Wednesday, June 10, 2026

मरावे परी नेत्ररुपी उरावे १० जून नेत्रदान दिवस

Share

आज १० जून… जागतिक नेत्रदान दिन…

जागतिक दृष्टीदान दिनाचं सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणे आणि नेत्रदानाविषयी जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे असा आहे… भारतासह अनेक देशांमध्ये आजही अंधत्व ही मुख्य समस्या आहे… जागतिक आरोग्य संघटनेनुसार कॉर्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे…

शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे… त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात १० जून १९२४ रोजी झाला. घरची परिस्थिती हलाखीची असूनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण करून नेत्र विशारद

पदवी मिळवून… काही नोंदींनुसार त्यांनी ८० हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या… १० जून १९७९ ला त्यांचे निधन झाले…

नेत्र चिकित्सेच्याक्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे…

१९८० सालापासून महाराष्ट्र सरकारने तर १९८५ सालापासून भारत सरकारने “१० जून” हा “नेत्रदान” दिवस” साजरा करण्यास सुरुवात केली…

इ. स. २००० पासून जागतिक पातळीवर “१० जून” हा “नेत्रदान” दिवस” म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली…

नेत्रदानाबाबत अनेकांचा गैरसमज असतो की यात पूर्ण डोळा काढला जातो… परंतु, प्रत्यक्षात फक्त डोळ्याचे बाह्यपटल (कॉर्निया) काढले जाते आणि एका मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे

दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते…

व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी त्वरित पंखा बंद करून डोळ्यांवर ओले कापड ठेवावे आणि डोक्याखाली दोन उशा ठेवून डोके थोडे उंचावर ठेवावे… एवढेच अपेक्षित असते…

नेत्रदान हे केवळ व्यक्तीच्या मृत्य्यूनंतर ६ तासांच्या आत करणे आवश्यक असते… डोळे काढण्याची प्रक्रिया अवघ्या १५ ते २० मिनिटांत पूर्ण होते आणि यामुळे चेहऱ्यावर कोणतीही विकृती येत नाही…

मरणोत्तर नेत्रदानाच्या बाबतीत छोटासा श्रीलंका हा जगातील

सर्वात आघाडीचा देश असून तो कॉर्नियाचा (नेत्रपटल) सर्वात मोठा पुरवठादार आहे… अवघ्या २.२ कोटी लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा देशाने स्वतःची गरज पूर्ण करून जगभरातील ५७ हून अधिक देशांमधील लाखो अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय केले आहे…

श्रीलंका नेत्रदान संस्थेने (SLEDS) आतापर्यंत देश-विदेशात ८१ हजारांपेक्षा जास्त कॉर्नियांचे यशस्वी दान केले आहे… ५७ हून अधिक देशांना मदत: श्रीलंकेने भारत, पाकिस्तान, चीन, जपान, सिंगापूर आणि सौदी अरेबिया यांसारख्या अनेक देशांना कॉर्नियांचा पुरवठा केला आहे… यात सर्वाधिक फायदा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला (अंदाजे ३६,००० हून अधिक) झाला आहे…

जे. आर. जयवर्धने या श्रीलंकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी नेत्रदान केल्यामुळे या चळवळीला खूप मोठी गती मिळाली…

श्रीलंकेतील २२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचे फॉर्म भरून संमती दिली आहे… तर जवळपास ८४% नागरिक मृत्यूनंतर आपले डोळे दान करण्याची इच्छा व्यक्त

करतात…

१९५८ मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना डॉ. हडसन सिल्वा यांनी श्रीलंकेत नेत्रदानाची चळवळ सुरू केली… त्यांनी पहिल्यांदा गोळा केलेले कॉर्निया स्वतःच्या घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते… १९६० मध्ये डॉ. सिल्वा यांच्या आईचे निधन झाल्यावर त्यांनी त्यांच्या आईचे डोळे एका गरीब शेतकऱ्याला प्रत्यारोपित केले… या घटनेने संपूर्ण देशाचे हृदय जिंकले आणि लोक मोठ्या संख्येने नेत्रदानासाठी पुढे आले…

१९६४ मध्ये श्रीलंकेने सिंगापूरला ६ कॉर्नियांची पहिली आंतरराष्ट्रीय खेप पाठवली … त्यावेळी वाहतुकीची आधुनिक साधने नसल्यामुळे हे डोळे चहाच्या ‘थर्मास’मध्ये बर्फ टाकून विमानाने नेण्यात आले होते…

श्रीलंकेतील ७०% पेक्षा जास्त लोकसंख्या बौद्ध आहे… बौद्ध धर्मात ‘प्राणदान’ आणि अवयवदानाला (ज्याला ‘दान’ किंवा ‘पारमिता’ म्हणतात) अत्यंत पवित्र मानले जाते… मृत्यूनंतर डोळे

दान केल्याने पुढील जन्म चांगला मिळतो, अशी तिथल्या लोकांची गाढ श्रद्धा आहे… तिथले बौद्ध धार्मिक नेते आणि भिक्खू आपल्या प्रवचनांमधून लोकांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे सातत्याने आवाहन करतात… त्यांनी ही चळवळ आपली म्हटली व संपूर्ण श्रीलंकेत ती रुजवली…

श्रीलंकेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याचे नातेवाईक स्वतःहून नेत्रदान संस्थेला त्वरित संपर्क करतात… यामुळे तिथे कॉर्निया मिळवण्यासाठी कधीही प्रतीक्षा करावी लागत नाही…

जगातील एकूण अंध व्यक्तींपैकी जवळपास १/४ अंध व्यक्ती भारतात आहेत… भारतात दरवर्षी अंदाजे २५,००० ते ३०,०००

नव्या कॉर्नियल अंधत्वाच्या रुग्णांची भर पडते…

भारतातील पहिल्या नेत्रपेढीची  स्थापना १९४५ मध्ये चेन्नईच्या रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी येथे डॉ. आर. ई. एस. मुथय्या यांच्याद्वारे करण्यात आली… डॉ. मुथय्या यांनीच १९४८ मध्ये भारतात पहिले यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण केले… यातून या चळवळीचा पाया रचला गेला… भारत सरकारने अंधत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी हा देशव्यापी कार्यक्रम सुरू केला…

नेत्रपेढ्यांचे नियमन करणे आणि लोकांना प्रेरित करण्यासाठी आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया या शिखर संस्थेची १९८९ साली स्थापना झाली…

तसेच भारतात नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा पंधरवडा साजरा केला जातो…

परंतु, मागणीच्या तुलनेत भारतात मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण अजूनही खूप कमी आहे … त्यामुळे हजारो रुग्ण आजही प्रतीक्षेत आहेत…

मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्याला भारताची ‘नेत्रदान राजधानी’ म्हटले जाते… कारण तिथे दरडोई नेत्रदानाचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे…

त्यामुळे मरणोत्तर नेत्रदानासंबंधी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता आहे… आणि “मरावे परी नेत्ररुपी उरावे” हे लक्षात ठेवून… त्याची सुरुवात आपल्यापासून करणे हाच खऱ्या अर्थाने “नेत्रदान दिवस” साजरा करणे होय…

अन्य लेख

संबंधित लेख