत्व डोवाल यांनी केले होते. प्रतिकूल परिस्थितीत दहशतवादी आणि तालिबानशी चर्चा करून अधिकाधिक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कीर्ती चक्राचा ऐतिहासिक सन्मान
अजित डोवाल यांच्या अतुलनीय धैर्याची आणि गुप्तचर सेवेतील योगदानाची दखल घेऊन सरकारने त्यांना ‘कीर्ती चक्र’ या सर्वोच्च शांतताकालीन लष्करी सन्मानाने सन्मानित केले. सामान्यतः ‘कीर्ती चक्र’ हे सैन्यातील किंवा निमलष्करी दलातील शूर जवानांना दिले जाते. लष्करी सेवेत नसताना ‘कीर्ती चक्र’ मिळवणारे अजित डोवाल हे भारतातील पहिले पोलीस अधिकारी ठरले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
सन २००५ मध्ये अजित डोवाल हे ‘इंटेलिजन्स ब्युरो’च्या संचालक पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी ‘विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन’ (VIF) या ‘थिंक टँक’ची स्थापना केली आणि सुरक्षेवर लेखन व भाषणे देण्यास सुरुवात केली. सन २०१४ मध्ये देशात सत्तांतर झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोवाल यांची भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती केली. हे केवळ एका अधिकाऱ्याचे पुनर्वसन नव्हते, तर भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणातील एका नव्या युगाची सुरुवात होती.
डोवाल सिद्धांत
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यावर त्यांनी भारताच्या सुरक्षेला एक नवी दिशा दिली. यालाच आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘डोवाल सिद्धांत’ (Doval Doctrine) म्हणून ओळखले जाते. पूर्वी भारताचे धोरण मुख्यत्वे ‘संरक्षणात्मक’ असायचे. म्हणजे शत्रूने हल्ला केल्यावर फक्त बचाव करायचा. डोवाल यांनी हे बदलून ‘आक्रमक-संरक्षणात्मक’ (Defensive-Offensive) असे केले. याचा अर्थ असा की,
‘जर शत्रू आमच्या सीमेत घुसून हल्ला करणार असेल, तर आम्ही शत्रूच्या घरात घुसून त्याला चोख प्रत्युत्तर देऊ…’
या सिद्धांताची काही मुख्य उदाहरणे
१. म्यानमारमधील कारवाई (२०१५) : मणिपूरमध्ये भारतीय जवानांवर हल्ला करून म्यानमारच्या जंगलात लपलेल्या नागा बंडखोरांच्या तळांवर भारतीय सैन्याने म्यानमारच्या सीमेत घुसून कारवाई केली.
२. उरी सर्जिकल स्ट्राईक (२०१६) : उरी येथील लष्करी तळावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या संपूर्ण मोहिमेचे नियोजन आणि नियंत्रण डोवाल यांच्याकडे होते.
३. बालाकोट एअरस्ट्राईक (२०१९) : पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बाँबवर्षाव केला.
४. डोकलाम आणि लडाख सीमावाद (चीन) : सन २०१७ मधील डोकलाम वाद असो की २०२० मधील गलवान खोऱ्यातील तणाव; चीनच्या आक्रमक धोरणाला लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही स्तरांवर रोखून धरण्यात डोवाल यांनी मोलाची भूमिका बजावली.
५. कलम ३७० हटवणे (२०१९) : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय लागू झाल्यानंतर तेथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी डोवाल स्वतः श्रीनगरच्या रस्त्यांवर उतरले. स्थानिक लोकांशी गल्लीबोळात जाऊन संवाद साधणारे त्यांचे व्हिडिओ जगाने पाहिले.
बदलते आव्हान व आधुनिक मुत्सद्देगिरी
आजचे युद्ध हे केवळ सीमेवर बंदुका घेऊन लढले जात नाही. सायबर युद्ध, माहितीचे युद्ध, आर्थिक नाकेबंदी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होणारे गट-तट यांमुळे सुरक्षेची व्याख्या बदलली आहे. अजित डोवाल यांनी अमेरिकेची ‘सीआए’, इस्रायलची ‘मोसाद’ आणि रशियाच्या ‘एफएसबी’ यांसारख्या जगातील सर्वांत बलाढ्य गुप्तचर संस्थांशी भारताचे संबंध मजबूत केले आहेत. सौदी अरबस्तान, यूएई या मुस्लिमबहुल देशांशी भारताचे सुरक्षा संबंध सुधारण्यात डोवाल यांच्या मुत्सद्देगिरीचा मोठा वाटा आहे.
टिळक पुरस्काराचे औचित्य
आज स्वराज्य टिकवून ठेवणे, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे आणि अंतर्गत संकटांपासून १३० कोटी जनतेचे रक्षण करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. अजित डोवाल यांनी गेल्या ५ दशकांहून अधिक काळ स्वतःचे जीवन पूर्णपणे राष्ट्राला समर्पित केले आहे. पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीवर लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करणे, हा केवळ एका अधिकाऱ्याचा सत्कार नाही; तर देशासाठी अहोरात्र अदृश्यपणे काम करणाऱ्या संपूर्ण सुरक्षा यंत्रणेचा आणि ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराचा गौरव आहे. अजित डोवाल हे केवळ एक सनदी अधिकारी, पोलीस प्रमुख किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नाहीत. ते आधुनिक भारताचे ‘चाणक्य’ आहेत. त्यांनी भारताची सुरक्षा व्यवस्था मजबूत, कणखर आणि निर्भय बनवली आहे.
त्यांच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहिल्यास, देशाप्रती असणारी असीम निष्ठा, कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती आणि संकटाचे रूपांतर संधीत करण्याचे कौशल्य दिसून येते. आजचा तरुण वर्ग, जो देशाच्या सेवेत येऊ इच्छितो, त्याच्यासाठी अजित डोवाल यांचे आयुष्य हा एक अनमोल आदर्श आहे. भारताची ढाल बनून सीमेचे आणि देशाचे रक्षण करणाऱ्या या महान भूमिपुत्राला संपूर्ण देश या निमित्ताने सलाम करील, यात शंका नाही!